भगवद्गीता काय सांगते?

0
1389

– मारुती अवदी
पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या तीन ठळक मर्यादा वस्तुस्थिती पदोपदी दाखवते, त्या अशा – अपूर्णता, अनिश्‍चितता आणि अज्ञान. मानवाला कुठल्याही क्षेत्रात आणि व्यवसायात पूर्णता कधीच मिळाली नाही आणि मिळतही नाही. पूर्ण सुख नाही, पूर्ण यश नाही, आज आहे तर उद्या नाही. फक्त मरण सोडून मानवाचे सर्व जीवन अनिश्‍चित, अनित्य आणि अशाश्‍वत आहे. मरण सुद्धा केव्हा येणार याबाबतीत मानव अज्ञानी आहे. कोण, केव्हा आणि कधी संपेल हे कुणालाच सांगता येणार नाही. स्वार्थ, अहंकार आणि ढोंग हे पृथ्वीवरील मानवाचे तीन ठळक दुर्गुण आहेत. सर्वत्र मानव समूहातील सर्व कलहांची बीजे आणि कलहातून होणारे विद्ध्वंस या तीन दुर्गुणांतच आहेत असेही वस्तुस्थिती दाखवते. अनादी काळापासून आजपर्यंत ज्या विचारवंतांनी मर्यादा आणि दुर्गुण यांच्यावर मात करण्यासाठी विचार मांडले त्यात कृष्णाचे विचार उचित ठरतात.
भगवद्गीता कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. हा संवाद अठरा अध्यायांतील ७०० श्लोकांत आहे. त्यातील ४१ श्लोक धृतराष्ट्र- संजयांचे आहेत. ८५ अर्जुनाचे आहेत आणि ५७४ कृष्णाचे आहेत. प्रत्येक श्लोक हा दोन ओळींचा असून प्रत्येक ओळीत सरासरी पाच शब्द आहेत. फक्त २७०० शब्दांत समग्र मानवी जीवनाचे सर्व पैलू उलगडून मानवाला मार्गदर्शन करणारा भगवद्गीता हा पृथ्वीवरील मानव संस्कृतीचा अद्वितीय ग्रंथ आहे. गीतेमध्ये मोघम आणि द्वयर्थी शब्द नाहीत. शब्दच्छल, शब्दजंजाळ आणि पाल्हाळ नाही. जे काही सांगायचे ते कृष्ण स्पष्ट, सरळ आणि सोप्या शब्दात सांगतात. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सुस्पष्ट असल्याने कुणालाही स्पष्टीकरणाची लुडबुड करता येत नाही. गीतेवर भाष्ये व गीतेची भाषांतरे अनेक आहेत. बहुतेक अभ्यासक गीतेत अभ्यास मूळ भाषेत न करता भाष्यांवर आणि भाषांतरावर विसंबतात आणि गोंधळतात. हे गीतेच्याच नव्हे तर जगातील सर्व अनमोल ग्रंथांच्या बाबतीतही खरे आहे. कोणत्याही ग्रंथकर्त्याचे मूळ विचार तंतोतंत समजण्यासाठी ग्रंथाची मूळ भाषा जी मदत करते, ती दुसरी भाषा कधीच करत नाही. दुसर्‍या भाषेच्या माध्यमातून अभ्यास करताना एक मोठा धोका असतो तो म्हणजे ग्रंथकर्त्याच्या मूळ विचारांच्या अनुवादाकडून कळत किंवा नकळत होणारा विपर्यास. जिज्ञासूंनी कधीच विसरता कामा नये की, ग्रंथकर्त्याचे मूळ विचार मूळ भाषेतून दुसर्‍या भाषांत हुबेहूब अनुवाद झालेले क्वचित असतात. जर भाषांतरकाराचे मूळ आणि दुसर्‍या भाषेवर सारखेच प्रभुत्व नसेल तर अर्थाचा अनर्थ होतो. संस्कृत भाषेतील हिंदू तत्त्वज्ञानाच्या विचारांचा ख्रिस्ती पंडितांनी आपापल्या भाषेत केलेला खेळ हे उद्बोधक उदाहरण आहे.
कृष्ण-अर्जुन संवादाची पार्श्‍वभूमी रणांगण आहे. मानवी जीवन हे अथ ते इतिपर्यंत संघर्षमय आहे. वैयक्तिक, कौटुंबिक,, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात प्रत्यक्ष युद्ध नसले तरी, रात्रंदिन युद्धाचे प्रसंग आहेत. त्या प्रसंगांना तोंड देताना मानवाने आपला ऐहिक आणि आध्यात्मिक उत्कर्ष कसा करावा हे कृष्ण सांगतात. सृष्टीनिर्माता एकच आहे आणि तोच सृष्टीचा एकमेव नियंता आहे. मानव त्यालाच देव मानतात. सृष्टीवर कोणताही मानव आपले वर्चस्व कधीच गाजवू शकत नाही. गीता सांगते की देवाला कोणताही मानव प्रिय नाही आणि अप्रियही नाही, कोणताही मानव आवडता किंवा नावडता नाही. जोपर्यंत मानव जगतो, तोपर्यंत शांत, सुरळीत आणि समाधानी जीवनासाठी गीता ‘कर्माला’ अग्रक्रम देते. यज्ञ, तप, दान, ज्ञान आणि भक्ती ही कर्माचीच रुपे आहेत. जोपर्यंत मानव जगतो, तोपर्यंत त्याने आपले नियत कर्म नियमितपणे केलेच पाहिजे. कृष्ण सांगतात की, त्यांना स्वत:ला न मिळालेले किंवा मिळवायचे आहे असे काहीच कुठेही नाही, तरी सुद्धा ते सतत स्वत:चे नियत कर्म करतात. त्याचबरोबर कृष्ण सांगतात की, मानवाचे कोणतेही कर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, महान किंवा लहान नसते. मानवाची सर्व कर्मे एकसारखीच आहेत आणि सर्व कर्मे सदोष आहेत. जसा अग्नी धुराने माखलेला असतो तसेच प्रत्येक कर्म दोषाने माखलेले असते. म्हणून कोणीही आपले स्वाभाविक कर्म सोडून दुसर्‍या कर्माच्या मागे कधीच धावू नये. कृष्ण निक्षून सांगतात की, आपले कर्म करताना मानवाने फळाची अपेक्षा कधीच करता कामा नये. फक्त कर्म करणे एवढेच मानवाच्या हातात आहे. कर्मफळ कोणत्याही मानवाच्या हातात नाही. कर्मफळाच्या हेतूनेच कर्म करणारे मानव आशाळभूत असतात.
आज राष्ट्रात तथाकथित दानी, ज्ञानी, त्यागी, योगी आणि संन्यासी यांचा सुळसुळाट आहे. कोणती व्यक्ती प्रत्यक्षात कोण आहे हे कसे ओळखावे हे गीता शिकवते. गीतेचे अभ्यासक असली आणि नकली, त्यागी आणि भोगी, योगी आणि ढोंगी तत्काळ ओळखतात. खरा संन्यासी कोण? गीता सांगते की, जो सदैव वासनामुक्त असतो, कसलीही इच्छा करत नाही आणि कोणाचाही द्वेष करत नाही, सदैव आपल्या नियत कर्मानेच देवाची पूजा करतो आणि जी कर्मफळे मिळतात ती सर्व देवाला अर्पण करून त्यांचा त्याग करतो तोच खरा संन्यासी असतो.
खरा बुद्धीयोगी कोण? जो सदैव सुख-दु:ख, लाभ-नुकसान, जय-पराजय, मान-अपमान, स्तुती-निंदा, यश-अपयश, चढ-उतार सारखेच समजून कधीच हर्षित किंवा उद्विग्न होत नसतो, जो सदैव स्थिरबुद्धी असतो तोच खरा बुद्धीयोगी असतो. खरा स्थितप्रज्ञ कोण? जो काम-क्रोध, लोभ-मोह, मत्सर-द्वेष, इच्छा-भय, शोक-चिंता जिंकतो तोच खरा स्थितप्रज्ञ असतो. भगव्या कफनीतील भोगी संन्यासी नसतो. भोंदू लंपट स्थितप्रज्ञ नसतो आणि संधिसाधू बुद्धीयोगी नसतो.
खरा त्यागी कोण? त्याग म्हणजे आपली पुंजी आपल्याच मुलाबाळांत वाटणे किंवा विश्‍वस्त संस्था स्थापून संपत्ती भोगणे नव्हे. जो आपले धन निर्धनांना वाटतो, तोच खरा त्यागी असतो. खरा दानी कोण? गीता सांगते की, सात्त्विक, राजस आणि तामस अशा दानाच्या तीन तर्‍हा आहेत. देश, काळ व पात्र पाहून आपणावर उपकार न करणार्‍यास जे दान दिले जाते तेच सात्त्विक दान असते. परतफेडीच्या अपेक्षेने किंवा फळाची आशा बाळगून दिलेले दान राजस दान असते. अयोग्य स्थळी, अकाली किंवा अपात्री सत्काररहित व अपमानपूर्वक दिलेले दान तामस दान असते.
राष्ट्रात आज सात्त्विक दान कस्तुरीमृगासारखे दुर्मिळ आहे. राजस दान आघाडीवर आहे. ‘दान की चर्चा घरघर पौंचे, लुट की दौलत छुपी रहे! नकली चेहरा सामने आये, असली सुरत छुपी रहे’ या दोन ओळी राजस दानाच्या अंतस्थ हेतूवर प्रकाश टाकतात. खासगी आणि सरकारी अनुदाने ही तामस दानाची उत्तम उदाहरणे आहेत. राष्ट्रात अनुदाने अपात्रांनाच मिळतात आणि अपमानाशिवाय कोणालाच कोणतेही अनुदान मिळत नाही हे उघड गुपित आहे.
खरे ज्ञान कोणते? आजकाल सर्व क्षेत्रांतील आणि व्यवसायांतील यशस्वी व्यक्तींना ज्ञानी म्हणतात. प्रत्यक्षात त्या व्यक्ती ज्ञानी नसून कुशल कारागीर असतात. जसे सरोवर म्हणजे सागर नव्हे तसे कारागिरीतील कौशल्य म्हणजे ज्ञान नव्हे. कारागिराचे कौशल्य हे फक्त पैसे जमविण्याचे आणि पदे मिळविण्याचे साधन आहे. गीता सांगते की, ‘अध्यात्मज्ञान’ हेच खरे ज्ञान आहे. ज्या सर्वश्रेष्ठ तत्त्वाचा कधीच नाश होत नाही, त्या सर्वश्रेष्ठ तत्त्वाचे नाव ‘ब्रह्म’ आहे. ब्रह्माचा अंश पृथ्वीवरील प्रत्येक सजीव प्राण्यात आहे. त्या अंशाचे ज्ञान हेच अध्यात्मज्ञान आहे. जे जाणल्यावर जाणण्यासारखे जगात काहीच उरत नाही, ते अध्यात्मज्ञान आहे. शरीराच्या जोपासनेसाठी भौतिक ज्ञानाची गरज आहे. जर शरीर सदृढ नसेल तर अध्यात्मज्ञान अशक्य आहे. पण शरीराची निगा म्हणजे भोगविलासी जीवन नव्हे. गीता सांगते की, अध्यात्मज्ञानासाठी मानवाचा आहार-विहार माफक, कर्म प्रमाणशीर आणि निद्रा-जागृती व्यवस्थित असली पाहिजे.
हिंदूंच्या ‘धर्म’ या शब्दाची शक्ती अभ्यासकांना विस्मित करते. जेव्हा कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले तेव्हा कर्णाने अर्जुनाला धर्माने लढण्यास सांगितले, ‘तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म’ असे खडसावून सांगत कृष्णाने कर्णाच्या अधर्माचा पाढा वाचला. स्वराज्यातही सर्व क्षेत्रांतील आणि व्यवसायांतील अधर्मी ‘यशवंत’ संकटकाळी धर्माचा धावा करतात. गीता सांगते की, धर्म अधर्मीयांचे कधीच रक्षण करीत नसतो. अधर्माला क्षमा करणे म्हणजे धर्माची पायमल्ली करणे होय. धर्माने अधर्मीयांना कठोर शिक्षा केलीच पाहिजे. खर्‍या राष्ट्रभक्त राज्यकर्त्याच्या राजनीतीचे प्रमुख सूत्र ‘शष्ठ्यम् प्रति शाष्ठ्यम्’ असते असे कृष्ण सांगतात.
रणांगणावर गीता सांगणार्‍यांचे आचरण बालपणापासून निधनापर्यंत कसे होते? कृष्णांची उक्ती आणि कृती सदैव एकसारखी हंोती. लोकहित आणि राष्ट्रहित यामध्ये व्यक्तीहित असते हे कृष्णांच्या आचार विचारांचा गाभा होता. जे मानव स्वहित साधण्यासाठी लोकहिताचा आणि राष्ट्रहिताचा बळी देतात ते आत्मघात करतात, हा कृष्णांच्या कार्याचा मानव प्राण्याला संदेश आहे.
व्यक्ती-व्यक्ती मध्ये कृष्णाने चुकून सुद्धा भेदभाव केला नाही. कृष्णाची विचारसरणी उच्चतम होती. अमीर आणि फकीर, राव आणि रंक, महान आणि लहान ही क्षुद्रत्तम विचारसरणी आधुनिक प्रतिष्ठित म्हणून समाजात मिरवणार्‍या भोंदूंची आहे. जी कामे स्वराज्यात तथाकथित मान्यवर हीन म्हणतात, ती कामे कृष्णाने आत्मीयतेने केली. आयुष्यात कृष्ण, गवळी, गुराखी, सारथी, वक्ता, राजकारणी योद्धा आणि तत्त्वज्ञानी होते. वनात आणि नगरात, महालात आणि आश्रमात त्यांची वागणूक स्वाभाविक होती. गोकुळात पेंद्या आणि गुरुकुलात सुदामा त्यांचे जिवलग मित्र होते. ‘सुदाम्याचे पोहे’ आजही कवींचा अवीट रुचीचा विषय आहे. आपल्या बरोबरीचा आणि आपणाहून श्रेष्ठ कोणीही नाही हे जाणून सुद्धा कृष्णाला ‘ग’ ची बाधा कधीच झाली नाही. स्वराज्यात फालतू व्यक्ती ‘मी’, ‘मी’ असा घोष करतात आणि लगेच पालापाचोळ्याप्रमाणे नाहीसे होतात.
जेव्हा शिष्टाईसाठी कृष्णा हस्तिनापूरला गेले तेव्हा दुर्योधनाने त्यांच्या पाहुणचारात कसलीच उणीव ठेवली नव्हती, पण कृष्ण भुलले नाहीत. भोजन-आमंत्रणावेळी दुर्योधनाच्या रसभरित भाषणानंतर कृष्णाने जे छोटे उत्तर दिले ते आजही भोजने देणार्‍यांनी आणि घेणार्‍यांनी लक्षात ठेवण्याजोगे आहे. कृष्ण म्हणाले – हे राजा कोणाचेही भोजनाचे आमंत्रण स्वीकारण्याची कारणे दोनच असतात. पहिले आदर आणि दुसरे भूक. आम्हाला एकमेकांविषयी आदर नाही आणि मी उपाशीही नाही. दुर्योधनाचा पाहुणचार आणि भोजन झिडकारून कृष्ण स्वखुशीने विदुरांचे अतिथी झाले.
जसा अर्जुनाला जीवनाचा मार्ग दाखवला, तसा कर्णालाही दाखवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा कर्णाने ऐकले नाही तेव्हा त्याचा वधही केला. युद्ध समाप्तीनंतर कर्णाचे अंतिम संस्कार करण्यास कोणीही तयार नव्हता, तेव्हा कृष्णानेच कर्णाच्या देहाला अग्नी दिला. जेव्हा कोणीही राष्ट्रघातकी होतो तेव्हा त्याला ताबडतोब मृत्युदंड दिलाच पाहिजे. मग ते मानव आपलेच भाऊबंद , पुत्र-पौत्र, सगे सोयरे किंवा इष्ट मित्र असोत. राष्ट्रहितापुढे सर्व नाती-गोती गौण असतात. कृष्णाने सुद्धा आपल्या मामाचा वध केला. नंतर जरासंधाचा वध केला. महाभारतीय युद्धावरून कौरवांना संपविले. जेव्हा आपल्या कुलात त्यांना कौरवांच्या उन्मत्त आवृत्त्या दिसल्या, तेव्हा कृष्णाने यादवांचाही संपूर्ण नाश केला. क्रियेविना वाचाळता कृष्णाने कधीच केली नाही, जेव्हा जेव्हा पांडवांनी युद्धात आणीबाणीच्या प्रसंगी आपल्या वाचाळतेने बिकट प्रसंग आणले, तेव्हा तेव्हा कृष्णाने त्यांचे रक्षण केले. लोकहित आणि राष्ट्रहित ह्यासाठी सदोदित झटणारा खरा राज्यकर्ता कसा असतो हे राष्ट्रातील आजच्या राज्यकर्त्यांनी राम आणि कृष्ण यांच्या आचरणातून शिकावे. राम आणि कृष्ण या दोघांसारखा तिसरा राज्यकर्ता हिंदुस्थानात झाला नाही आणि होत नाही ही जनतेची खरी व्यथा आहे.
काळाची कसोटी हीच मानवी जीवनातील सर्व क्षेत्रांतील सर्वोत्कृष्टता जाणण्याची एकच खरी कसोटी आहे. जे काळाच्या कसोटीत उतरते तेच सर्वोत्कृष्ट असते. या कसोटीनुसार भगवद्गीता सर्वोत्कृष्ट ठरते. हजारो वर्षांपूर्वी मोजक्याच शब्दात सांगितलेले ज्ञान सदाहरित आणि चिरंतन आहे.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रभक्त युवक गीता हातात धरून हसत हसत फाशीला सामोरे गेले आणि त्यांनी निगरगठ्ठ परदेशी वसाहतवादी आणि त्यांचे देशी हस्तक ह्यांना लज्जित केले. गीतेतील एकही विचार कालबाह्य झाला नाही आणि होणार नाही. पृथ्वीवर गीतेची बरोबरी करणारा दुसरा ग्रंथ नाही मग गीतेहून श्रेष्ठ कोण असणार?