भारताचा केनियावर ३ गोलांनी विजय

0
93

>> अंतिम फेरीत प्रवेश

>> शतकी सामन्यात सुनील छेत्रीचे दोन गोल

>> पुढील सामना न्यूझीलंडशी

चार देशांच्या इंटरकॉंटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील काल सोमवारी झालेल्या सामन्यात भारताने केनियाचा ३-० असा पराभव केला. आपला ऐतिहासिक शतकी सामना खेळणार्‍या टीम इंडियाचा कर्णधार सुनील छेत्रीने या सामन्यात दोन गोल (६८वे मिनिट व ९०+ २ मिनिट) नोंदविले. जेजे लालपेखलुआ याने ७१व्या मिनिटाला गोलजाळीचा वेध घेतला. या विजयासह भारताने सरस गोलांच्या बळावर एक साखळी सामना शिल्लक असताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

चायनीज तायपेईविरुद्ध विजय मिळविलेला संघ कायम ठेवण्याचा निर्णय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी घेतला. त्यामुळे जेजे लालपेखलुआ याने आपली आक्रमक भूमिका या सामन्यातही कायम राखली. केनियाने संघात दोन बदल केले. आघाडीपटू जॉन माकवाटा याची जागी ओधियांबो डेनिस याने घेतली तर एरिक ओउमाच्या जागी तिमोथी ओमवेंगा मैदानात उतरला. सातव्या मिनिटाला डाव्या बगलेतून विंगर उदांता सिंग याने केनियाच्या काही खेळाडूंना हुलकाकावणी देत आगेकूच केली. परंतु, १८ यार्ड बॉक्समध्ये चेंडू देण्यास थोडी घाई केल्याने केनियाच्या बचावफळीने हा प्रयत्न हाणून पाडला.

पहिल्या पंधरा-वीस मिनिटांचा खेळ झालेला असताना मुसळधार पावसामुळे उभय संघातील खेळाडूंना चेंडूवर ताबा मिळविणे कठीण झाले. विशेषकरून पाहुण्या संघातील खेळाडूंना चेंडूच्या टप्प्याचा अंदाज बांधणे कठीण होत गेले. याचाच फायदा घेत सुनील छेत्रीने चेंडूवर ताबा मिळवून केनियाचा गोलरक्षक मातासी याला हुलकावणी दिली. परंतु, छेत्रीचा तिरकस फटका गोलपोस्टवरून गेला. यानंतर काही मिनिटांतच भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग याने डावीकडे झेपावत केनियाचा मध्यरक्षक ओमोटो याचा फटका अप्रतिमरित्या अडविला. पहिल्या सत्रात सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने प्रेक्षक नाराज झाले. दुसर्‍या सत्रात ्‌उभय संघांनी वेगवान सुरुवात केली. सत्राच्या सुरुवातीलाच केनियाच्या ओचिएंग व मोतांबी यांनी मारलेले फटके दिशाहीन ठरले. ५१व्या मिनिटाला छेत्रीने रचलेल्या पासवर मिझोरमच्या जेजेने लगावलेला फटका गोलजाळीपासून खूप दूर राहिला. ६८व्या मिनिटाला भारताने पहिला गोल केला. किबवागे याने बॉक्समध्ये छेत्रीला पाडल्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर छेत्रीने गोलजाळीच्या उजव्या कोपर्‍यात चेंडूला दिशा दाखवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. होलिचरण नार्झरे याचा क्रॉस केनियाच्या बचावफळीने अडवल्यानंतर जेजे याने या चेंडूवर ताबा मिळवत आपल्या ताकदीच्या जोरावर ७१व्या मिनिटाला संघाची आघाडी २-० अशी फुगवली.

सामन्याच्या भरपाई वेळेत गाफिल असलेल्या केनियन बचावफळीला कोंडीत पकडताना बलवंतच्या साहाय्याने छेत्रीने स्वतःचा दुसरा व संघाचा तिसरा गोल केला.
छेत्रीचा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी मुंबई एरिना स्टेडियम खचाखच भरले होते. माजी कर्णधार बायचुंग भुतिया, भारताचे दिग्गज खेळाडू आयएम विजयन, भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल, सिने अभिनेता अभिषेक बच्चन या नामांकितांनी भारतीय फुटबॉल संघाचा विजयाचा आनंद लुटला. भारताचा पुढील सामना ७ जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.