ब्लास्टर्स-ओडिशा यांच्यात नीरस गोलशून्य बरोबरी

0
145

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात केरला ब्लास्टर्स एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यातील नीरस लढतीत गोलशून्य बरोबरी झाली. नेहरू स्टेडियमवरील निकाल ब्लास्टर्सकरीता जास्त निरशाजनक ठरला.

ओडिशाची ४ सामन्यांतील ही पहिलीच बरोबरी असून एक विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे चार गुण झाले. ब्लास्टर्सची कामगिरी सुद्धा अशीच आहे. या दोन्ही संघांनी एक क्रमांक प्रगती करीत मुंबईला मागे टाकले. तिन्ही संघांचे चार गुण आहेत. यात ओदीशाचा गोलफरक ० (६-६), ब्लास्टर्सचा उणे १ (३-४), तर मुंबईचा उणे ३ (५-८) आहे. ओडिशाचा पाचवा, ब्लास्टर्सचा सहावा, तर मुंबईचा सातवा क्रमांक आहे.
दोन्ही संघांच्या खेळाडूंना भेदक चाली रचता आल्या नाहीत. त्याचे रुपांतर नैराश्यात झाल्याचे ७८व्या मिनिटाला स्पष्ट झाले. ब्लास्टर्सच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याचा पाय डियावँडौ डियाग्ने याला चुकून लागला. त्यामुळे डियाग्ने भडकला, पण ओगबेचेने दुर्लक्ष केले. अखेर डियाग्नेला त्याच्या सहकार्‍यांनी झटापटीपासून रोखले.

खेळाडू जायबंदी होण्याचे प्रकारही सामन्यातील चुरस कमी होण्यास कारणीभूत ठरले. दुसर्‍याच मिनिटाला ब्लास्टर्सला दुखापतीचा धक्का बसला. कर्णधार जैरो रॉड्रीग्जला मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे मैदान सोडावे लागले. त्याच्याऐवजी अब्दुल हक्कू याला पाचारण करण्यात आले.

सहाव्या मिनिटाला ओडिशाने प्रयत्न केला. मध्य फळीतील डियावँडौ डियाग्ने याने डावीकडून मिळालेल्या चेंडूसाठी झेप घेत हेडिंग केले, पण चेंडू बाहेर गेला.
नवव्या मिनिटाला ओदीशाचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याने चेंडूवर ताबा मिळविण्यात ढिलाई केली. त्याचवेळी ब्लास्टर्सने त्याने मारलेला चेंडू थोपविला. त्यात शुभम सारंगीने सर्जिओ सिदोंचाला पाडले. त्यामुळे ब्लास्टर्सला फ्री किक मिळाली, पण ओदीशाने ती रोखली. १५व्या मिनिटाला ब्लास्टर्सने आक्रमण केले. मेस्सी बौलीने पेनल्टी क्षेत्रालगत चेंडूवर ताबा मिळविला. त्याने छातीने चेंडू नियंत्रीत करीत नेटच्या दिशेने फटका मारला, पण डियाग्ने याने तो थोपविला. चेंडू बाहेर गेल्याने ब्लास्टर्सला कॉर्नर मिळाला. उजवीकडून प्रशांत करुथादाथ्कुनी याने क्रॉस पास मारला. त्यावर सर्जिओ सिदोंचाने हेडिंग केले. त्यावेळी पुन्हा डियाग्ने याने हेडिंगने बचाव केला. त्यावेळी ब्लास्टर्सच्या खेळाडूंनी त्याच्या हाताला चेंडू लागल्याचे अपील केले, पण पंच सी. रामस्वामी श्रीकृष्ण यांनी ते फेटाळून लावले.

२३व्या मिनिटाला मेस्सी बौली आणि ऍरीडेन सँटाना हे दोन्ही स्ट्रायकर कॉर्नरवरील चेंडू मारण्याच्या प्रयत्नात होते. ते दोघे डोके धडकून पडले. त्यावेळी सँटानाला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले. ३०व्या मिनिटाला बौली यालाही मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी महंमद रफी मैदानावर आला. ३५व्या मिनिटाला साहल अब्दुल समदने ब्लास्टर्सतर्फे प्रयत्न केला. उजवीकडून चेंडू मिळताच त्याने आगेकूच केली. ओडिशाच्या बचाव फळीतील राणा घरामी आणि नाराण दास यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. समदने दोघांमधून चेंडू मारत ड्रिबलिंग केले, पण नारायणने त्याला पेनल्टी क्षेत्रात पाडले. त्यामुळे समदने पेनल्टीचे अपील केले, पण पंचांनी ते फेटाळून लावले.पहिल्या सत्राचा खेळ संपण्यास एक मिनीट बाकी असताना ब्लास्टर्सने चाल रचली. रफीच्या पासवर समदने हेडिंगचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. के. पी. राहुल चेंडूपाशी गेला, पण त्याची सिझर्स किक नेटवरून गेली.