भाजप जि. पं. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविणार

0
139

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची माहिती

जिल्हा पंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, अशी माहिती भाजपचे नवे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेल्या तानावडे यांनी काल संध्याकाळी मिरामार येथील दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्याबरोबर पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात हेही हजर होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना तानावडे म्हणाले, की लवकरच होणार असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुका भाजप पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकांसाठीची सध्या भाजप तयारी करीत असून या निवडणुकीत पक्षाला बहुमत प्राप्त होईल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या तानावडे यांच्याबरोबर यावेळी पक्षाचे सुमारे ९५ कार्यकर्ते हजर होते. त्यात पणजीचे महापौर व नगरसेवक शुभम चोडणकर तसेच भाजपच्या अन्य काही नगरसेवकांचाही समावेश होता.

पुढील विधानसभेत भाजपला
३० जागा मिळणार ः मोन्सेरात
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला ३० जागा मिळतील, असा विश्‍वास काल पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळावरून पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आणखी दोन वर्षांनी गोव्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत पक्षाला ३० जागा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण न होण्याचे कारणच नाही असे सांगून त्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री व आमदार हे एकत्रित येऊन काम करणार असल्याचे मोन्सेरात यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.