भारताची पराभवाने सुरुवात, लंका ५ गड्यांनी विजयी

0
111

कुशल परेराच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर यजमान श्रीलंकेने निदाहास तिरंगी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी देताना भारताचा ५ गड्यांनी पराभव केला.
भारतीय संघाकडून मिळालेले १७५ धावांचे विजयी लक्ष्य श्रीलंकेने १८.३ षट्‌कांत ५ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. कुशल परेराने ६ चौकार व ४ षट्‌कारांच्या सहायाय्याने ३७ चेंडूत ६६ धावांची आकर्षक खेळी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. थिसारा परेराने नाबाद २२ धावांचे योगदान दिले. भारतातर्फे युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ तर जयदेव उनडकटने १ गडी बाद केला.

तत्पूर्वी डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या विस्फोटक अर्धशतकी खेळीमुळे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ गडी गमावत १७४ अशी धावसंख्या उभारली होती. भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा खाते खोलण्यापूर्वीच दुष्मंता चामीराच्या गोलंदाजीवर मेंडीसकडे झेल देऊन परतला. तर सुरेश रैना केवळ १ धाव जोडून नुवान प्रदीपच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होऊन परतला. परंतु त्यानंतर शिखर धवनने ४९ चेंडूत ६ चौकार व ६ षट्‌कारांच्या सहाय्याने धडाकेबाज ९० धावांची खेळी करीत संघाला ५ बाद १७५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्याने तिसर्‍या विकेटसाठी मनीष पांडे समवेत महत्त्वपूर्ण ९५ धावांची भागीदारी केली. तर ऋषभ पंतच्या साथीत चौथ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. ऋषभ पंतने २३ तर दिनेश कार्तिकने १३ धावांचे योगदान दिले. लंकेतर्फे दुष्मंता चामीराने २ तर नुवान प्रदीप, जीवन मेंडीस आणि दानुष्का गुणतिलकाने प्रत्येकी १ गडी बाद केला.

धावफलक,
भारत ः रोहित शर्मा झे. जीवन मेंडीस गो. दुष्मंता चामीरा ०, शिखर धवन झे. थिसारा परेरा गो. दानुष्का गुणतिलका ९०, सुरेश रैना त्रिफळाचित नुवान प्रदीप १, मनीष पांडे झे. दानुष्का गुणतिलका गो. जीवन मेंडीस ३७, ऋषभ पंत झे. नुवान प्रदीप गोे. दुष्मंता चामीरा २३, दिनेश कार्तिक नाबाद १३.
अवांतर ः १०. एकूण २० षट्‌कांत ५ बाद १७५ धावा.
गोलंदाजी ः दुष्मंता चामीरा ४/०/३३/२, नुवान प्रदीप ३/०/३८/१, अकिला धनंजया ४/०/३७/०, थिसारा परेरा ३/०/२५/०, जीवन मेंडीस ३/०/२१/१, दानुष्का गुणतिलका ३/०/१३/१.

श्रीलंका ः दानुष्का गुणतिलका झे. ऋषभ पंत गो. जयदेव उनडकट १९, कुशल मेंडीस झे. शिखर धवन गो. वॉशिंग्टन सुंदर ११, कुशल परेरा यष्टिचित दिनेश कार्तिक गो. वॉशिंग्टन सुंदर ६६, दिनेश चंदिमल त्रिफळाचित युजवेंद्र चहल १४, उपुल थरंगा त्रिफळाचित युजवेंद्र चहल १७, दसुन शनाका नाबाद १५, थिसारा परेरा नाबाद २२.
अवांतर ः ११. एकूण १८.३ षट्‌कांत ५ बाद १७५ धावा.
गोलंदाजी ः जयदेव उनडकट ३/०/३५/१, वॉशिंग्टन सुंदर ४/०/२८/२, शार्दुल ठाकुर ३.३/०/४२/०, युजवेंद्र चहल ४/०/३७/२, विजय शंकर २/०/१५/०, सुरेश रैना २/०/१४/०.