ब्राह्ममुहूर्ताचे फायदे

0
764

– सौ. मोहिनी सप्रे

‘‘लवकर निजे लवकर उठे | तया आरोग्य, ज्ञान, संपत्ती भेटे |’’
ब्राह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे चार वाजता उठून सर्व प्रातर्विधी आटोपून घ्यावेत. योग व प्राणायाम करावेत. यामुळे तन, मन व धनाची वृद्धी होते.
लवकर उठण्याचे फायदे….
* व्यायाम करण्यास आवश्यक असा वेळ मिळतो.
* पहाटे वातावरण अधिक शुद्ध असते. धूळ व रजःकणाचे प्रमाण हवेत कमी असते.
* पहाटेच्या वेळेस हवेत ‘ओझोन’ वायूचे प्रमाण अधिक असते.
* पहाटे एकदा तरी आपल्याला जाग येते. तेव्हाच उठून योगा व प्राणायाम करावे. मनापासून केलेली प्रत्येक क्रिया जास्त फलदायी होते.
* एकदा जाग आली की परत झोपू नये. उशिरा उठणार्‍यांच्या अंगात तरतरी नसते. उलट आळस वाढतो. कामात मन लागत नाही.
* पहाटेच्या वेळेस झाडे, पाने, फुले, फले यांच्याद्वारे जो सुगंध हवेत पसरतो त्यामुळे चित्ताला अपूर्व प्रसन्नता लाभते. पहाटेचे एकूणच वातावरण आल्हाददायक व शांत असते.
* सकाळी लवकर उठून कोमट पाणी प्यायले असता बरेच आजार कमी होतात किंवा निरोगी राहण्यात मदत होते. मुख्य म्हणजे शौचाला साफ होऊन पोट साफ राहते.
* निसर्गावर सूर्याचा प्रभाव इतका आहे की सकाळी चार वाजताच तलावातील कमळे फुलू लागतात. तसेच आपले हृदयही सकाळी लवकर विकसीत होऊन प्रफुल्ल बनते. त्यावेळी त्याला काम मिळून ते कार्यरत झाल्यास ते शक्तिशाली राहून कायम निरोगी राहील. म्हणून ‘पहाटे उठणारे दीर्घायुषी होतात.
* व्यायाम केल्याने शरीर हलके व स्फूर्तिदायक होते. कार्यशक्तीत वाढ होते. जठराग्नी प्रदीप्त होतो. मेदवृद्धी होत नाही. व्यायाम केल्याने अवयव मजबूत होतात. रोग उत्पत्ती होत नाही. पचायला जड असणारा आहार व्यायामामुळे पचतो. व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात शिथिलपणा येत नाही तसेच अकाली वृद्धत्व येत नाही. व्यायामाने तनाचे व मनाचे आरोग्य सुरक्षित राहते.
* शरीराच्या घडणीत रक्ताचे स्थान फार महत्त्वाचे आहे. रक्त म्हणजेच प्राण. रक्तातील प्राणतत्त्व हे शरीराच्या प्रत्येक अवयवाचे आहाररूप आहे. एवढ्यासाठी शरीरातील रक्त सतत फिरते ठेवा. शरीराच्या ज्या भागात रक्ताभिसरण होत नाही तिथे दुखणे उत्पन्न होते. तो भाग सडू लागतो. म्हणून शरीर निरोगी राखण्यासाठी रक्ताभिसरण व्यवस्थित होणे गरजेचे आहे. धावण्यामुळे श्‍वासोच्छ्वास जलद होतो. फुफ्फुसांना दीर्घ श्‍वास घ्यावा लागतो. रक्ताभिसरणाची क्रिया जलद होते. नाडीचे ठोके जलद होतात. शरीरात उष्णता उत्पन्न होऊन सर्व अवयव गरम होतात. धावल्याने पायातील स्नायूंचे जलद चलनवलन होऊन रक्ताभिसरणाच्या गतीला वेग मिळतो. म्हणून शरीराला कसरत व रक्त या दोघांचीही सारखीच गरज आहे.