भाजपच्या उमेदवारीसाठी मोन्सेर्रात आले होते भाजप कार्यालयात : तेंडुलकर

0
119

बाबुश मोन्सेर्रात पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होऊन दोन-तीन दिवसानंतर भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात आले होते असा गौप्यस्फोट प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यानी काल पत्रकार परिषदेत केला. आम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांना परत पाठवले, असे तेंडुलकर म्हणाले.

२३ मे नंतर राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार स्थापन करून दाखवण्याची भाषा मोन्सेर्रात हे आता बोलू लागले असल्याचे सांगून त्यांच्यात एवढी धमक असेल तर ते भाजपची उमेदवारी मागण्यास का आले होते असा प्रश्‍न तेंडुलकर यांनी यावेळी केला. २३ मे नंतर त्यांनी राज्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन करून दाखवावे, असे आव्हानही तेंडुलकर यांनी यावेळी त्यांना दिले. लोकसभेसाठीच्या दोन्ही जागा तसेच चार विधानसभा मतदारसंघासाठी झालेली पोटनिवडणूक अशा दहाही ठिकाणी भाजपचाच विजय होणार असल्याचे तेंडुलकर म्हणाले. भाजपची उमेदवारी मागायला आलेल्या बाबुश मोन्सेर्रात यांना तुम्ही उमेदवारी का नाकारली, असे विचारले असता कुणालाही उमेदवारी देण्यास आम्ही येथे दुकान उघडलेले नाही असे तेंडुलकर म्हणाले.

भाजपच्या उमेदवारीसाठी
गेलो नव्हतो : बाबुश
आपण पणजी पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मागण्यासाठी भाजप कार्यालयात गेल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या वक्तव्याचा बाबुश मोन्सेर्रात यांनी इन्कार केला आहे. आपण भाजप कार्यालयात गेलो ही गोष्ट खरी आहे. मात्र आपण सतीश धोंड यांची भेट घेऊन त्यांना आपण गोवा फॉरवर्ड पक्ष सोडणार व पोटनिवडणूक लढवणार हे सांगण्यासाठी तेथे गेलो होतो. पणजीच्या भाजपच्या उमेदवारीच्या मागणीसाठी नव्हे. तसेच त्यावेळी तेंडुलकर नव्हते असेही ते म्हणाले.