भारताची आजपासून ‘कसोटी’

0
134

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मागील तीन वर्षांत केवळ दोन कसोटी सामने गमावलेल्या टीम इंडियाची खर्‍या अर्थाने कसोटी या मालिकेत लागणार आहे. उपखंडातील पाटा खेळट्‌ट्यांवरून दक्षिण आफ्रिकेतील वेगवान व उसळत्या खेळपट्‌ट्यांवर भारतीय संघाचे स्थित्यंतर योग्यरितीने घडले तरच मालिका चुरशीची होणे अपेक्षित आहे.
शिखर धवन तंदुरुस्त ठरल्याने मुरली विजयसह तो डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. सामन्यापूर्वी खेळपट्टीचे स्वरुप पाहून रोहित शर्मा व हार्दिक पंड्या यांच्यावर निर्णय अपेक्षित आहे. हिरवळ असली तर रोहितच्या रुपाने अतिरिक्त फलंदाज व गवत कमी असल्यास हार्दिकच्या रुपात अतिरिक्त गोलंदाज टीम इंडिया खेळवू शकते. सामन्याच्या पहिल्या व चौथ्या दिवशी वार्‍याची गती व हवामान ढगाळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल.

दुसरीकडे द. आफ्रिकेसमोर ‘अंतिम ११’ निवडण्याचा पेच आहे. एबी डीव्हिलियर्स व तेंबा बवुमा यांच्यापैकी एकाची निवड त्यांना करावी लागेल. तळाला व्हर्नोन फिलेंडर उपयुक्त फलंदाज असल्याने मॉरिस व फेलुकवायो या अष्टपैलूंऐवजी चार वेगवान गोलंदाजांसह उतरण्याचा पर्यायही दक्षिण आफ्रिका निवडू शकते. या परिस्थितीत डेल स्टेन खेळताना दिसू शकतो. अन्यथा मॉर्ने मॉर्कल त्यांची पहिली पसंती असेल.
द. आफ्रिका संभाव्य ः डीन एल्गार, ऐडन मारक्रम, हाशिम आमला, फाफ ड्युप्लेसिस, एबी डीव्हिलियर्स, क्विंटन डी कॉक, आंदिले फेलुकवायो, व्हर्नोन फिलेंडर, कगिसो रबाडा, मॉर्नी मॉर्कल व केशव महाराज.
भारत संभाव्य ः मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्‍विन, भुवनेश्‍वर कुमार, ईशांत शर्मा व मोहम्मद शामी.