भाजपाध्यक्ष अमित शहा भेटले उद्धव ठाकरेंना

0
102

शिवसेना व भाजप यांच्यातील संबंधांमध्ये अलीकडील काळात बरीच कटुता निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत काल संध्याकाळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. उभय पक्षांदरम्यानचे मतभेद संपवून आगामी २०१९ लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्यात येईल असे अमित शहा यांनी स्पष्ट केले असल्याचे वृत्त दूरचित्रवाणी वाहिन्यांनी दिले आहे. मात्र त्याआधी शिवसेनेचे मुखपत्र दै. सामनाच्या कालच्या अंकात शिवसेना आगामी सर्व निवडणुका एकट्याने लढवणार असल्याचे वृत्त दिले आहे. कालच्या शहा-ठाकरे भेटीत काय नेमके ठरले त्याबाबत अधिकृत वृत्त उपलब्ध झाले नाही. सुमारे पावणेदोन तास ही बैठक चालली.

महाराष्ट्रात तसेच केंद्रातही शिवसेना सत्तेतील घटक पक्ष आहे. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार राऊत जाहीरपणे दोन्ही सरकारांच्या धोरणांवर जाहीर टीका सातत्याने करत आले आहेत. यामुळे भाजपात बरीच अस्वस्थता असल्याने कालच्या ठाकरे-शहा भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यातच गेल्या २८ मे रोजी महाराष्ट्रातील पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेनेने आपला उमेदवार उभा करून भाजपची दमछाक केली होती.