भारताची कसोटीवर मजबूत पकड

0
95
Indian batsman and team captain Virat Kohli raises his bat after completing his double century (200 runs) during the second day of the third Test cricket match between India and Sri Lanka at the Feroz Shah Kotla Cricket Stadium in New Delhi on December 3, 2017. / AFP PHOTO / SAJJAD HUSSAIN / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

>> कर्णधार विराट कोहलीचे सहावे द्विशतक
>> श्रीलंका पहिल्या डावात ३ बाद १३१

श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक २४३ धावांच्या बळावर पहिला डाव ५३६ धावांवर घोषित केला. त्यानंतर दिवसअखेर लंकेच्या तीन फलंदाजांना १३१ धावांत बाद करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले आहे. दिवसअखेर मॅथ्यूज ५७ आणि कर्णधार चंदीमल २५ धावांवर नाबाद आहेत. श्रीलंकेचा संघ अजूनही ४०७ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ७ गडी शिल्लक आहेत.

भारताने धावपर्वत रचल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची खराब सुरुवात झाली. शामीच्या पहिल्याच चेंडूवर दिमुथ करुणारत्ने शून्यावर बाद झाला, तर ईशांत शर्माने धनंजय डीसिल्वाला एका धावेवर पायचीतच्या सापळ्यात अडकवले, त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज आणि समरविक्रमा जायबंदी असल्याने सलामीला बढती मिळालेला अष्टपैलू दिलरुवान परेराने श्रीलंकेचा डाव सावरला. मात्र जडेजाच्या गोलंदाजीवर परेरा ५४ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. तीन बाद ७५ असा अडचणीत सापडलेला डाव आजी आणि माजी कर्णधारांनी सावरला. दोघांनी जवळजवळ २७ षटके मैदानावर नांगर टाकत भारतीय गोलंदाजांना यशापासून वंचित ठेवले. या दरम्यान मॅथ्यूजने अर्धशतक पूर्ण केले. मॅथ्यूजला कर्णधार चंदीमलने चांगली साथ देत संयमी फलंदाजी केली. भारताकडून मोहम्मद शामी, ईशांत शर्मा आणि जडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. आज सामन्याचा तिसरा दिवस असून फॉलोऑन टाळणे हे लंकेचे पहिले लक्ष्य असेल. यासाठी चंदीमल व मॅथ्यूजला मोठी खेळी करावी लागणार आहे.

धावफलक
भारत पहिला डाव (४ बाद २७१ वरून) ः विराट कोहली पायचीत गो. संदाकन २४३, रोहित शर्मा झे. डिकवेला गो. संदाकन ६५, रविचंद्रन अश्‍विन झे. परेरा गो. गमागे ४, वृध्दिमान साहा नाबाद ९, रवींद्र जडेजा नाबाद ५, अवांतर ८, एकूण १२७.५ षटकांत ७ बाद ५३६
गोलंदाजी ः सुरंगा लकमल २१.२-२-८०-०, लाहिरु गमागे २५.३-७-९५-२, दिलरुवान परेरा ३१.१-०-१४५-१, लक्षन संदाकन ३३.५-१-१६७-४, धनंजय डीसिल्वा १६-०-४८-०
श्रीलंका पहिला डाव ः दिमुथ करुणारत्ने झे. साहा गो. शामी ०, दिलरुवान परेरा पायचीत गो. जडेजा ४२, धनंजय डीसिल्वा पायचीत गो. ईशांत १, अँजेलो मॅथ्यूज नाबाद ५७, दिनेश चंदीमल नाबाद २५, अवांतर ६, एकूण ४४.३ षटकांत ३ बाद १३१
गोलंदाजी ः मोहम्मद शामी ११-३-३०-१, ईशांत शर्मा १०-४-४४-१, रवींद्र जडेजा १४.३-६-२४-१, रविचंद्रन अश्‍विन ९-३-२८-०

लॉंगना आश्‍चर्याचा धक्का
श्रीलंकेचा फलंदाज दिलरुवान परेराविरुद्ध रवींद्र जडेजा याने पायचीतचे अपील मैदानी पंच नायजेल लॉंग यांनी फेटाळले. फटका खेळताना परेरा क्रीझच्या खूप बाहेर असल्याने चेंडूला ३ मीटर किंवा जास्तचे अंतर कापावे लागेल असा अंदाज बांधत त्यांनी परेराला नाबाद ठरविले. रिप्लेमध्ये हे अंतर २.९९ मीटर असे दिसून आल्याने लॉंग यांना आपला निर्णय बदलून परेराला बाद ठरवावे लागले. क्रिकेटच्या नियमानुसार ३ किंवा जास्त मीटरचे अंतर असते तर लॉंग यांचा ‘नाबाद’ निर्णय कायम राहिला असता.

प्रदुषणाचा त्रास की रडीचा डाव
दिल्लीतील प्रदुषणाचा गंभीर परिणाम भारत व श्रीलंका यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी दिसून आला. श्रीलंकेतील खेळाडूंना दुसर्‍या सत्रात तोंडाला ‘मास्क’ बांधून मैदानात उतरावे लागले. वेगवान गोलंदाज लाहिरु गमागे याने श्‍वसनाच्या त्रासाचे कारण देऊन फिजियोला बोलावल्यानंतर त्याच्यावर उपचारासाठी १७ मिनिटे वाया गेली. यानंतर दुसरा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल याने याच कारणास्तव मैदान सोडले. त्यामुळे मैदानात केवळ दहाच खेळाडू राहिले. श्रीलंकन खेळाडूंची स्थिती पाहून विराटने भारताचा डाव घोषित केला. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी मात्र श्रीलंकेवर रडीचा डाव खेळण्याचा आरोप केला आहे. प्रदुषण केवळ श्रीलंकेच्या खेळाडूंना झोंबणारे होते सामना पाहण्यासाठी उपस्थित २० हजार लोकांना प्रदुषणाचा त्रास झाला नाही, असा टोमणादेखील त्यांनी मारला.

विराटचे सहावे द्विशतक
विराटने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत काल रविवारी सलग दुसरे द्विशतक झळकावले. विराटच्या कारकिर्दीतील हे सहावे द्विशतक ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये सहा द्विशतके टोलवणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर सहा द्विशतके आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतके ठोकण्याचा पराक्रमही विराटने केला. हा विक्रम याआधी विंडीजच्या ब्रायन लाराच्या नावे होता. लाराने कर्णधार म्हणून ५ द्विशतके ठोकली होती. मात्र कर्णधार म्हणून ६ द्विशतके झळकावत विराटने लाराला मागे टाकले आहे. सर्वाधिक द्विशतकांचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे. त्यांनी ५२ सामन्यात सर्वाधिक १२ द्विशतके केली आहेत. त्यानंतर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने अकरा द्विशतके ठोकली आहे.