भाजपच्या मंत्री-आमदारांना मुख्यमंत्री पर्रीकरांच्या सूचना

0
75

येऊ घातलेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर काल भाजप विधीमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या सहकारी आमदार व मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
अधिवेशनाच्या वेळी भाजप आमदारांनी व मंत्र्यांनी सभागृहात पूर्णवेळ बसावे व अर्ध्यावर निघून जाऊ नये, अशी सूचना यावेळी पर्रीकर यांनी केली.
तसेच आमदार-मंत्र्यांनी अधिवेशन काळात आपल्या मतदारसंघातील लोकांना भेटीसाठी सचिवालयात बोलावू नये. तसेच लॉबीमध्ये न येण्याची त्यांना सूचना करावी, असे आदेशही यावेळी त्यांनी दिले.

काल झालेल्या या बैठकीत पावसाळी अधिवेशनातील डावपेचांसंबंधीही चर्चा करण्यात आली. पक्षाचे पाच आमदार कालच्या बैठकीला हजर नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. मंत्री विश्‍वजित राणे व आमदार ग्लेन टिकलो यांच्यासह अन्य काही जणांनी यावेळी अधिवेशनातील डावपेचांसंबंधी उपयुक्त अशा सूचना केल्या.
अमेरिकेहून उपचार घेऊन परतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर काल प्रथमच भाजपच्या सर्व आमदार-मंत्र्यांना भेटले. पर्वरीतील मंत्रालयात काल दुपारी त्यांनी मंत्री-आमदारांसमवेत विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. विरोधकांना विधानसभेत सडेतोड उत्तरे देण्यासाठी रणनितीवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.