भगव्या वाटेने

0
102

दिल्लीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी उडालेली असतानाच किरण बेदी यांच्यासारख्या वलयांकित सामाजिक कार्यकर्त्या भाजपमध्ये प्रवेशल्या आहेत. खुद्द अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात बहुधा त्यांना उभे केले जाईल, नपेक्षा किमान त्यांच्या विरोधात प्रचारासाठी एक हुकुमी अस्त्र म्हणूनही त्यांचा भाजपला उपयोग होईल. त्या दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, याचे सूतोवाच काल भाजपाध्यक्ष अमित शहांनी पत्रकार परिषदेत केले, परंतु त्या कोणाविरुद्ध लढणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. अण्णा हजारे यांचे जनआंदोलन जेव्हा राजकीय वळणाने नेण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांनी सुरू केला, तेव्हा अण्णा त्यातून बाजूला झाले. त्यावेळी किरण बेदी अण्णांच्या बाजूने राहिल्या आणि तेव्हापासून अरविंद केजरीवाल हे सदैव त्यांच्या टीकेचे लक्ष्य राहिले. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आले, तेव्हापासून किरण बेदी मोदींच्या प्रशंसक राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोणाला फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, कारण गेले अनेक महिने त्यांची भाजपाशी जवळीक वाढत चालली होती. गेल्या निवडणुकांच्या काळातही त्यांनी भाजपच्या बाजूने सूचक वक्तव्ये केली होती. काल त्यांनी अधिकृतरीत्या पक्षात प्रवेश केला इतकेच. आम आदमी पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्या शाझिया इल्मी याही आता भाजपच्या वाटेवर आहेत. शाझिया पूर्वी स्टार टीव्हीच्या पत्रकार म्हणून देशाला माहीत झाल्या. जनलोकपालचे आंदोलन पेटताच त्यांनी पत्रकारिता सोडून राजकारणात उडी मारली. अरविंद केजरीवाल यांच्या निकटच्या सहकारी आणि आम आदमी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्य म्हणून शाझिया यांचे त्या पक्षाच्या वाटचालीत मोठे योगदान होते. पण गेल्या निवडणुकीवेळी शाझिया पक्षासाठी पैसे स्वीकारत असतानाचे स्टिंग ऑपरेशन झाले, तेव्हा आम आदमी पक्षाने त्यांच्यापासून फारकत घेतली होती. शाझिया यांनी गेल्या मे महिन्यात पक्षाचा राजीनामा दिलेला असल्याने आता दिल्लीच्या राजकीय रणधुमाळीत स्वतःचे अस्तित्व चाचपडणे हे त्यांच्यासाठी जरूरी बनले आहे. त्यामुळेच त्या भाजपची वाट चालू लागल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत जन. व्ही. के. सिंग यांच्याविरोधात त्या गाझियाबादमधून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या आणि हरल्या होत्या. आता भाजपच्या तिकिटावर दिल्ली विधानसभेवर जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो. भाजपलाही शाझिया यांच्यासारख्या केजरीवाल यांच्याच भात्यातील बाणाची गरज आहे. शाझिया यांच्यासाठी पेच एवढाच आहे की त्यांनी एकेकाळी भाजपविरुद्ध केलेल्या ट्वीटस् आता त्यांच्यावरच उलटल्या आहेत. केजरीवाल आणि सहकारी त्यांना रीट्वीट करीत शाझिया यांना उघडे पाडू पाहात आहेत. भाजपच्या हवेत आणखी एक झुळूक येऊ पाहते आहे, त्या आहेत एकेकाळच्या लोकप्रिय अभिनेत्री आणि गेली सोळा वर्षे राजकारणात असलेल्या जयाप्रदा. एकेकाळच्या दक्षिणेच्या या लोकप्रिय अभिनेत्री एन. टी. रामाराव यांच्यामुळे राजकारणात आल्या. पण पुढे चंद्रबाबू नायडूंचे आणि त्यांचे बिनसले. तेलगू देसमनंतर अमरसिंह यांच्यामुळे त्या समाजवादी पक्षात आल्या. खासदारही बनल्या. पण त्यांच्या निवडणुकीवेळी आझम खान यांच्यासारखे ज्येष्ठ पक्षनेतेच त्यांच्याविरोधात काम करू लागले, त्यांच्या अर्धनग्न तसबिरी वाटल्या जाऊ लागल्या, तेव्हा अमरसिंह ठामपणे त्यांच्या बाजूने राहिले. पुढे अमरसिंह आणि जयाप्रदा या दोघांचीही समाजवादी पक्षातून हकालपट्टी झाली. अमरसिंहांनी स्वतःचा राष्ट्रीय लोक मंच हा पक्ष काढून पाहिला. पण उत्तर प्रदेशात एकही जागा जिंकता आली नाही, तेव्हा ते आणि जयाप्रदा राष्ट्रीय लोक दलाच्या आसर्‍याला गेले. जयाप्रदा आता भाजपच्या किनार्‍याला लागण्यास उत्सुक आहेत. पक्षासाठीही तो मोठा मोहरा असेल. एकंदरित आज मोदींची हवा चालली असल्याने सगळे आपली तत्त्वे, मूल्ये, विचारधारा गुंडाळून ठेवून राजकीय सोयीसाठी भगवी वाट चालू लागले आहेत आणि भाजपसाठीही हे सारे सोयीचे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या जात आहेत. गोंधळून गेला आहे तो बिचारा या मंडळींचा मतदार आणि निष्ठावंत कार्यकर्ते. ते बिचारे मात्र या गोंधळात नाहक तोंडघशी पडत आहेत!