भाजपला संधी

0
104

राजकीय पोकळी काय असते याचा अनुभव सध्या तामीळनाडूची जनता घेते आहे. दोन वर्षांपूर्वी जे. जयललिता यांचे झालेले निधन आणि नुकतेच एम. करुणानिधी यांचे झालेले निधन या त्या राज्यातील दोन उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या मृत्यूनंतर तामीळनाडूच्या राजकारणात खरोखरच महाकाय पोकळी निर्माण झालेली दिसते आहे. जयललितांचे निधन झाले त्यानंतर काय घडले हे देशाने पाहिले. त्यांच्या मागे पक्षाची धुरा स्वीकारण्यासाठी धडपडणार्‍या त्यांच्या जिवश्च कंठश्च मैत्रीण व्ही. के. शशिकला या बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात अडकल्यानंतर अभाअद्रमुकमध्ये उफाळून आलेली बंडखोरी, त्यातून ओ. पनीरसेल्वम आणि ई पलानीस्वामी अशा दोन गटांमध्ये विभागला गेलेला पक्ष आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टाईने नाट्यमयरीत्या एकत्र आलेले दोन्ही गट यांनी अभाअद्रमुक कार्यकर्त्यांना संभ्रमित करून सोडले होते. आता करुणानिधीही अनंताच्या यात्रेला निघून गेले आहेत. सुदैवाने द्रमुकमध्ये निर्नायकी स्थिती नाही. आपल्या तीन पत्नींपैकी दयालूअम्मांचा दुसरा पुत्र एम. के. स्टालीन याला आपल्या हयातीतच पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष नेमून आणि त्याचा राजकीय प्रतिस्पर्धी असलेला आपलाच पुत्र अलागिरी याची पक्षातून हकालपट्टी करून करुणानिधींनी आपल्या मागून आपल्या पक्षाची वाताहत होऊ नये याची सुस्पष्ट तरतूद करून ठेवलेली आहे. पण स्वतः करुणानिधींनीच स्टालीन यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली आहेत याचा अर्थ द्रविडी अस्मितेच्या राजकारणावर स्वार होत तामीळनाडूमध्ये आणि राष्ट्रीय राजकारणातही प्रदीर्घ काळ आपला प्रभाव दाखवणार्‍या द्रमुकमध्ये सारे काही आलबेल होईल असे म्हणता येत नाही. स्टालीन यांच्यापाशी भले राजकीय पूर्वानुभव असेल, परंतु पक्ष चालवण्याच्या बाबतीत ते तसे अननुभवी आहेत. त्यातही करुणानिधींची छत्रछाया हटलेली असल्याने घरचे भेदी असताना पक्षाला एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान आज त्यांच्यापुढे उभे आहे. खरे तर जयललितांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आर. के. नगरच्या पोटनिवडणुकीत स्टालीन यांच्या राजकीय नेतृत्वगुणांची कसोटी लागली होती. आर. के. नगरची ती पोटनिवडणूक झाली तेव्हा जयललितांच्या नंतर दुहीत विभागल्या गेलेल्या अभाअद्रमुकच्या दोन्ही गटांनी आपापले उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. तेथे खरे तर त्या परिस्थितीचा फायदा उठवून स्टालीन यांना द्रमुकचा झेंडा फडकवता आला असता, परंतु तसे घडले नाही. द्रमुक तेथे तिसर्‍या स्थानी फेकला गेला. त्यामुळे स्टालीन यांच्या राजकीय नेतृत्वक्षमतेच्या कसोटीत ते अद्याप सफल ठरलेले दिसत नाहीत. अलागिरींच्या हकालपट्टीनंतर त्यांची रवानगी दूर मदुराईत करण्यात आली, परंतु त्याचा अर्थ आता स्टालीन यांच्या राजकीय अपयशाचे भांडवल करून ते पुन्हा पक्षाच्या केंद्रस्थानी येण्याचा प्रयत्न करणार नाहीत असे नाही. शिवाय करुणानिधींची कन्या कनिमोळी हा तिसरा घटकही स्पर्धेत आहेच. सगळ्यांत महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रातील भारतीय जनता पक्षासाठी तामीळनाडूच्या अभेद्य किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी सध्याची परिस्थिती ही सुवर्णसंधी दिसते आहे. आजवर कन्याकुमारी आणि कोईमतूरपलीकडे भाजपचा भगवा कधी फडकूच शकलेला नाही. खरे तर सध्या अभाअद्रमुकमधील दोन्ही गटांना एकत्र आणून त्यांच्या मागून अप्रत्यक्षपणे केंद्रातील भाजपाच सरकार चालवते आहे. आता द्रमुकमधील अंतर्गत संघर्षाचा फायदाही भाजपा घेतल्यावाचून राहणार नाही. तामीळनाडूच्या राजकारणातील दोन ध्रुव जे. जयललिता आणि एम. करुणानिधी ही दोघेही आता हयात नाहीत. त्यांच्या तोडीची उत्तुंगता लाभलेली नेतेमंडळी दोन्ही पक्षांत नाहीत. त्यामुळे या परिस्थितीचा योग्य फायदा घेत भाजपा दक्षिण दिग्विजयासाठी मुसंडी मारल्याशिवाय राहणारच नाही. तूर्त परिस्थिती आजमावत राज्यामध्ये आपला मुंगीचा शिरकाव करून घेण्यासाठी या दोन्ही पक्षांतील नेत्यांची चुचकारणी चालली आहे एवढेच. हा राजकीय चंचुप्रवेश कधी व्यापक रूप घेईल आणि उर्वरित देशामध्ये ज्या प्रमाणे प्रादेशिक पक्षांची वासलात लावून भाजपाने भगवा फडकवला आहे, तशाच प्रकारे तामीळनाडूच्या द्रविडी राजकारणामध्येही हा उत्तर भारतीय पक्ष आपला प्रभाव निर्माण करील सांगता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेला लोहचुंबक नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पक्षाला लाभलेला आहेच. त्यामुळे आजवरचे द्रविडी राजकारण, तामिळी अस्मिता, पराकोटीचा हिंदीविरोध, ब्राह्मण्यवादाविरुद्धच्या धारणा या सगळ्या विषयांना बाजूला सारणारे व समाजाचे धार्मिक ध्रुवीकरण करणारे नवे विषय हळूहळू तामीळनाडूच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये झिरपू लागतील. कर्नाटकात आज हेच तर चालले आहे. कर्नाटकच्या ज्या किनारी भागामध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले, तेथील ध्रुवीकरणास कारण ठरलेल्या घटना पाहाता तामीळनाडूमध्ये त्यांची पुनरावृत्ती शक्य आहे. ‘तोवरी जंबूक करी गर्जना, जोवरि न देखे पंचानना’ म्हणतात तसे या दोन्ही द्रविडी पक्षांचे झाल्यास नवल नाही!