भारताची विजयी हॅट्‌ट्रिक

0
92

जोहोर बाहरू
कर्णधार मनदीप मोर याने ४२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावल्याने भारतीय हॉकी संघाने काल मंगळवारी सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेत जपानवर १-० असा विजय संपादन केला. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या सत्रात काही मिनिटे खेळ थांबविण्यात आला होता. भारताचा आक्रमक खेळ थोपविण्याचे काम जपानच्या शिस्तबद्ध बचावफळीने केले. पहिल्या सत्रात भारताने एका पेनल्टी कॉर्नरसह काही संधी निर्माण केल्या. परंतु, गोल नोंदविण्याच्या जवळपासही भारताला जाता आले नाही. दुसरे सत्र देखील गोलशून्य बरोबरीत राहिल्याने तिसर्‍या सत्रात भारताने आपल्या आक्रमणाची धार वाढवली. जपानच्या धसमुसळ्या खेळामुळे भारताला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यातील दुसर्‍यावर मोर याने सामन्यातील एकमेव गोल नोंदविला. केवळ एका गोलाची निसटती आघाडी कायम राखण्याचे काम गोलरक्षक पंकज राजक व सतर्क बचावफळीने केले. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला जपानला पेनल्टी कॉर्नर लाभला होता. परंतु, स्वैर फटक्यामुळे भारताचा विजय निश्‍चित झाला. या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने मलेशियावर २-१ असा विजय प्राप्त केला होता तर दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडवर ७-१ असा फडशा पाडला होता. आज १० ऑक्टोबर रोजी विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यात सामना रंगणार आहे.