भाजपची सावध खेळी

0
113

– गुरुदास सावळ
गोवा विकास पार्टीचे आमदार मिकी पाशेको यांची पावणेतीन वर्षांची तपश्‍चर्या अखेर फळाला आली. गोव्यात जे राजकारणी आहेत त्यांत मिकी हे सर्वात तापट आहेत हे आतापर्यंत घडलेल्या घटनांवरून सिद्ध झालेले आहे. वीज खात्याच्या एका अभियंत्याला मारहाणप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून पॅरोलवर सोडले होते. या प्रकरणी वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यात आले आहे. आपल्या मोटरीला बाजू न देणार्‍या कदंबाच्या एका ड्रायव्हरला मारहाण केल्याचे प्रकरण बरेच गाजले होते. अशा या माणसाने मंत्रिपदासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा केली याचेच आश्‍चर्य वाटते.मनोहर पर्रीकर सरकारला गोवा विकास पार्टीच्या आमदारांच्या पाठिंब्याची गरज नसतानाही त्यांनी लेखी स्वरूपात पाठिंबा दिला. आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती; मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चर्चिल आलेमांवांचा पराभव करणार्‍या आवेर्तान फुर्तादो यांना प्राधान्य दिले. आलेक्स सिकेरा या तेवढ्याच बलाढ्य नेत्याचा पराभव करणार्‍या मिकी पाशेको यांच्याकडे दुर्लक्ष केले. म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसौझा यांना वाढदिवसाची भेट म्हणून उपमुख्यमंत्रिपद बहाल करण्यात आले. आपल्याला उपमुख्यमंत्रिपद हवे अशी मागणी बाबुश यांनी कधीच केली नव्हती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वतःहून ही भेट दिली होती. या भेटीचा वापर करून ते मुख्यमंत्रिपदावर दावा करतील याची पुसटशी कल्पना असती तर पर्रीकर यांनी त्यांना कधीच ही भेट दिली नसती. गोव्यातील लोकांनी आपल्याला पाच वर्षांसाठी निवडून दिलेले आहे, त्यामुळे पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहून नंतर नव्या व्यक्तीला संधी देण्याची योजना त्यांनी आखली होती. विधानसभेची आगामी निवडणूक न लढविण्याचा त्यांचा विचार होता. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्याने त्यांना दिल्लीला जावे लागले.
मनोहर पर्रीकर यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले हा तमाम गोमंतकीयांचा सन्मान आहे. एकदा खासदार आणि दोनदा राज्यसभा सदस्य राहूनही खासदार शांताराम नाईक यांना कॉंग्रेस नेत्यांनी साधे राज्यमंत्रिपदही दिले नाही. याउलट भाजपा सरकारने गोव्याला दोन मंत्रिपदे दिली आहेत. त्यामुळे शांताराम नाईक यांचा जळफळाट समजण्यासारखा आहे. त्यांनाही मनातून आनंद झालेलाच असणार. मनातले तोंडावर आणल्यास दिल्लीतील कॉंग्रेसजनांनी त्यांच्यावर टीका केली असती. त्यामुळे शांताराम नाईक यांनी कडवट प्रतिक्रिया दिली असणार.
पर्रीकर यांना दिल्लीला नेण्याचा निर्णय झाल्यावर सभापती राजेंद्र आर्लेकर यांचे नाव श्रेष्ठींच्या विचाराधीन होते. पण माशी कुठे शिंकली हे कळत नाही. ज्येष्ठतेचा कस लावून लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. १९७२ मध्ये भाऊसाहेब बांदोडकर मांद्य्रातून निवडून येऊन मुख्यमंत्री बनले होते. मात्र ऑगस्ट १९७३ मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांचे राजकीय वारस म्हणून रमाकांत खलप निवडून आले. प्रयत्नांची शिकस्त करूनही केवळ उपमुख्यमंत्रिपदापर्यंत ते पोचू शकले. आता परत एकदा मांद्रे मतदारसंघाकडे मुख्यमंत्रिपद चालत आले आहे. त्यामुळे केरी-तेरेखोल पूल, मोपा विमानतळ आणि तुये-कामुर्ली पूल हे तीन मोठे प्रकल्प मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मनोहर पर्रीकर दिल्लीला गेल्याने रिकाम्या झालेल्या जागेवर विष्णू सुर्या वाघ यांची वर्णी लागली असती. मंत्रिपद न मिळाल्याने चिडलेल्या विष्णू वाघ यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध युद्ध पुकारल्याने पक्षाने त्यांना वाळीत टाकले आहे. कला अकादमीचे अध्यक्षपद, गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्षपद काढून घेण्यात आले आहे. कोलवाळ येथे घडलेल्या मारहाण प्रकरणामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले आणि त्यांना कोणतेही पद न देण्याचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे पुढील अडीच वर्षे त्यांना मंत्रिपद किंवा इतर कुठलेही पद मिळण्याची शक्यता नाही असे दिसते. अर्थात राजकारणात कोणत्याही गोष्टी घडू शकतात. मनोहर पर्रीकर दिल्लीला जातील असे कोणाच्या मनातही कधी आलेले नसणार. त्यामुळे उद्या अशीच एखादी अनपेक्षित गोष्ट घडून विष्णू वाघ मंत्री बनले तर आश्‍चर्य वाटण्याची गरज नाही. पर्रीकर दिल्लीला गेल्याने रिकाम्या झालेल्या जागेवर साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांची वर्णी लागणार हे जवळ जवळ निश्‍चित झाले होते. डॉ. सावंत मंत्री झाले असते तर डिचोली आणि सत्तरी तालुक्यांत भाजपाचे आसन अधिक बळकट झाले असते. आणखी दोन वर्षांनी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत राणे पिता-पुत्राला अधिक समर्थपणे तोंड देता आले असते. मात्र साखळीऐवजी मिकी पाशेको यांना प्राधान्य देण्याचा निर्णय संघाच्या विचारमंचाने घेतला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या शपथविधी सोहळ्यात आवेर्तान फुर्तादो यांना डावलण्यात आल्याने त्यांना डच्चू मिळणार की काय अशी शंका लोकांच्या मनात आली होती. पण आता आवेर्तान फुर्तादो आणि मिकी पाशेको यांनाही मंत्रिपद मिळाल्याने ती शंका दूर झाली आहे.
मुख्यमंत्रिपद मिळत नसल्याने उपमुख्यमंंत्री ऍड. फ्रान्सिस डिसौझा यांनी जो त्रागा केला त्यामुळे अल्पसंख्याक समाजात भाजपाची प्रतिमा डागाळली आहे. भाजपा अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे अशी त्यांची भावना होणे साहजिक आहे. त्यावर मात करण्यासाठी आवेर्तानबरोबरच मिकींनाही मंत्री करण्याचा सल्ला विचारमंचने दिला आणि मुख्यमंत्र्यांनी तो मानला. गेल्या अडीच वर्षाची तपश्‍चर्या फळाला येऊन मिकी अखेर मंत्री बनले. आता त्यांना नियंत्रणात ठेवण्याची कठीण कामगिरी पूर्वाश्रमीचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पार पाडावी लागणार आहे. गेल्या चार वर्षांत मिकी पाशेको यांनी अनेक गोष्टींचा अनुभव घेतला आहे. पोलीस कोठडीत जाण्याची पाळीही त्यांच्यावर आली. त्यामुळे या अनुभवातून ते बर्‍याच गोष्टी शिकले असावेत असे मानायला हरकत नाही. पर्रीकर मुख्यमंत्री असते तर मनमानी करण्याची हिम्मत कोणाला झाली नसती. पार्सेकर यांनाही आपले नियंत्रण सिद्ध करावे लागणार आहे.
मार्च २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर २१ जागा मिळविल्या तरी भाजपाचे खंदे नेते दामू नाईक यांना फातोर्डा मतदारसंघात आपटी खावी लागली. ३१ मतदारसंघांत कॉंग्रेसची वाताहात झालेली असताना दिगंबर कामत यांनी आपला मतदारसंघ राखला. अल्पसंख्याकांची मते भाजपाच्या बाजूने वळलेली असली तरी त्यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी अजून बरेच कार्य करावे लागेल असे दिसते. मिकी यांना मंत्रिपद दिल्याने त्यांचा प्रभाव असलेल्या नुवे, बाणावली व कुठ्ठाळी या तीन मतदारसंघांत भाजपाला लाभ होऊ शकतो. त्यासाठी गोवा विकास पार्टी बरखास्त करून मिकींना भाजपात यावे लागेल किंवा भाजपाला गोवा विकास पार्टीकडे युती करावी लागेल. स्व. माथानी साल्ढाणा यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या निधनानंतर श्रीमती एलिना साल्ढाणा भाजपाच्या आमदार आणि मंत्री बनल्या आहेत. कुठ्ठाळी मतदारसंघातील अल्पसंख्याक मतदार जर भाजपाला स्वीकारू शकतात तर नुवे आणि बाणावली मतदारसंघांतील अल्पसंख्याकांना भाजपाची भीती वाटण्याची गरज नाही. भाजपाने मडगाव आणि फातोर्डा मतदारसंघांवर थोडेसे अधिक लक्ष केंद्रित केले तर या दोन्ही मतदारसंघांत भाजपाचा झेंडा फडकवणे फारसे कठीण नाही असे वाटते.
मनोहर पर्रीकर यांनी कायतू सिल्वांना पाठीशी घातले नसते तर एव्हाना त्यांची आमदारकीही गेली असती. कायतू सिल्वा हे पोर्तुगीज नागरिक असल्याचा निवाडा केंद्रीय गृहमंत्रालयाने यापूर्वीच दिलेला आहे. कायतू सिल्वा यांच्या निवडीला आव्हान देणार्‍या ऍड. वालंका आलेमांव यांनी ही कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. त्यामुळे कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होणे अपरिहार्य आहे. कायतू यांच्या नागरिकत्वाच्या प्रश्‍नावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे न्यायालयाने सरकारला कळविलेले आहे. पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केली म्हणून तो पोर्तुगीज नागरिक ठरत नाही अशी भूमिका आता गोवा सरकारने घेतली आहे. आमदार कायतू सिल्वा यांची ही समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत वरिष्ठ अधिकार्‍यांची खास बैठक घेतली. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या बैठकीला उपस्थित होत्या. ही गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसत नसली तरी आता संरक्षणमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर यांना या गोष्टीत रस असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी पोर्तुगीज नागरिकत्व प्रकरणात काहीतरी पळवाट काढून आमदार कायतू सिल्वा यांना वाचविण्याचा प्रयत्न करणार याबद्दल शंका नाही. कॉंग्रेसचे आमदार माविन गुदिन्हो यांच्याप्रमाणेच कायतू सिल्वा मनाने भाजपाचेच बनले आहेत. मिकी भाजपात आले नाही तरी कायतू आज ना उद्या भाजपवासी होणार याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही.
२०१७ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत बार्देश तालुक्यातील हळदोणे आणि कळंगुट मतदारसंघांत भाजपाचे ‘कमळ’ परत फुलेल याची हमी देणे कठीण आहे. कळंगुट मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत जोसेफ सिकेरा यांनी भाजपा उमेदवार आग्नेलो लोबो यांना संपूर्ण पाठिंबा दिला होता. आता या दोघांत विस्तवही जात नाही. गोव्यात सर्वात श्रीमंत असलेली कळंगुट पंचायत जोसेफ सिकेरा यांच्या ताब्यात आहे. कॉंग्रेसचे तिकीट त्यांना मिळण्याची बरीच शक्यता आहे. त्यामुळे आग्नेलो लोबो यांनी विकासकामांचा धडाका लावलेला असला तरी कळंगुटमध्ये भाजपाचे कमळ फुलेल याची शंभर टक्के हमी देणे कठीण आहे. हळदोणे मतदारसंघाचे भाजपाचे आमदार ग्लेन तिकलो अपेक्षेप्रमाणे प्रभाव टाकू शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. ही जागा राखायची असेल तर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना हळदोणे मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. बार्देश तालक्यातील या दोन जागा राखता येतीलच याची खात्री नसल्याने सासष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय भाजपाने घेतला असावा. गोवा विकास पार्टी भाजपात विलीन झाली तर मडगाव व फातोर्डा मतदारसंघ भाजपाच्या खिशात पडतील.
भाजपाचे ‘मिशन सासष्टी’ यशस्वी झाले तर नावेलीचे आमदार आवेर्तान फुर्तादो हेही भाजपात येण्याची बरीच शक्यता आहे. वेळ्ळीचे आमदार बेंजामिन डिसिल्वा हेही आवेर्तान यांच्याच वाटेने जातील असे दिसते. सासष्टी तालुक्यातील भाजपाचे स्थान सुधारले तर २०१७ मध्ये भाजपाची सत्ता परत येईल. त्यामुळेच काही धोके पत्करून मिकी पाशेको आणि आवेर्तान फुर्तादो यांना परत मंत्री करण्यात आले आहे. भाजपाची ही चाल यशस्वी झाली तर गोव्यात कॉंग्रेसची धडगत नाही.