भारताची मदार जयरामवर

0
152

>> व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन आजपासून

‘बीडब्ल्यूएफ टूर सुपर १००’ दर्जाच्या व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. आशियाई ज्युनियर विजेत्या लक्ष्य सेन याने ७५,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतून काल अंग काढून घेतल्याने अनुभवी अजय जयरामवर भारताची मदार असेल.

अजय जयराम आपल्या मोहिमेची सुरुवात स्थानिक खेळाडू ली ड्युक फाट याच्याविरुद्ध करणार आहे. रशिया ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या मिथुन मंजुनाथला पात्रता फेरीतील आगेकूच केलेल्या खेळाडूशी खेळावे लागणार आहे. अभिषेक येळेगर आपल्या मोहिमेची सुरुवात मॉरिशसच्या जॉर्जेस ज्युलियन पॉल याच्याविरुद्ध करेल तर श्रेयांश जैसवालसमोर पात्रता फेरीतून पुढे गेलेला खेळाडू असेल. राहुल यादव चित्ताबोईनाला अनुभवी तिएन मिन्ह एनगुएन याचे आव्हान मोडीत काढावे लागणार आहे. याव्यतिरिक्त पुरुष एकेरीत सिद्धार्थ प्रताप सिंग वि. लु चिया हूंग, कार्तिकेय गुलशन कुमार वि. शेसार हिरेन रुस्तावितो व बोथित जोशी वि. अदुलराच नामकुल अशा लढती होतील.

महिला एकेरीत रुत्विका शिवानी गड्डे मलेशियाच्या यिन फुनलिमविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. मुग्धा आग्रेसमोर हान युई या सातव्या मानांकित खेळाडूच्या रुपात किचकट प्रतिस्पर्धी असेल. याव्यतिरिक्त वैदेही चौधरी वि. क्रिस्टल पॅन, श्रीकृष्णप्रिया कुदरावल्ली वि. युलिया योसेफिन सुसांतो, रसिका राजे वि. पात्रता फेरीतील खेळाडू असे पहिल्या फेरीतील सामने होणार आहेत.
महिला दुहेरीत द्वितीय मानांकन लाभलेली जोडी मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम यांचा सामना पात्रता फेरीचा अडथळा पार केलेल्या जोडीशी होईल. मिश्र दुहेरीत पूर्विशा व शिवम शर्मा तादायुकी उराई व रेना मियाउरा या जपानी जोडीशी भिडतील.