भारताचा लक्ष्य सेन ५२व्या स्थानी

0
99

भारताच्या लक्ष्य सेन याने काल मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत पुरुष एकेरीमध्ये वीस स्थानांची मोठी उडी घेत ५२वा क्रमांक मिळविला आहे. रविवारी डच ओपन जिंकून आपला पहिलावहिला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर किताब जिंकलेल्याचा फायदा त्याला झाला आहे. याच स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेल्या बी.एम. राहुल भारद्वाज यानेदेखील क्रमवारीत मोठी मजल मारताना २५ स्थानांच्या सुधारणेसह १२३व्या स्थानापर्यंत प्रगती केली आहे. पुरुष एकेरीतील भारताच्या अन्य आघाडीच्या खेळाडूंच्या स्थानात बदल झालेला नाही. किदांबी श्रीकांत (९), साई प्रणिथ (१२), समीर वर्मा (१७), पारुपल्ली कश्यप (२५), एच.एस. प्रणॉय (२८) जैसे थे आहेत. तीन स्थानांच्या घसरणीसह सौरभ वर्मा ३७व्या स्थानी पोहोचला आहे. महिला एकेरीत पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल अनुक्रमे सहाव्या व आठव्या स्थानी आहे. मुग्धा आग्रे (+ १, ६३वे स्थान), अश्मिता चलिहा (+ १, ८९वे स्थान), वृषाली गुम्माडी (+ ३, ९८वे स्थान) यांनी प्रगती केली आहे. चौदा स्थानांचा तोटा झालेली साई उत्तेजिता राव चुक्का (१००) ‘टॉप १००’मधून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. पुरुष दुहेरीतील भारताची सर्वोत्तम जोडी असलेली सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी १२व्या स्थानी आहे. महिला दुहेरीत जक्कमपुडी मेघना व पूर्विशा राम या भारताच्या दुसर्‍या क्रमांकाच्या जोडीला एका स्थानाच्या नुकसानासह ३९व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. मिश्र दुहेरीत वेंकट गौरव प्रसाद व जुही देवांगण यांनी सहा स्थानांनी वर सरकताना ५६वे स्थान पटकावले आहे.