भारताचा ८८ धावांनी विजय

0
77

>> सलामीवीर स्मृती मंधानाच्या ८४ धावा

>> दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

डायमंड ओव्हल मैदानावर काल सोमवारी खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ८८ धावांनी पराभव केला. आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत सदर सामने होत आहेत. सलामीवीर स्मृती मंधानाच्या ८४ धावांनंतर शिखा पांडे व झुलन गोस्वामी यांच्या भेदक मार्‍यामुळे भारताला विशाल विजय साकार करता आला. मालिकेतील दुसरा सामना ७ रोजी व तिसरा सामना १० रोजी खेळविला जाणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पूनम व स्मृती यांनी भारताला ५५ धावांची सलामी दिली. पूनम बाद झाल्यानंतर स्मृतीने कर्णधार मितालीसह दुसर्‍या गड्यासाठी ९९ धावा जोडल्या. दुसर्‍या गड्याच्या रुपात स्मृती बाद झाली तेव्हा भारताच्या २ बाद १५४ धावा झाल्या होत्या. स्मृतीने आपल्या ८४ धावांच्या खेळीत ९८ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार व १ षटकार लगावला. स्मृती परतल्यानंतर पुढच्याच षटकात मिताली बाद झाली. यानंतर मात्र भारताची मधली फळी कोलमडली. २२५ ते २३० धावा दृष्टिपथात असताना भारताला २१३ धावांवर समाधान मानावे लागले.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. शिखा पांडेने यजमानांची आघाडी फळी कापून काढताना त्यांची ३ बाद २३ अशी स्थिती केली. या धक्क्यांतून त्यांचा संघ शेवटपर्यंत सावरला नाही. मधल्या षटकांत फिरकीपटूंनी व यानंतर झुलन गोस्वामीने बळी घेत भारताचा विजय साकार केला.

धावफलक
भारत ः पूनम राऊत झे. ईस्माइल गो. खाका १९, स्मृती मंधाना झे. लुस गो. खाका ८४, मिताली राज त्रि. गो. क्लास ४५, हरमनप्रीत कौर पायचीत गो. काप १६, वेदा कृष्णमूर्ती धावबाद २, दीप्ती शर्मा धावबाद ६, सुषमा वर्मा झे. खाका गो. काप १५, शिखा पांडे नाबाद ९, झुलन गोस्वामी नाबाद ८, अवांतर ९, एकूण ५० षटकांत ७ बाद २१३
गोलंदाजी ः शबनम ईस्माइल ९-२-३८-०, मरिझान काप १०-२-२६-२, अयाबोंगा खाका १०-०-४७-२, मासाबाता क्लास ८-१-३६-१, डॅन वॅन निएकर्क ८-०-३०-०, क्लो ट्रायोन ३-०-२०-०, सून लुस २-०-१४-०
दक्षिण आफ्रिका ः लिझेल ली पायचीत गो. पांडे ३, लॉरा वॉलवार्ट झे. राज गो. पूनम यादव २१, त्रिशा चेट्टी पायचीत गो. पांडे ३, मिगनॉन डू प्रीझ झे. वर्मा गो. पांडे ०, डॅन वॅन निएकर्क यष्टिचीत वर्मा गो. गायकवाड ४१, क्लो ट्रायोन पायचीत गो. गोस्वामी २, मरिझान काप झे. राज गो. पूनम यादव २३, सून लुस नाबाद २१, शबनम ईस्माइल त्रि. गो. गोस्वामी ४, अयाबोंगा खाका झे. कौर गो. गोस्वामी २, मासाबाता क्लास त्रि. गो. गोस्वामी १, अवांतर २, एकूण ४३.२ षटकांत सर्वबाद १२५
गोलंदाजी ः झुलन गोस्वामी ९.२-२-२४-४, शिखा पांडे ८-०-२३-३, दीप्ती शर्मा ८-०-२५-०, राजेश्‍वरी गायकवाड ८-२-२०-१, पूनम यादव ९-२-२२-२, हरमनप्रीत कौर १-०-११-०