ब्रिक्स संमेलनात पाकिस्तानला झटका

0
121
The Prime Minister, Shri Narendra Modi being welcomed by the President of the People’s Republic of China, Mr. Xi Jinping, at the 9th BRICS summit, in Xiamen, China on September 04, 2017.

>> पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदचा धिक्कार

चीनमध्ये सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ब्रिक्स संमेलनात पाकिस्तानला झटका देण्यात आला आहे. ब्रिक्स देशांनी जाहीर केलेल्या ‘शियामीन डिक्लेरेशन’मध्ये पाकिस्तानातील लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचा धिक्कार करण्यात आला आहे. पाकमधील दहशतवादी संघटनांवर ब्रिक्स परिषदेत हल्लाबोल केल्याने भारतासाठी हा मोठा विजय मानला जात आहे.
ब्रिक्स परिषदेच्या ४८ व्या परिच्छेदात, ‘आम्ही आसपासच्या भागांमध्ये पसरत असलेल्या दहशतवादाबद्दल व सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करतो,’ असे नमून करण्यात आले आहे. तालिबान, आयएसआयएल, दाईश, अल कायदा, पूर्व तुर्किस्तान इस्लामिक मुव्हमेंट, इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, हक्कानी नेटवर्क, लश्कर – ए – तोयबा, जैश – ए – मोहम्मद, टीटीपी, हिज्बुल मुजाहिद्दीन, हिज्ब – उत – तहरीर या दहशतवादी संघटनांकडून आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया ही चिंतेची बाब आहे, असे घोषणापत्रात नमूद करण्यात आले आहे. वरील १० दहशतवादी संघटनांची नावे ब्रिक्स घोषणापत्रात पहिल्यांदाच नमूद करण्यात आली आहेत.
ही परिषद जगभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करत आहे. दहशतवाद कोणत्याही स्थितीत खपवून घेतला जाऊ शकत नाही. सर्व ब्रिक्स देश दहशतवादाविरोधात एकजुटीने लढाई लढण्यासाठी कटिबद्ध आहेत, असेही या घोषणापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी भारताकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र, भारताच्या प्रयत्नांना चीनकडून अनेकदा खो घालण्यात आला आहे. मात्र ब्रिक्सच्या घोषणापत्रात दहशतवादी संघटना व त्यांच्या कारवायांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्याने भारताला मोठे यश मिळाले आहे.

शांती व विकास एकजुटीनेच : मोदी
विकासासाठी सहकारी देशांचे सहकार्य आवश्यक असून एकजुटीनेच शांती व विकास शक्य असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत बोलताना केले. ब्रिक्स बँकेमुळे सर्व सहकारी देशांना फायदा होईल असे त्यांनी सांगितले. आरोग्य आणि अन्न सुरक्षा हे या परिषदेचे ध्येय असल्याचे मोदी म्हणाले. देशाची खरी ताकद युवाशक्ती असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी औपचारिक स्वागत केले.