‘ब्रेन डेड्’ झालेल्या रुग्णाचे अवयव प्रत्यारोपणासाठी विमानाने मुंबईला

0
75

दोनापावला येथील मणिपाल इस्पितळातील एका मेंदू मृत झालेल्या रुग्णाची मूत्रपिंडे व यकृत काढून काल प्रत्यारोपणासाठी विमानाने मुंबईला पाठवण्यात आली. त्यासाठी काल दोनापावला ते विमानतळ मार्गाचे रुपांतर ग्रीन कॉरिडोरमध्ये करण्यात आले होते. हे अवयव नंतर चार्टर विमानाने मुंबईला प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. गोव्यातून प्रत्यारोपणासाठी जिवंत अवयव अन्य राज्यात पाठवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बीएसआर (नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) या मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या कुटुंबियांनी ५ एप्रिल रोजी त्याचे अवयव गरजू रुग्णांना मिळावे यासाठी ते दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मणिपाल इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टरांनी हे अवयव शस्त्रक्रिया करून काढण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती डॉ. शेखर साळकर यांनी दिली. ५ एप्रिल रोजी रात्रौ ११ वाजता सदर रुग्ण मेंदू मृत झाला होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याचे अवयव दान करण्याचा या कठीणप्रसंगी निर्णय घेतला.

विभागीय अवयव व पेशी प्रत्यारोपण संघटना यांनी पाठवलेले खास पथक व राज्य अवयव आणि पेशी प्रत्यारोपण संघटना यांचे पथक तसेच मणिपाल इस्पितळातील डॉक्टरांचे पथक यांनी हे अवयव गोव्यातून मुंबईला नेण्याच्या कामी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. या अवयवांची मणिपाल इस्पितळ, दोनापावला येथून दाबोळी विमानतळावर नेताना वाटेत वाहतूक कोंडीची समस्या अथवा अडथळा होऊ नये यासाठी गोवा पोलिसांनी खास ग्रीन कॉरिडोरचे आरेखन करण्याची कामगिरी केली. तळहातावर जीव तोलून न्यावा त्याप्रमाणे हे जिवंत अवयव नंतर चार्टर विमानाने मुंबईस्थित इस्पितळात हलवण्यात आले. विमानतळावरील अधिकार्‍यांनीही या कामी महत्त्वाची भूमिका बजावली.