भारताची केनियावर मात

0
104

>> जिंकला इंटरकॉंटिनेंटल चषक

भारतीय फुटबॉल संघाने काल रविवारी केनियाचा २-० असा पराभव करत चार देशांचा समावेश असलेली हिरो इंटरकॉंटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धा जिंकली. भारताकडून पहिल्या सत्राच्या सुनील छेत्री (८वे मिनिट व २९वे मिनिट) याने दोन्ही गोल नोंदवत ‘हराम्बी स्टार्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाचा पराभव केला.
मुंबई फुटबॉल एरिनावर काल रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पूर्ण क्षमतेनिशी उतरला. तर केनियाने तैवानवरील ४-० अशा विजयी संघात दोन बदल केले. सुनील छेत्री याने युवा अनिरुद्ध थापा याच्या फ्री किकवर अप्रतिम गोल नोंदवून भारताला सुुरुवातीलाच आघाडीवर नेले. २४व्या मिनिटाला ‘थ्रो इन’वर जेजे व थापा यांनी सुरेख चाल चरत छेत्रीला चेंडू पास दिला. परंतु, छेत्री फटका लगावण्यापूर्वीच केनियाचा बचावपटू मायकल किबवागे याने संभाव्य धोका टाळला.

भारताकडून नुकतेच सामन्यांचे शतक साजरे केलेल्या छेत्रीने २९व्या मिनिटाला भारताची आघाडी दुप्पट केली. अनास इदाथोडिका याने हवेतून दिलेल्या पासवर योग्य नियंत्रण राखताना छेत्रीने केनियाचा गोलरक्षक मातासी याला सहज चकवा दिला. मध्यंतरापूर्वी भारताला मोक्याच्या जागेवर फ्री किक मिळाली. या संधीवर गोल होणे अपेक्षित होते. परंतु, छेत्रीने लगावलेला फटका क्रॉसबारवरून गेला.

४८व्या मिनिटाला भारताचा गोलरक्षक गुरप्रीतससिंग संधू याने अप्रतिम बचावाचे दर्शन घडविले. केनियाच्या ओेवेला ओचिएंग याने लगावलेला जोरदार फटका त्याने उजवीकडे झेपावत अडवून केनियाचा प्रयत्न निष्फळ ठरविला. तासाभराचा खेळ झालेला असताना भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी दोन बदल केले. त्यांनी होलिचरण नार्झारे व जेजे लालपेखलुआ यांना बाहेर बोलावून रॉवलिन बोर्जिस व बलवंत सिंग यांना उतरवताना मध्यफळी मजबूत केली. दुसर्‍या सत्रात केनियाने सुधारित खेळ केला. परंतु, अनेकवळा समन्वयाच्या अभावामुळे त्यांना संधींचा फायदा उठवता आला नाही. भारताचा गोलरक्षक संधूच्या चपळतेचा परिणामही केनियाच्या आक्रमकांमध्ये दिसून आला. या विजेतेपदामुळे भारतीय संघाचा आत्मविश्‍वास दुणावला असून प्रशिक्षक कॉनन्स्टंटाईन देखील सुखावले आहेत.