भंडारी समाजाच्या दोन्ही समित्यांमध्ये समेट

0
149

>> पदाधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

गोमंतक भंडारी समाजाच्या दोन वेगवेगळ्या गटांनी काल आपल्या समाजातील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत एकत्र येऊन आपल्यातील मतभेद व हेवेदावे विसरून समाज परत एकदा एकसंध करण्याचा निर्णय घेतला. अनिल होबळे व फक्रू पणजीकर यांच्या अध्यक्षतेखालील समाजाच्या दोन वेगवेगळ्या समित्यांनी काल हा निर्णय घेतला. उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री असलेले समाजाचे एक नेते श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समित्यांचे पदाधिकारी व अन्य समाज बांधव यांच्या काल येथील हॉटेल मनोशांतीमध्ये झालेल्या बैठकीत हा समेट घडवून आणण्यात आला.

नंतर श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेतून दोन्ही समित्यांमध्ये समेट झाल्याचे सांगून यापुढे समाज एकसंधपणे मार्गक्रमण करणार असल्याचे सांगितले. यावेळी मंत्री जयेश साळगावकर व विनोद पालयेकर हेही हजर होते. केवळ गैरसमजामुळे समाजात दुही निर्माण झाली होती. मात्र, हा गैरसमज आता दूर झालेला असून दोन्ही समित्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे समाज एकसंधपणे काम करणार असून राज्याच्या विकासासाठी हातभार लावणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना मंत्री जयेश साळगावकर म्हणाले की, भंडारी समाजामध्ये दुफळी पडल्याने समाजाच्या कामावर परिणाम झाला होता. आता समाज एकसंध होत आहे ही आनंदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी यावेळी उपयुक्त अशा काही सूचनाही केल्या.

मंत्री पालयेकर म्हणाले की, समाजाच्या दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या ही गोष्ट खरी आहे. मात्र, समाजात तशी दुफळी पडली नव्हती, असे ते म्हणाले. दोन्ही समित्यांचे अध्यक्ष अनिल होबळे व फक्रू पणजीकर यांनीही यावेळी मतभेद व हेवेदावे मिटले असून ते गैरसमजातून निर्माण झाले होते, असे सांगितले.