ब्लास्टर्सकडून एटीकेला पुन्हा पराभवाचा धक्का

0
138

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर केरला ब्लास्टर्सने माजी विजेत्या एटीके एफसीला एकमेव गोलच्या जोरावर धक्का दिला. दुसर्‍या सत्रात मध्य फळीतील हालीचरण नर्झारी याने केलेला गोल निर्णायक ठरला.

मोसमाच्या प्रारंभी ब्लास्टर्सने घरच्या मैदानावर एटीकेला गारद केले होते. त्यानंतर ब्लास्टर्सने कोलकात्यामध्येही बाजी मारली. एटीकेसाठी हा निकाल धक्कादायक ठरला. १२ सामन्यांत त्यांचा हा तिसराच पराभव असून सहा विजय आणि तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे २१ गुण आहेत. त्यांचे तिसरे स्थान कायम राहिले, पण पहिल्या चार संघांमधील स्थान भक्कम करण्याच्या मार्गात हा निकाल अडथळा ठरला.
ब्लास्टर्सने १२ सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून पाच बरोबरी आणि चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १४ गुण झाले. त्यांनी जमशेदपूर एफसी (११ सामन्यांतून १३) व चेन्नईन एफसी (११ सामन्यांत १२) यांना मागे टाकून दोन क्रमांक प्रगती करीत आठवरून सहावे स्थान गाठले. खाते उघडण्याची शर्यत ब्लास्टर्सने जिंकली. रॅफेल मेस्सी बौलीने हेडिंगवर नर्झारीच्या दिशेने मारला. त्यावेळी एटीकेचा व्हिक्टर मॉंगील आधी चेंडूपाशी पोचला, पण तो नीट ताबा मिळवू शकला नाही. त्याचवेळी नर्झारीने संधी साधली आणि चेंडू नेटमध्ये मारत लक्ष्य साधले.
अखेरच्या मिनिटाला एटीकेला फ्री-किक मिळाली. ३५ यार्ड अंतरावर जेव्हिटर हर्नांडेझने ती घेतली. त्यानंतर रॉय कृष्णाने चेंडूला नेटची दिशा दिली, पण त्याचवेळी ब्लास्टर्सच्या खेळाडूंनी मुसंडी मारत ऑफसाईडचा सापळा चोख लावला. त्यावेळी एटीकेचे किमान पाच खेळाडू ऑफसाईडच्या सापळ्यात अडकले होते.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी चुरशीने खेळ केला. २८व्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या मेस्सी बौलीने मारलेला फटका थोपविला गेला. चेंडू बाहेर गेल्याने ब्लास्टर्सला कॉर्नर मिळाला, पण त्यावर काही घडले नाही. याच सत्रात मारीओ आर्क्वेसने एटीकेच्या प्रबीर दासला ढोपराने धडक दिली. त्याबद्दल आर्क्सेवला पिवळे कार्ड दाखविण्यात आले.
३५व्या मिनटाला एटीकेच्या रॉय कृष्णाने हेडिंगवर अप्रतिम फटका मारला होता, पण गोलरेषेपाशी ब्लास्टर्सच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याने चेंडू थोपविला. ४२व्या मिनिटाला अर्मांडा सोसा पेना याने फ्री किकवर मारलेला फटका थोडक्यात चुकला. पहिल्याच मिनिटाला मायकेल सुसैराजला डावीकडे पास मिळाला, पण अचूकतेअभावी त्याचा क्रॉस पास चुकला. सहाव्या मिनिटाला मेस्सी बौलीला थ्रो-इनवर चेंडू मिळाला. त्याने प्रीतम कोटलला चकवून आगेकूच केली, पण प्रीतमकडून फाऊल झाला. त्यामुळे मिळालेल्या फ्री-किकवर सैत्यसेन सिंगने गोलक्षेत्रात फटका मारला. थोपविला गेलेला चेंडू पुन्हा सैत्यसेनकडे आला, पण नंतर तो आगुस्टीन इनीग्युएझने बाहेर घालविला. त्यामुळे मिळालेला कॉर्नर जेसील कार्नेरीओने घेतला, पण एटीकेच्या बचाव फळीने तो रोखला.