भाजप पक्षसंघटन बांधणीसाठी खास मोहीम राबवणार

0
123

>> मार्च – एप्रिल महिन्यात मोहीम

>> भाजप मुख्यालयातील बैठकीत ऊहापोह

भारतीय जनता पक्षातर्फे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मार्च व एप्रिल महिन्यात पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी खास मोहीम राबविण्यात येणार आहे.

भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी घेण्यात आलेल्या पक्षाचे मंत्री, आमदार, राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, मंडळ समित्यांचे अध्यक्ष व सरचिटणीस यांच्या संयुक्त बैठकीत आगामी पक्ष संघटनात्मक बांधणी कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. तसेच ६ एप्रिल रोजी स्थापना दिवस साजरा करण्यावर विचारविनिमय करण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी मुंबईला जाण्यापूर्वी केलेल्या चर्चेची माहिती दिली. सरकारी कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सरकारी अधिकार्‍यांना केलेल्या विविध सूचनांची माहिती पक्षाच्या पदाधिकार्‍यांना दिली. तसेच मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशाची माहिती त्यांनी दिली.

उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन केले. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या गैरहजेरीत सरकारी कामकाज हाताळण्यासाठी केलेल्या पर्यायी व्यवस्थेची माहिती दिली. पक्षसंघटन बळकट करण्यासाठी आगामी मार्च व एप्रिल महिन्यातील मोहिमेमध्ये मंडळ स्तरावर जास्त भर देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यशासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे असे पार्सेकर म्हणाले. यावेळी पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांची उपस्थिती होती. दामोदर नाईक यांनी सूत्रसंचालन केले.