भाजप खासदारांचे धरणे हा मोठा विनोद ः कुतिन्हो

0
75

सत्ताधारी भाजप खासदारांचे लाक्षणिक धरणे हा मोठा विनोद आहे. केंद्रातील भाजप सरकार लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज चालविण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपने आपल्या अपयशाचे खापर कॉंग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न चालविला आहे, अशी टीका गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी कॉँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

देशात अन्याय, अत्याचार होणार्‍या दलितांना न्याय मिळत नाही. कॉंग्रेस पक्षाने दलितांवरील वाढत्या अत्याचार व अन्यायावर आवाज उठविण्यासाठी लाक्षणिक उपोषण केले होते. तर, भाजपला लोकसभेतील कामकाज चालविता येत नाही, यासाठी धरणे धरावे लागत आहे, ही खेदाची बाब आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या कामात व्यत्यय का येत आहे ? याबाबत भाजपने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही कुतिन्हो यांनी सांगितले.

गोवा भाजपच्या खासदारांनी आपला कामकाज अहवाल जनतेसमोर सादर केला पाहिजे. भाजपचे दक्षिण गोव्यातील खासदार नरेंद्र सावईकर यांनी मतदारांची एकदम निराश केली आहे, अशी टीका ऍड. कुतिन्हो यांनी केली.

कँटीन खासगीकरणास विरोध
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची कॅन्टीन सेवा बड्या कंपनीला देण्यास महिला कॉंग्रेसने विरोध दर्शविला आहे. गोमेकॉतील विविध सेवांचे खासगीकरण केले जात आहे. औषधालयाचे खासगीकरण करून बाहेरील कंपनीला काम देऊन स्थानिकांना बेरोजगार बनविले आहे, असे सावित्री कवळेकर म्हणाल्या