ब्रॉड, अब्बासची झेप

0
157

>> आयसीसी कसोटी क्रमवारीत

पाकिस्तानविरुद्ध जिंकलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दामदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने आयसीसी कसोटी क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत ‘टॉप १०’मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद अब्बास ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याच्यासह संयुक्त दहाव्या क्रमांकावर आहे. या द्वयीचे समान ७६९ रँकिंग गुण आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अब्बास याने तीन बळी घेतले होते. पहिल्या डावात त्याने डॉम सिबली व बेन स्टोक्स या प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

पाकिस्तानकडून पहिल्या डावात १५६ धावांची दमदार खेळी केलेल्या शान मसूद याने चौदा स्थानांची झेप घेत फलंदाजांमध्ये १९वा क्रमांक प्राप्त केला आहे. सहाव्या स्थानावरील बाबर आझम याच्यानंतर मसूद हा पाकिस्तानचा क्रमवारीतील दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू आहे.

इंग्लंडच्या फलंदाजांचा विचार केल्यास ख्रिस वोक्स याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ७८वा क्रमांक मिळवला आहे. आपल्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर त्याने अष्टपैलूंमध्ये सातवा क्रमांक प्राप्त केला आहे. यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर याने आपल्या ३८ व ७५ धावांच्या बळावर ४४व्या स्थानावरून थेट ३०व्या स्थानी झेप घेतली आहे. कसोटीतील ६९ धावांच्या जोरावर ओली पोप याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ३६वे स्थान आपल्या नावे केले आहे. पाकिस्तानी गोलंदाज यासिर शाह व शादाब खान यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे. सामन्यात ८ बळींसह यासिरने २२वे तर शादाबने ६९वे स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा स्टार स्टुअर्ट ब्रॉड तिसर्‍या स्थानी कायम असला तरी दुसर्‍या स्थानावरील नील वॅगनर व आपल्यातील अंतर त्याने केवळ ७ गुणांवर आणून ठेवले आहे. ब्रॉडच्या खात्यात ८३६ गुण जमा आहेत. पॅट कमिन्स ९०४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडचा संघ २६६ गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. २९६ गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसर्‍या तर ३६० गुण घेत भारत पहिल्या स्थानी आहे.