ब्लास्टर्सचा पहिला विजय

0
111

केरला ब्लास्टर्सची यंदाच्या इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आपल्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा काल घरच्या मैदानावर संपुष्टात आली. धसमुसळ्या खेळाने वादग्रस्त ठरलेल्या लढतीत ब्लास्टर्सने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे आव्हान एकमेव गोलने परतावून लावले. पूर्वार्धात विनीत याने केलेला गोल निर्णायक ठरला.

ब्लास्टर्सने याआधी चार सामन्यांत तीन बरोबरी आणि एक पराभव अशी कामगिरी केली होती. पहिल्या विजयासह त्यांचे एकूण सहा गुण झाले आहेत. त्याचबरोबर ब्लास्टर्सने गुणतक्त्यात सातवे स्थान गाठले. नॉर्थईस्टला पाच सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यांची चार गुणांसह आठव्या स्थानावर घसरण झाली. नॉर्थईस्टला मध्यंतरास तीन मिनिटे कमी असल्यापासून दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले, पण ब्लास्टर्सला याचा आणखी फायदा उठविता आला नाही. ब्लास्टर्सने नेहरू स्टेडियमच्या मैदानावर सहमालक सचिन तेंडुलकर याच्यासह सुमारे ३४ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने विजयाला गवसणी घातली.

ही लढत यंदाच्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धसमुसळ्या खेळामुळे लक्षात राहील. दहा मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टच्या मार्टिन डियाझने पेकुसनला रोखण्याचा प्रयत्न करताना अखिलाडूवृत्तीचा अशोभनीय कळस गाठला. त्याने एकदा नव्हे तर दोन वेळा लाथ मारली. या प्रकारानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वादावादी झाली. पंचांनी मात्र याची सौम्य दखल घेत डियाझला केवळ पिवळे कार्ड दाखविले. सिफ्नेऑसला हुज्जत घातल्याबद्दल अशाच कारवाईला सामोरे जावे लागले.
२४व्या मिनिटाला ब्लास्टर्सने खाते उघडले. झिंगनने उजव्या बाजूने रिनो अँटोला वेगाने पास दिला. रिनोने सहकारी विनीत नेटसमोरच असल्याचे क्षणार्धात हेरले आणि त्याच्या दिशेने चेंडू मारला. विनीतने झेप टाकत सनसनाटी हेडींग केले. त्यावेळी नॉर्थईस्टचे छेत्री, सांबिना आणि रॉलीन बोर्जेस असे तीन खेळाडू नेटसमोर होते, पण विनीतच्या सफाईदार डाईव्हसमोर त्यांना निरुत्तर व्हावे लागले. हाच या सामन्यातील ब्लास्टर्सचा एकमेव विजयी गोल ठरला.