भवताल ः- माती आणि आभाळ

0
166
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

मानवनिर्मित जगात कितीजण आले-गेले, त्यांची नावनिशाणी नाही राहिली. गगनाचा ओलावा, भूमीचे मार्दव आणि कोंभाची लवलव या त्रयीची एकात्मता अभंग राहिली. माती आणि आभाळ यांच्या संगमाचा आदिताल मात्र कायम राहिला आहे.

विश्‍वाची लय सांभाळणारी पंचमहाभूते ः पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. यातील जलतत्त्व पृथ्वीशी निगडित आणि प्रकाशतत्त्व आकाशाशी निगडित. वायुतत्त्व आसमंतात व्यापलेले. त्याचा कधी संचार पृथ्वीतलावर तर कधी आकाशाच्या पोकळीत. ‘मनोजवं मारुततुल्यवेगं’ ही त्याची गती. तो जेव्हा रुद्ररूप धारण करतो तेव्हा सर्वांची दाणादाण उडते. विश्‍वसंहाराची प्रमाथी शक्ती या वायुतत्त्वात आहे. ती जेव्हा पृथ्वीतलावर, जलतत्त्वावर आपली अधिसत्ता गाजवते, तेव्हा विश्‍वाचा ताल आणि तोल बिघडतो. ज्याने त्याने आपापल्या जागी राहण्याने समतोल राखला जातो. ही समलय एकदा का बिघडली की विश्‍वविलयाची पाळी येते.

पण पंचमहाभूतांच्या या आदिशक्तीच्या गहन विषयाकडे न वळता पृथ्वी आणि आकाश यांच्या अतूट नात्याविषयी बोललेलं बरं. कारण तो आपल्या नित्य जिव्हाळ्याचा विषय आहे, थोरांपासून पोरांपर्यंत. आकाशात ढगाचा गडगडाट होतो. लहान मूल घाबरते. मोठी माणसं त्याला सांगतात, ‘‘घाबरू नकोस! आभाळातली म्हातारी जात्यावर भरडते आहे.’’ गडगडाट कमी होतो. दाण्यासारखे पावसाचे थेंब मुलाच्या अंगाखांद्यावर पडायला लागतात. मूल नाचायला लागतं. अन्य मुलंही त्याच्याबरोबर नाचायला लागतात. कागदाच्या होड्या करून त्या पाण्यात सोडतात.

शेतकरी औत घेऊन शेतात जातात. पावसाची सर थांबली की ते घाबरेघुबरे होतात. त्यांचे डोळे आभाळाकडे लागतात. दयाघनाला प्रार्थना करतात.
माती आणि आभाळ!
माती म्हटल्यावर माता आठवते. ती धात्री. ती धरित्री. ती वसुंधरा. गंधवती. रूप-रस-गंध-स्पर्श-नाद या पंचसंवेदनांना नित्यनव्याने जाग आणणारी. ती सृजनशीलतेची आदिशक्ती. या आदिशक्तीत ओलावा, ऊब, थरथर, श्‍वास-निःश्‍वास सारं काही आहे. ते आहेत मृण्मयतेचे. पण ध्यास आहे तो हिरण्यगर्भ आकाशाचा. मातीच्या पुत्रांना आकाशाला स्पर्श करणार्‍या क्षितिजाचा वेध घ्यावासा वाटतो. श्रीपाद कृष्णांनी उगाच ‘महाराष्ट्र गीता’त नाही म्हटलं ः
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथें उणे
आकांक्षांपुढति जिथें गगन ठेंगणें
एरव्ही ‘आकाश’ म्हटल्यावर अवकाशाची पोकळीच उभी राहते. प्रत्येक संज्ञेला एक वजन असते. तिचे म्हणून एक सामर्थ्य असते. स्वतंत्र स्थान असते.
आकाश मंडप पृथिवी आसन| रमे तेथें मन क्रीडा करी॥
या तुकारामांच्या समर्थ वाणीचा स्पर्श या आकाशाला होतो तेव्हा नव्या प्रभेने ते उजळू लागते.

आभाळ म्हटल्याबरोबर आसमंतातील ऊर्ध्वभागी असलेला भाळप्रदेश उभा राहतो. शिवाय सूर्यतेजाची सार्‍या विश्‍वाला अन् ग्रहगोलांना तेजोमयता प्राप्त करून देणारी त्याची आभा आहेच की!
माती आणि आभाळ यांच्यामधील नाते अतूट आहे. अभिजात आहे. सार्‍या सृजनशीलतेचा मूलस्रोत या दोहोंच्या संगमात आहे. अनंत आभाळाची भव्यता, उत्तुंगता आणि मातीचा ओलावा, सखोलता असल्याशिवाय प्रतिभेला रंगरूप प्राप्त नाही होत! नवनवोन्मेषशालिनी हे प्रतिभेचे व्यवच्छेदक लक्षण. अपूर्ववस्तुनिर्माणक्षमता ही प्रतिभेची शक्ती. येथे एकच घटक महत्त्वाचा नाही. पार्थिवता आणि अपार्थिवता यांचे येथे मीलन हवे. मंगेश पाडगावकर या पार्थिवतेचा गौरव पुढील शब्दांत करतात ः
जय जय हे रंग-गंध-नादमयी,
जय जय आकारमयी,
जय जय तारुण्यमयी;
ब्रह्म तुझ्या गर्भातच वाढतसे
विकसतसे… विकसतसे…
जय जय हे पार्थिवते!
जय जय हे पार्थिवते!
स्वांगपरिभ्रमण करीत प्रीतीची ऊब अनुभवण्यासाठी सूर्याची याचना करणार्‍या कुसुमाग्रजांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेतील मनस्विनी पृथ्वीचा विसर कुणाला पडेल बरे?
…गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनिया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा
इथे ती सृजनशील आत्म्याला अभिप्रेत असलेली पार्थिव-अपार्थिवाची गळामिठी आहे. ती केवळ पृथ्वी आणि आभाळातील सूर्य यांची अधुरी प्रेमकहाणी राहत नाही; प्रेयस-श्रेयस यांच्या संघर्षात श्रेयसाकडे झेपावणारी मनोधारणा येथे उत्कटतेने व्यक्त झाली आहे असेही वाटायला लागते. एखादी कविता एकच भावसत्य सांगत नाही; अनेक भावसत्ये सुचविण्याची क्षमता तिच्यात असते. ‘देणं’ या अल्पाक्षररमणीयत्व असलेल्या आणि अर्थसघन कवितेतूनही आगळावेगळा मूल्यविवेक ते सुचवू पाहतात ः
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाशपण
हटता हटत नाही,
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही.
ना. धों. महानोरांसारखा कृषिसंस्कृतीत वाढलेला कवी आत्ममग्न भावावस्थेत आपली आंदोलने तन्मयतेने प्रकट करतो ः
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे
मी असा आनंदुनी बेहोश होता
शब्दगंधे, तू मला बाहूत घ्यावे
महानोरांच्या कविमनाची पावसाशी झालेली तद्रूपता पुढील शब्दांत उत्कटतेने व्यक्त होते ः
दयाघन आभाळ ओघळता चिंबचिंब जास्वंदी उन्हे
पाऊस पाऊस आणखी पाऊस झेलताना झिंगून जाणे
नलेश पाटील यांच्यासारखा मुळात चित्रकार असलेला उत्तम कवी माती आणि आभाळ यांच्या अभिन्न नात्याचा जेव्हा शोध घेतो, तेव्हा त्या निसर्गानुभूतीला कोणती रूपकळा प्राप्त होते?
विझुं विझुं झालं किती अंधारून आलं
पावसानं रान सारं गोंजारून गेलं…
मातीसाठी आभाळच खाली झेपावलं
रुजताच धारा नभ चारा होत गेलं…
आकाशाला जन्म देत तळं निळं झालं
तरंगाची खळी निळ्या गालावर गोल…
काही क्षण निघून जातात. विभ्रमांची दाटीवाटी होते. कवीला ते पाहून सांगावंसंच वाटतं ः
पावसाचं अंग मातकट रंगलेलं
इंद्रधनुष्याला मात्र नभी टांगलेलं…
आभाळाच्या संगीताला पावसाची चाल
सृष्टीनेही गंधर्वाचं रूप घेतलेलं…
पाहुनी देवाला असं साक्षात आलेलं
गवताचं पातं नतमस्तक झालेलं…
मानवनिर्मित जगात कितीजण आले-गेले, त्यांची नावनिशाणी नाही राहिली. गगनाचा ओलावा, भूमीचे मार्दव आणि कोंभाची लवलव या त्रयीची एकात्मता अभंग राहिली. माती आणि आभाळ यांच्या संगमाचा आदिताल मात्र कायम राहिला आहे.