भाजपाचा गुजरातमधील ‘चिंताजनक’ विजय

0
115
  • ल. त्र्यं. जोशी
    (नागपूर)

या विजयाचे महत्त्व कमी करण्याचा माझा हेतू निश्चितच नाही, पण हा विजय असाही नाही की, त्याचे गोडवे गाऊन पक्षाने २०१८ किंवा २०१९ बाबत निश्चिंत व्हावे. आपण स्वीकारलेल्या मतदानप्रणालीमुळे या विजयाला विजय म्हणता येईल एवढेच त्याचे महत्त्व

‘शेवटी विजय हा विजयच असतो’ किंवा ‘जो जिता वही सिकंदर’ या उक्तीनुसार गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा विजय हा शंभर टक्के विजयच असला तरी त्या पक्षासाठी हा ‘विजय’ चिंताजनकच आहे, या वस्तुस्थितीमध्ये काहीही फरक पडत नाही. असे म्हणून या विजयाचे महत्त्व कमी करण्याचा माझा हेतू निश्चितच नाही, पण हा विजय असाही नाही की, त्याचे गोडवे गाऊन पक्षाने २०१८ किंवा २०१९ बाबत निश्चिंत व्हावे. आपण स्वीकारलेल्या मतदानप्रणालीमुळे या विजयाला विजय म्हणता येईल एवढेच त्याचे महत्त्व, कारण या प्रणालीत विजय जागांमध्ये मोजला जातो. म्हणूनच पराभवाची खात्री पटताच राहुल गांधींनी तो मान्य केला आणि विजयाची खात्री पटताच अमित शहांनी ११ अशोका मार्गाच्या दिशेने कूच केले. आमच्या मतांमध्ये वाढ झाली किंवा आमचे मतांचे प्रमाण कमी झाले नाही हे कार्यकर्त्यांची समजूत घालायला सोयीचे असले तरी त्यामुळे विजयाला पराभव वा पराभवाला विजय म्हणता येत नाही. कारण आपल्या प्रणालीलाच ते मान्य नाही.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिटंन यांना डोनाल्ड ट्रम्पपेक्षा काही लाख जास्त मते मिळाली, पण त्यांच्या प्रणालीत विजय राज्यांमध्ये मोजला जातो व राज्ये मतदारांच्या बहुमताने जिंकली जातात. त्यामुळे ट्रम्प विजयी ठरले व हिलरी पराभून घोषित झाल्या. आपली मतदानप्रणाली खांबाला जो लवकर जाऊन शिवतो त्याला विजयी मानते. एकंदर मतदारांमध्ये तो अल्पमतात असला तरीही. सर्वच पक्षांना या प्रणालीचा सारखाच लाभ किंवा तोटा होतो हे सर्वांना मान्य आहे.
गुजरातमधील विशिष्ट परिस्थितीमुळे आणि राहुल गांधी यांनी फारशा गंभीर चुका न केल्याने ही निवडणूक भाजपाला जडच गेली हे कुणालाही अमान्य करता येणार नाही. अन्यथा पंतप्रधानांच्या ३४ सभा घेण्याची, अर्धा डझन केंद्रीय मंत्री व काही मुख्यमंत्री प्रचारात उतरवण्याची, विविध प्रांतातील नेते व कार्यकर्ते यांना गुजरातेत बोलावण्याची पाळी त्या पक्षावर आलीच नसती. पुढील वर्षी निवडणूक होणाजया राज्यात आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही अशी परिस्थिती निर्माण होणारच नाही याची हमी कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळेच भाजपाचा गुजरातमधील विजय भाजपासाठी ‘चिंताजनक’ ठरतो.

तरीही भाजपाच्या या विजयाचे महत्त्व कमी होत नाही. कारण ज्या परिस्थितीत त्याने हा विजय मिळविला ती पाहता हा विजयही आशाजनकच आहे. कारण बावीस वर्षांची इन्क्म्बन्सी असताना, भाजपाचे त्या राज्यातील आधारस्तंभ पाटीदार, ओबीसी व बर्‍याच प्रमाणात दलित विरोधात गेले असतांना, जीएसटी व नोटबंदी यामुळे व्यापारी वर्गही नाराज असतांना भाजपाने हा विजय मिळविला हे काही कमी महत्वाचे नाही. मग त्याचे श्रेय कुणाचे हा प्रश्न उरतोच.

मोदींनी ३४ सभा गाजविल्या हे खरेच, पण तेवढेच महत्वाचे हेही आहे की, अमित शहा यांनी मतदारयादीच्या पानप्रमुखपदापासून उभारलेल्या बुथयंत्रणेकडेही विजयाचे तेवढेच श्रेय जाते. मोदींचे वक्तृत्व आणि बुथप्रणालीचे कर्तृत्व यांचा सुरेख समन्वय म्हणजे हा विजय आहे.
इतर कोणत्याही निवडणुकीप्रमाणेच गुजरात निवडणुकीचे विश्लेषणही शंभर पध्दतींनी करता येणे शक्य आहे, पण आपल्याला अतिसुलभीकरणाची सवय लागल्याने आपण एकेका पध्दतीनेच तिचे विश्लेषण करतो व तेच खरे आहे असे मानतो. त्यामुळे कुणाला या निकालात मोदींचा पराभव वाटतो, तर कुणाला राहुल गांधींचा नैतिक विजय वाटतो. कुणी मतदारांनी जीएसटी व नोटबंदी नाकारली असे म्हणेल तर कुणी आनंदीबेन पटेल व विजय रुपाणी यांच्यावर दोषारोपण करील. कुणाला हा २२ वर्षांच्या इन्क्म्बन्सीचा पराभवही वाटेल. तरीही बरे की, या निवडणुकीत राहुल गांधी यांनी ‘सेक्युलर’ हा शब्द एकदाही वापरला नाही आणि मंदिरात जाऊन कथित सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेतला. नाही तर तो धर्मनिरपेक्षतेचा पराभव वा हिंदुत्वाचा विजयही ठरला असता. पण असे होत नाही. निवडणूक निकालाची हजार कारणे असतात व तीच तपासली जाऊन त्यांचा लसावि काढायचा असतो.

काही कोटींच्या संख्येत मतदार असतात व त्यापैकी बहुतेकांचा स्वत:चा असा जाहीरनामा असतो. त्याला अनुसरुन ते मतदान करीत असतात. त्यामुळे विजय नेमका कुणाचा व पराभवही नेमका कुणाचा हा प्रश्नच असतो. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीचे विश्लेषण ढोबळमानानेच बरोबर वा चूक असते.

मग निवडणुकीचे विश्लेषण करायचे तरी कशाला? पण न करुन चालणार नाही, कारण निवडणूक ही लोकशाहीमधील अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे व ती सुरु असतांना अनेक घटना घडत असतात. त्यामुळे त्या मागच्या कारणांची चिकित्सा होणेही तेवढेच आवश्यक असते. त्या दृष्टीने विचार केला तर कोणतीही निवडणूक ना जाहीरनाम्यांच्या आधारावर होत असते ना मुद्यांच्या आधारावर. त्यांचे महत्त्व मी नाकारत नाही. पण निकालांच्या संदर्भात विचार केला तर निवडणूक ही एक दिवसीय क्रिकेटसारखी असते मग ती विधानसभांची असो की, लोकसभेची. त्या निवडणुकीत राजकीय पक्षांचे संघटन, त्यांचा कार्यक्रम, प्रचार यंत्रणा यांना महत्व असतेच पण निवडणुकीचा निकाल मात्र त्या महिन्यात संबंधित पक्ष वा नेते यांनी आखलेल्या रणनीतीवर अधिक अवलंबून असतो. क्रिकेटपटू एकदम मैदानावर उतरत नाहीत. त्यांना त्यासाठी खूप सराव करावा लागतो. त्या सरावाची कसोटी सामन्यात लागते.
या पार्श्वभूमीवर गुजरातच्या निवडणुकीचा विचार करु या. कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी गेली पाच वर्षे भरपूर सराव केला. आपले कर्णधारही बदलले. त्यानंतर ते एकदिवसीय सामन्यात उतरले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी आघाडी घेतली होती हे निश्चित, कारण त्यांनी आक्रमकपणे प्रचाराची सुरुवात द्वारकाधीश मंदिरापासून केली. याचा अर्थ गुजरातच्या निवडणुकीत उपस्थित होणारा हिंदुत्वाचा मुद्दा निकालात काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यांचा प्रयत्न नकली असल्याचे सोमनाथ दर्शनाच्या वेळी उघड झाले. तिथून त्यांचे गणित चुकत गेले. त्यांनी तथाकथित सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेतल्यामुळे भाजपाला आपल्या हिंदुत्वाचा उघड आधार घेण्याची संधी मिळाली. या संदर्भातच मी राहुल गांधींनी एकदाही सेक्युलर या शब्दाचा वापर केला नाही याकडे लक्ष वेधले.

मोदींच्या विकासाला ‘गाढव’ ठरवित राहुल गांधींनी मोदींना दररोज एक याप्रमाणे विकासविषयक प्रश्न विचारले. आपल्या प्रश्नांची भाजपाने उत्तरे द्यावीत म्हणजेच ते बचावाच्या पवित्र्यात यावेत अशी त्यांची रणनीती होती. पण मतदारांचे मानसशास्त्र असे आहे की, केवळ प्रश्न त्यांच्या लक्षात राहतात. त्यांच्या उत्त्तरांकडे सहसा कुणाचे लक्ष नसते. म्हणूनच विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भानगडीत पडायचे नाही पण आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रतिपक्षाला बाध्य करायचे अशी रणनीती कुशल राजकीय नेते तयार करतात. मोदींनीही तसेच केले. कॉंग्रेसच्या दुर्दैवा्रने म्हणा किंवा भाबडेपणामुळे म्हणा राहुल गांधी त्या रणनीतीत अडकले. तिला कपिल सिब्बल आणि मणिशंकर अय्यर यांनी मोठा हातभार लावला व इथेच कॉंग्रेसचा पराभव झाला. मोदींचा स्मार्टनेस असा की, त्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घेतला आणि कॉंग्रेसला बचावाचा पवित्रा घेण्यास बाध्य केले. उदाहरणच सांगायचे झाल्यास राहुलची अध्यक्षपदी निवड निश्चित झाली असतांना त्यावर भाष्य करण्यासाठी जहांगीर, शहाजहान, औरंगजेब यांचा उल्लेख करण्याची अय्यर यांना काहीही गरज नव्हती. पण त्यांनी तो अभिप्राय व्यक्त केल्यानंतर काही मिनिटांनीच मोदींनी ‘त्यांचे औरंगजीब राज त्यांना लखलाभ असो’ असे म्हणून बाजू पलटवली. मणिशंकरांच्या ‘नीच’ शब्दाने उरलेले काम केले. कारण त्यामुळे गुजरातचा गौरव हा मुद्दा ऐरणीवर आणण्याची संधी त्यांना मिळाली.

आज कॉंग्रेस पक्ष संसदेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कथित अपमानाचा मुद्दा उपस्थित करुन संसदेला वेठीस धरत आहे. पण मोदींनी आपल्या संबंधित भाषणातून एका शब्दानेही डॉ. सिंग यांच्या देशभक्तीबद्दल शंका उपस्थित केली नाही. त्यांनी फक्त मोठ्या चातुर्याने पाकिस्तानच्या माजी लष्करप्रमुखाचे अहमद पटेल विषयीचे ट्विट आणि मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचा पाठोपाठ उल्लेख केला. तो मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न असेलही पण ‘तशी बैठकच झाली नाही’ असे म्हणायला मोदींनी कॉंग्रेसला भाग पाडले नव्हते.तिने बैठक झाल्याचा इन्कार केला आणि दुसजयाच दिवशी इंडियन एक्सप्रेसने बैठकीतील लोकांच्या मुलाखती प्रसिध्द करुन कॉंग्रेसला उघडे पाडले.त्यामुळे बचावाच्या पवित्र्यात आलेल्या कॉंग्रेसला मनमोहन सिंगांच्या कथित अपमानाचा मुद्दा उपस्थित करावा लागला. पण तो पर्यत व्हायचे ते नुकसान होऊन गेले.

तशीच गोष्ट कपिल सिब्बल यांची. वास्तविक अयोध्या प्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सावधगिरी बाळगून बोलायला हवे होते. पण मुस्लिम समाजाला खुष करण्याच्या हेतूने त्या प्रश्नावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत निर्णयच होऊ नये अशी भूमिका त्यांनी कारण नसतांना मांडली आणि भाजपाला त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याची संधी मिळाली.तात्पर्य हेच की, कॉंग्रेसला बचावाच्या पवित्र्यात यायला भाग पाडणारी रणनीती मोदींनी राबविली आणि तिचाच फायदा भाजपाला झाला. त्यामुळे भाजपाच्या विजयात कॉंग्रेसचेही योगदान आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरु नये.

हे सगळे लक्षात घेतले तर निवडणुकीला एकदिवसीय क्रिकेटची दिलेली उपमा किती सार्थ ठरते हे स्पष्ट व्हावे. कारण क्रिकेटचा खेळ हा त्या क्षणाचा खेळ आहे. अन्यथा प्रत्येक सामन्यात वेगवेगळे संघ विजयी किंवा पराभूत झालेच नसते. तिथे एका सामन्यात शतक ठोकणारा खेळाडू दुसजया सामन्यात शून्यावर बादही होऊ शकतो. कारण चेंडूवर बाद होणे किंवा षटकार ठोकणे हे खेळाडूच्या त्या क्षणाच्या निर्णयावर अवलंबून असते. प्रारंभीच्या काळात एकेक, दोनदोन धावा काढणार्‍या मोदींनी उत्तरार्धात कॉंग्रेसच्या दुबळ्या गोलंदाजीवर षटकारामागून षटकार ठोकणे सुरु केले आणि त्याचाच त्यांना लाभ मिळाला. इकडे मोदी षटकार ठोकत होते आणि तिकडे मतदारसंघांमध्ये अमित शहांनी तयार केलेले बुथपातळीवरील क्षेत्ररक्षक कार्यकर्ते आपले काम चोखपणे पार पाडत होते, कारण जाहीर प्रचारापेक्षाही निवडणुकीत मतदारांशी संपर्क साधण्यापासून मतदानकेंद्रांवर आणण्यापर्यंतची अतिशय महत्वाची कामे क्षेत्ररक्षक कार्यकर्ते करीत असतात. त्यामुळे त्यांचेही योगदान मोदींच्या योगदानाइतकेच महत्वाचे ठरते.

पण भाजपाची गुजरातसारखी संघटनात्मक शक्ती इतर राज्यांत आहेच असे म्हणता येणार नाही. त्यामुळे २०१८ वा २०१९ च्या निवडणुकींमध्ये भाजपाला अतिशय सावधगिरीने, मतदारांना गृहित न धरता काम करावे लागेल. म्हणून गुजरातमधील विजय त्याच्यासाठी चिंताजनक आहे. अर्थात प्रत्येक निवडणूक तिच्यासारखी तीच असते. एका निवडणुकीसारखी दुसरी निवडणूक असत नाही. भाजपासाठी समाधानाची बाब एवढीच आहे की, कोणतीही निवडणूक गंभीरपणे व सुयोग्य रणनीतीच्या आधारे लढण्याची त्या पक्षाला सवय आहे.