भाजपातही घराणेशाही सुरू ः आप

0
108

>> इव्हीएम यंत्र सुरक्षेविषयी संशय

कॉंग्रेस पक्षाप्रमाणे भाजपने सुध्दा घराणेशाहीची परंपरा सुरू केली आहे. म्हापसा येथे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सीस डिसोझा यांच्या पुत्राला उमेदवारी दिली आहे. आता, पणजीमध्ये दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पुत्राला उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे काही आमदारांचे पक्षांतराचे राजकारण सुरू असून आम आदमी पार्टी पणजीतील मतदारांना चांगला पर्याय घेऊन आलेली आहे, अशी माहिती आपचे राज्य समन्वयक एल्वीस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
आम आदमी पार्टीने समाज हिताला प्राधान्य दिले आहे. नवी दिल्लीत आपचे सरकार कार्यरत असून मागील चार वर्षात जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्‍वासनांची पूर्तता केली आहे, असेही गोम्स यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या मतदानाबद्दल संशयाचे वातावरण असल्याने व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के मतांची मोजणी झाली पाहिजे, अशी मागणी गोम्स यांनी केली. मतदानाच्या पूर्वी घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिक आणि मतदानाच्या वेळी मतदान यंत्र नादुरुस्त होण्याचे अनेक प्रकार उजेडात आल्याने मतदानाबाबत मनात संशय निर्माण होत आहे, असेही गोम्स यांनी सांगितले.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुका पातळीवरील मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये वेळेवर आणण्यात आली नाही. मतदान यंत्रे सुमारे दहा तास बसगाड्यांमध्ये होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेबाबत सरकारी अधिकारी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे, असे आपचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी सांगितले.