भाजपा – सेनेवर राजकारण्यांची अतिवृष्टी

0
159
  • ल. त्र्यं. जोशी

भाजपा आता केवळ कार्यकर्ताधिष्ठित पक्ष राहिला नसून तो जनाधिष्ठित पक्ष बनला आहे. आणि लोकशाहीत तेच अपेक्षितही आहे. पक्ष केवळ कार्यकर्ताधिष्ठित असणे ही काही लोकशाहीत भूषणावह बाब समजता येणार नाही. त्याचा जनाधार वाढण्यासाठी प्रयत्न तर अखंड सुरुच असतो व तो तसा व्हायलाही पाहिजे..

महाराष्ट्र सध्या अतिवृष्टी आणि महापूर यांनी ग्रस्त आणि त्रस्त असला तरी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना सत्तारुढ भाजपा आणि शिवसेना यांच्यावर राजकीय कार्यकर्त्यांची अतिवृष्टी होत असल्याचा अनुभव त्या राज्यातील अकरा कोटी जनता घेत आहे. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाने महाराष्ट्रावर कृपा केली आणि तो मन:पूर्वक बरसू लागला. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांबरोबरच राज्यातील नद्याही दुथडी भरुन वाहू लागल्या. महापुराचे तडाखेही काही ठिकाणी लोकांना बसले, पण या नैसर्गिक आपत्तीतही राज्यातील सत्तारुढ भाजपा सेना महायुतीला मात्र नवीन कार्यकर्त्यांचा जणू महापूरच आला आहे. विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून या महापुराचे पाणी भाजपा-सेनेच्या आवारात एवढ्या प्रचंड प्रमाणात घुसत आहे की, शेवटी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हा प्रवाह थोपविण्यासाठी पुढे यावे लागले आणि त्यांच्या समर्थकांना पवारांच्या नावाने आणाभाका घेण्यास भाग पाडण्यात आले. राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिन अहीर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने सुरू झालेला हा सिलसिला नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आधारस्तंभ आमदार संजीव नाईक यांच्या ५२ नगरसेवकांसह भाजपातील प्रवेशाने पुढे कसा सरकला हे लक्षात येत नाही, तोच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, त्यांंचे आमदारपुत्र वैभव पिचड, छत्रपतींच्या वंशातील सातार्‍याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही कमळप्रदेशात प्रवेश केला आणि महाराष्ट्राचे राजकारण अक्षरश: ढवळून निघाले. राज्याचे ज्येष्ठ मंत्री व प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत होते, तेव्हा काही लोकांना ती राजकीय चाल वाटत होती, पण आता राजकीय कार्यकर्त्यांचा महापूर भाजपा-सेनेच्या दिशेने वाहू लागत असल्याचे जेव्हा प्रत्यक्षात अनुभवास येत आहे.

खरे तर समाजातील सार्वजनिक कार्यकर्ते जेव्हा राजकारणात एखाद्या पक्षाची निवड करतात तेव्हा ती सत्तापदांसाठीच असल्याचे आपण गृहित धरतो. आतापर्यंतचा अनुभवही तसाच आहे. मंत्रिपद मिळविण्यासाठी पक्षांतराचा आश्रय घेणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत. काहींनी तर आपले पक्षच मोठ्या राजकीय प्रवाहात विसर्जित करुन टाकल्याचे आपण पाहिले आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीने तर असे अनेक नेते पचविण्याचा प्रयत्न केला आहे, पण आज त्या पक्षांची राजकारणातली पत घसरली आहे. तेथे राहून विजय प्राप्त करण्याची शक्यता तर जवळपास शून्यावर येऊन पोचली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी तिकिट मिळवून भद्रावतीचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर भलेही लोकसभेवर निवडून गेले असतील, पण महाराष्ट्रात कॉंग्रेसचे एकमेव कॉंग्रेस खासदार ठरल्याने त्यांनाही आता बहुधा पश्चात्ताप होत असेल. त्यामुळे ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीनुसार राजकीय कार्यकर्त्यांचा ओघ भाजपा-सेनेकडे वळत असेल तर ते स्वाभाविकच मानायला पाहिजे. पण कॉंग्रेस आणि भाजपा ह्या दोन राजकीय संस्कृतींत एवढा फरक आहे की, लोकांचे कॉंग्रेसमध्ये जाणे व भाजपामध्ये जाणे यातील अंतर लक्षात घ्यावेच लागते. दोन राजकीय संस्कृतींमधील लक्षणीय फरक म्हणजे कॉंग्रेसने घराणेशाही आत्मसात केली आहे. राहुल व प्रियंका यांनी कॉंग्रेसाध्यक्ष होण्यास नकार दिल्याने त्या पक्षाची स्थिती आज कशी झाली आहे हे आपण पाहतोच. सेनेमध्येही ती आहे असे म्हणता येईल, पण भाजपाला मात्र तिचा स्पर्श झालेला नाही, किमान राष्ट्रीय व राज्य पातळ्यांवर तर नाहीच नाही अशी स्थिती आहे. अन्यथा अमित शहांनंतर त्यांचे सुपुत्र वा रावसाहेब दानवेंनंतर त्यांचे सुपुत्र अध्यक्ष बनू शकले असते. पण तसे घडलेले नाही. भाजपाची राजकीय संस्कृती ही कार्य आणि कार्यकर्ता यावर उभी झाली आहे. त्यामुळे आपण एवढे नक्कीच म्हणू शकतो की, भाजपाची कॉंग्रेस सहजासहजी आणि इतक्या लवकर होऊच शकणार नाही. ताजेच उदाहरण द्यायचे झाल्यास भाजपात नुकताच प्रवेश केलेल्या आमदार रणजिंतसिंह मोहिते पाटील यांना प्रथम माढा मतदारसंघाचे तिकिट दिले जाणार होते. पण नंतर त्यांच्याऐवजी दुसर्‍या नेत्याला तिकिट देण्यात आले. पण डॉ. सुजय विखे पाटील यांना लोकसभेचे तिकिट तर देण्यात आले, पण मंत्रिपदासाठी त्यांचा विचार झालेला नाही. वातावरण पाहून त्यांनीही तसा आग्रह धरला नाही.
राष्ट्रवादीतून येणार्‍या आमदारांचे प्रमाण वाढू लागल्याने भाजपाचे जुने व ‘निष्ठावंत’ कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याच्या बातम्या आल्या. अर्थात नावे कुणाचीच दिली नव्हती. ‘आम्ही काय नेहमीसाठीच सत्रंज्या उचलण्याचे काम करायचे काय?’ असे प्रश्नही त्या कथित कार्यकर्त्याच्या तोंडी घालण्यात आले होते. मुळात आता सत्रंज्याच राहिलेल्या नाहीत. त्यांची जागा खुर्च्यांनी घेतली आहे. एकेकाळी जनसंघाचे वा भाजपाचे कार्यकर्ते चुरमुरे खाऊन प्रचारकार्य करीत होते. आता चुरमुरेही राहिले नाहीत. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांची खूप आलीशान नव्हे पण चहापाण्याची, भोजनाची व्यवस्थाही निवडणूक काळात केली जाते. मग ह्या सत्रंज्या आल्या कुठून? त्या विरोधी पक्ष वा विरोधी माध्यमे यांच्या डोक्यातूनच येऊ शकतात.

भाजपा आता केवळ कार्यकर्ताधिष्ठित पक्ष राहिला नसून तो जनाधिष्ठित पक्ष बनला आहे. आणि लोकशाहीत तेच अपेक्षितही आहे. पक्ष केवळ कार्यकर्ताधिष्ठित असणे ही काही लोकशाहीत भूषणावह बाब समजता येणार नाही. त्याचा जनाधार वाढण्यासाठी प्रयत्न तर अखंड सुरुच असतो व तो तसा व्हायलाही पाहिजे. त्यामुळे काही समस्या अवश्य निर्माण होतील, पण पक्षाची विचाराधिष्ठित, अनुशासनबद्ध कार्यप्रणाली कायम राहिली तर त्या स्थितीतूनही मार्ग निघत जातो हेही भाजपाने सिध्द केले आहे. प्रारंभी ही कार्यसंस्कृती रुजवायला वेळ लागतो. काही भावनात्मक प्रश्नही उभे केले जातात, पण एकवेळ व्यवस्था उभी झाली की, त्यांची तीव्रता कमी होते. ७५ वर्षे वयावरील कार्यकर्त्यांना लोकसभेची तिकिटे देऊ नयेत याचे सूतोवाच भाजपाने २०१४ मध्येच केले होते. पण पक्षाची गरज म्हणून त्यावेळी अडवाणी, मुरलीमनोहर यांना तिकिटे देण्यात आली होती. २०१९ मध्ये ती देण्यात आली नाहीत. थोडीशी खळखळ जरुर झाली पण ती आता २०२४ मध्ये व्हायची नाही, कारण तो बदल व्यक्तिसापेक्ष नाही तर व्यवस्थात्मक आहे. तसेच तिकिटवाटपाच्या बाबतीतही होऊ शकते. एका पदासाठी एका कार्यकर्त्याला दोनपेक्षा अधिक वेळा तिकिट द्यायचे नाही अशी व्यवस्था होऊ शकते. त्यातून कार्यकर्त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया अखंडपणे चालू शकते व नवनव्या कार्यकर्त्यांना संधीही मिळू शकते. त्यामुळे कथित जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या भरतीबद्दल शंका वा चिंता बाळगण्याचे कारण नाही. आतापर्यंत भाजपात जनसंघ वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नसलेले अनेक कार्यकर्ते आले आहेत, पण त्यांनी कधी समस्या निर्माण केल्यात असे सामान्यत: झाले नाही. न पटल्याने ते शौरी, सिन्हांसारखे बाहेर गेले असतील, पण भाजपासाठी त्यांनी अंतर्गत समस्या निर्माण केल्या नाहीत. आणि पक्षाने विकसित केलेल्या कार्यसंस्कृतीत त्या निर्माण होऊही शकत नाहीत.त्यामुळे पक्षात नव्याने प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचा कुणी धसका घेण्याचे कारण नाही.