ब्ल्यू व्हेल गेमच्या निमित्ताने…

0
202
  • ऍड. असीम सरोदे

आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. अशा हिंसक आणि विकृत गेम्सवर बंदी घालण्याची मागणीही होत आहे. पण तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नाही. म्हणूनच मुलांनी अशा गेम्सच्या आहारी जाऊ नये यासाठी उपाययोजना करायला हव्यात…

गेल्या काही महिन्यांपासून भारतात ब्ल्यू व्हेल या ऑनलाईन गेमची चर्चा सुरू झाली आहे. या गेमची रचना आणि त्याच्या आहारी जाणार्‍या मुलांचे वाढते प्रमाण यामुळे अनेक प्रश्‍न उद्भवत आहेत. मध्यंतरी, चेन्नईच्या एका वकिलाने ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. ब्लू व्हेल गेममुळे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात जवळपास १०० आत्महत्या झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. यासोबतच ब्लू व्हेल गेमचे धोके लक्षात यावेत यासाठी दूरदर्शन आणि खासगी चॅनेल्सवर जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती करा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिला आहे.

ब्लू व्हेल हा संपूर्णपणे नकारात्मक स्वरुपाचा खेळ आहे. हा गेम लहान मुले खेळतात असे चर्चिले जात असले तरी सर्वसाधारणपणे अशी मुले नजरेस पडत नाही. अनेक मुलांना या गेमविषयी माहिती आहे पण ते ती खेळत नाहीत. एकलकोंडी मुले, कौटुंबिक वादांमुळे विस्कटलेल्या कुटुंबाचा भाग असणारी मुले या गेमच्या सापळ्यात अडकतात असे एकूणात चित्र दिसून येते आहे. हा गेम खेळणार्‍या मुलांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करून काही आव्हान स्वीकारण्याचे मनात ठसवले जाते. यामध्ये अनेक टास्क्सची मालिका असते, ज्यामधील अधिकाधिक टास्क्स् हे हिंसक असतात. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे विक्षिप्त गेम्स बंदच करावेत किंवा त्यांना ब्लॉक करावेत यासाठी समिती नेमली पाहिजे असे म्हटले आहे, ते योग्य आणि आवश्यकच आहे. काही जण अशा प्रकारचे निर्बंध घालणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला आहे असेही म्हणतील किंवा प्रत्येकाला निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे असेही म्हणतील; परंतु हा गेम अत्यंत वाईट आणि विकृत असल्यामुळे त्याचे समर्थन करता येणार नाही.

यानिमित्ताने सर्वांत पहिला प्रश्‍न उपस्थित होतो तो मुले अशा गेम्सच्या आहारी का जातात हा. पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंबात असताना लहान मुलांना सांभाळण्याचा किंवा त्यांच्याशी कोणी खेळायचे असा प्रश्‍न उद्भवतच नव्हता. खूप माणसांसोबत राहिल्याने अशा गेम्सची निकड कधीच भासली नव्हती. पण कालोघात मुले एकलकोंडे होण्याचे प्रमाण वाढले. या एकाकीपणातूनच आधार शोधण्यासाठी मुले अशा गेम्सच्या आहारी जात आहेत. अलीकडील काळात मोबाईलमुळे पालकही अधिक व्यग्र असतात. घरामध्ये एकत्र असल्यानंतरही सर्वांची डोकी मोबाईलमध्ये असतात. अशा वेळी लहान मुलांना स्वतःच्या भावनिक विश्‍वाला आधार मिळवण्यासाठी काही वेगळ्या गोष्टींकडे वळण्याचा मोह होत असेल तर ती चूक त्यांची म्हणता येणार नाही. म्हणून पालकांनीही याचा विचार करणे गरजेचे आहे.

ब्लू व्हेल गेममध्ये काही आव्हाने देऊन ती ते पूर्ण करून शूरवीर असल्याचे दाखवण्याचा आग्रह धरला जातो. त्यासाठी ही मुले कोणत्याही स्तराला जाण्यास तयार होतात. प्रसंगी स्वतःचे आयुष्यही संपवतात. त्यामुळे ही गोष्ट चुकीची आहेच, पण समाजासाठीही धोकादायकही आहे. यानिमित्ताने आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो. आपण जेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल, जीवनपद्धतीबद्दल बोलतो तेव्हा एकत्र राहणे, एकत्र जेवणे याविषयी बोलले पाहिजे. खरे पाहता ही आपली परंपरा आहे; परंतु कालोघात ती मागे पडली आहे. आज परदेशातही कुटुंब एकत्र येऊन भोजन करतात. आज बदलत्या परिस्थितीमुळे सकाळचे जेवण एकत्र घेतले जाऊ शकत नसेल तर किमान संध्याकाळचे जेवण हे सहभोजनच असले पाहिजे, कारण ती एकमेकांना बांधून ठेवणारी प्रक्रिया असते. म्हणूनच ती वाचवली पाहिजे. त्यातून संवादांची देवाणघेवाण होते आणि अनेक प्रश्‍न जटिल, गंभीर बनण्यापूर्वीच सुटतात. ब्ल्यू व्हेलच्या निमित्ताने याचा विचार व्हायला हवा.
या गेममध्ये मुलांना लालूच दाखवली जाते. स्वतःचे नुकसान करून घेण्यासाठी दुसरा कोणीतरी सूचना देतो. मुलांना याचेही आकर्षण वाटते. मी सर्व आव्हाने पूर्ण करतो की नाही हे पाहणारा एक आभासी प्रेक्षकवर्ग आहे असे मुलांना वाटते. त्यातूनच लक्ष वेधून घेण्याची भावना मुलांमध्ये निर्माण होते. ही भावना सूक्ष्मपणाने तपासली तर तीही सहजीवनाशी निगडीत आहे. सहसंवादाशी निगडीत आहे. समजा यातील आव्हान पेलता आले नाही तर मुलांना नैराश्य येते. आपण आव्हान स्वीकारू शकलो नाही याचे शल्य वाटते. मग याच आभासी गोष्टींना मुले साहस समजू लागतात. त्यासाठी आटापिटा करतात. लहान मुलांसंदर्भातील ही घातक प्रक्रिया आहे. त्याविषयी संपूर्ण समाजाने आणि व्यवस्थेने विचार करायला हवा.

यानिमित्ताने अशा धोकादायक गेम्सवर बंदी का आणली जाऊ शकत नाही असाही सवाल उपस्थित केला जातो आणि तो रास्तही आहे, परंतु तांत्रिकदृष्ट्या या गेम्स ब्लॉक करणे अवघड आहे. कारण हे खेळ कुठून तयार होऊन येतात, त्याचे सर्व्हर कुठे असतात याविषयी अनभिज्ञता असते. त्यामुळे आभासी स्वातंत्र्य किंवा इंटरनेटचे स्वातंत्र्य हे पुस्तकांपलीकडचे आहे. आपण भौगोलिक सीमारेषांमध्ये आपल्या सोयीचे कायदे करतो. त्यावर बंधने आणतो. त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरू शकतो. भौगोलिक सीमा नसलेल्या प्रदेशात इंटरनेट स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा त्यावर बंधने कशी घालायची हा खूप मोठा प्रश्‍न असतो. त्यामुळे हा खेळ ब्लॉक करण्याचा पर्याय असू शकत नाही. त्याचबरोबर अशा प्रकरणांचा पूर्वेइतिहास पाहिला तर बंदी घातल्यानंतर हे गेम्स नव्या नावाने बाजारात येतात. म्हणूनच अंतर्गत सुरक्षाव्यवस्था म्हणजेच मजबूत समाजबांधणी केली पाहिजे.

ब्लू व्हेलमुळे जगभरात आतापर्यंत २५० जणांनी आत्महत्या केली आहे. भौतिक सुखांची मुबलकता असलेल्या वातावरणात राहणार्‍या अशा मुलांना त्यांच्यासारच्या ‘नाही रे’ वर्गातील मुले-ज्यांना पोटाला पोटभर अन्नही मिळत नाही, भीक मागावी लागते, अशा मुलांसोबत राहण्यासाठीचा अवकाश निर्माण करून दिला पाहिजे. दिव्यांग मुले आयुष्य कशी जगतात हे त्या मुलांसमवेत राहून या मुलांना जाणवून दिले पाहिजे. त्यातून या मुलांच्या सहवेदना जागृत होऊ शकल्या तर सुविधांअभावी जगणार्‍यांपेक्षा आपण खूप सुखी आहोत त्यामुळे आत्महत्येसारखे पाऊल उचलणे मूर्खपणाचे आहे हे त्यांना कळण्यास मदत होईल. आपल्या जीवनाचे मोल त्यांना कळेल. मुलांना जेव्हा घरातूनच सकारात्मक काही गोष्टींमध्ये गुंतवले जाईल, शिकवले जाईल, कौटुंबिक परिस्थिती सकारात्मक कशी राहील याचा विचार केला जाईल तसेच त्यांच्या क्रियाशीलतेचे कौतुक केले जाईल तेव्हा त्यातून त्यांच्यातील सकारात्मकता वाढीस लागेल. मग नकारात्मक गोष्टींकडे ते वळण्याचा विचार करणार नाहीत.