भारताचा मलेशियावर विशाल विजय

0
118

>> अंतिम फेरीतील प्रवेशासाठी पाकिस्तानविरुद्ध बरोबरी पुरेशी

भारताने व्यावसायिकतेचे दर्शन घडवत काल गुरुवारी झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतील ‘सुपर फोर’ फेरीतील लढतीत मलेशियाचा ६-२ असा फडशा पाडला. यासह भारताने दिवाळी साजरी करतानाच प्रतिस्पर्धी संघाचे दिवाळं काढले. सामन्याची पहिली तीन सत्रे भारताने गाजवली तर शेवटच्या सत्रात मलेशियाने आपले गोल नोंदविले.

भारताने अल्प अंतराच्या पासेसवर जास्त भर देताना मलेशियाच्या बचावफळीला वेळोवेळी खिंडार पाडले. आकाशदीप (१५वे मिनिट), एस.के. उथप्पा (२४वे मिनिट), गुरजंत सिंग (३३वे मिनिट), एस.व्ही. सुनील (४०वे मिनिट), सरदार सिंह (६०वे मिनिट) व हरमनप्रीत (१९वे मिनिट, पेनल्टी कॉर्नर) यांनी गोल झळकावले. मलेशियाकडून राझी रहीम (५०वे मिनिट) व रोसली (५९वे मिनिट) यांनी गोल केले. आत्तापर्यंत या स्पर्धेत अपराजित कामगिरी केलेल्या मलेशियाचा हा पहिलाच पराभव ठरला. या विजयासह भारताने अझलन शाह स्पर्धेतील ०-१ अशा व लंडनमधील वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनल्समधील २-३ अशा पराभवाचा वचपा काढला.

कोरियाची बचावफळी भेदण्यात सातत्याने अपयश आल्यानंतर काल मलेशियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ नवीन रणनीतीसह उतरला. पहिल्या सत्रात पेनल्टी कॉर्नर दवडल्यानंतर रमणदीपच्या पासवर ललित उपाध्याय याने मारलेला जोरदार फटका मलेशियाचा गोलरक्षक कुमार सुब्रमण्यम याने अडविला. हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर काही सेकंदातच मनप्रीत सिंग याच्या अचूक पासवर आकाशदीप याने गोल नोंदवून पहिले सत्र संपण्यापूर्वी भारताचे खाते उघडले. तंगू ताजुद्दीन याने यानंतर मलेशियाला बरोबरी साधून देण्याची सोपी संधी वाया घालवली. दुसर्‍या सत्रात मलेशियाने काही प्रमाणात भारतीय आघाडीपटूंना रोखत चेंडूवर जास्त वेळ ताबा राखला. या सत्रात त्यांना दोन पेनल्टी कॉर्नरदेखील मिळाले. परंतु, भारताची भक्कम बचावफळी त्यांना एकदाही भेदता आली नाही.

भारताला मिळालेल्या तिसर्‍या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने जोरदार फ्लिकद्वारे भारताची आघाडी २-० अशी केली. सुनीलने दिलेला पास मलेशियाच्या बचावपटूला लागून मिळाल्यानंतर उथप्पाने या चेंडूवर ताबा मिळवत भारताचा तिसरा गोल केला. उथप्पा, ललित व आकाशदीप यांनी उजव्या बगलेतून रचलेल्या चालीवर गुरजंतने भारताचा चौथा गोल फलकावर लगावला. गुरजंतची रिव्हर्स हिट थोडक्यात हुकल्यानंतर याच चेंडूवर नियंत्रण राखून सुनीलने भारताला ५-० अशी आघाडी मिळवून दिली. मलेशियाच्या संघाला या सामन्यात ८ पेनल्टी कॉर्नर लाभले. परंतु केवळ राझी याला याचा फायदा घेता आला. शेवटच्या दोन मिनिटांत मलेशियाच्या रोझली याने व भारताच्या सरदार यांनी गोल लगावले. कोरिया व पाकिस्तान यांच्यात काल झालेला दुसरा सामना १-१ असा बरोबरीत राहिला.
शनिवार २१ ऑक्टोबर रोजी भारत व पाकिस्तान यांच्यात ‘सुपर फोर’मधील शेवटचा सामना होणार असून गोलफरक + ४ असल्याने अंतिम फेरीतील प्रवेशासाठी भारताला केवळ बरोबरीसुद्धा पुरेशी आहे.