भारताचा निसटता पराभव

0
93

जोहोर बाहरू
सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेतील आपल्या शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात भारताला काल ब्रिटनकडून २-३ असा निसटता पराभव पत्करावा लागला. यामुळे सलग चार विजय मिळविलेल्या भारताची अपराजित घोडदौड खंडित झाली. कालच्या सामन्यापूर्वीच भारताने आपला अंतिम फेरीतील प्रवेश नक्की केल्याने निकालाचा परिणाम झाला नाही. १२ गुणांसह भारतीय संघ पहिल्या स्थानी असून पाच सामन्यांतून ३ विजयांसह १० गुण घेत ब्रिटनचा संघ दुसर्‍या स्थानी आहे. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला विष्णूकांत सिंग याने पेनल्टी कॉर्नरचे गोलांत रुपांतर करत भारताचे खाते उघडले. पुढच्याच मिनिटाला कॅमेरून गोल्डन याने ब्रिटनला १-१ अशी बरोबरी साधून दिली. दुसर्‍या सत्रात विसाव्या मिनिटाला शिलानंद लाक्रा याने भारताला २-१ असे आघाडीवर नेले. तिसरे सत्र मात्र ब्रिटनने गाजवले. ढिसाळ बचावाचा फायदा घेत त्यांनी लागोपाठ पेनल्टी कॉर्मर आपल्या पदरात पाडून घेतले. यातील एकावर स्टुअर्ट रशमेर याने गोल करत संघाला २-२ असे बरोबरीवर आणले. ५१व्या मिनिटाला कर्णधार एडवर्ड मे याने इंग्लंडला सामन्यात प्रथमच आघाडीवर नेले. हाच गोल विजेता ठरविण्यास पुरेसा ठरला.