भाजपकडून यापुढेही इव्हीएममध्ये बनवेगिरी केली जाईल ः ममता

0
113

>> लोकसभा निवडणुकांसंदर्भात दिला इशारा

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल तृणमूल कॉंग्रेसचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांना संबोधताना भाजपवर अलीकडील काळात मतदान यंत्रांमध्ये (इव्हीएम) बनवेगिरी केल्याचा आरोप केला. या आरोपाच्या अनुषांगाने त्यांनी राज्यातील निवडणुकांची उदाहरणे दिली.

आपल्या भाषणात ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘सावध रहा… अलीकडील काळात निवडणुकांवेळी भाजपने इव्हीएममध्ये बनवेगिरी केली आहे. आणि यापुढे त्यांच्यातर्फे असे प्रकार केले जातील. नुकत्याच माहेस्तोल्लामधील निवडणुकीवेळी ३० इव्हीएम यंत्रे संशयास्पदरित्या खराब झाली होती. म्हणूनच लक्षात ठेवा, अशा युक्त्या भाजपवाले जिंकण्यासाठी यापुढेही करतील.’

येत्या तीन ते आठ महिन्यांदरम्यान कधीही लोकसभेसाठी निवडणुका होऊ शकतात, असा इशाराही बॅनर्जी यांनी आपल्या पक्षजनांना यावेळी दिला. अलीकडेच प. बंगालात झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये जेथे भाजपची चांगली कामगिरी झाली तेथील सविस्तर अहवालही त्यांनी इव्हीएम बनवेगिरीसंदर्भात मागितला आहे.

बॅनर्जींच्या आरोपांना भाजपची तीव्र हरकत
दरम्यान ममता बॅनर्जी यांनी इव्हीएमसंदर्भात भाजपवर केलेल्या आरोपांबाबत भाजपचे राष्ट्रीय चिटणीस राहुल सिन्हा तीव्र हरकत घेतली आहे. जेव्हा त्यांचा पक्ष जिंकतो तेव्हा ईव्हीएमबाबत त्यांची तक्रार नसते. मात्र ते हरतात तेव्हा इव्हीएम बनवेगिरीचा आरोप ते करतात, असे सिन्हा म्हणाले.