‘ब्रह्मचारी’ नाटक कारकिर्दीतील मैलाचा दगड : वर्षा उसगावकर

0
752

गाणे एकवेळ माझी हौस होती. पण मी ती हौस ठेवली नाही. गाणे जोपासले. मी आधी अभिनेत्री, नंतर गायिका आहे. खरे तर मला गायिका-अभिनेत्री व्हायचे होते. ब्रह्मचारी नाटक माझ्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरले असे विख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी काल ‘हितगुज’ कार्यक्रमात सांगितले.
कॉपरलिफ हॉटेल प्रस्तुत ‘स्वस्तिक’ आणि कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने अकादमीच्या कृष्णकक्षात हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे पार पडला. प्रसिद्ध मुलाखतकार, रंगकर्मी डॉ. अजय वैद्य यांनी त्यांच्याशी संवाद साधला. चित्रपटाच्या तंत्राशी जुळवून घेणे मला बेमालूपणे जमले असे संबंधित प्रश्‍नावर त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, मला वाटते माझा पिंडच मुळी चित्रपटासाठी होता. ‘स्टेज’ला भारदस्त आवाज लागतो तो माझ्याकडे नव्हता. मला ‘कॅमेरा’ जास्त आवडतो कारण ‘कॅमेरा’च चित्रपटात रसिक श्रोता असतो. तोच पावती देतो. प्रत्येक भूमिकेला गृहपाठाची गरज असते असेही त्यांनी सांगितले.
माझ्या अभिनयाचा मला आत्मविश्‍वास होता. त्यामुळे अशोक सराफ, सचिन पिळगावकर व लक्ष्मीकांत बेर्डे या अनुभवी कलाकारांबरोबर काम करताना कधीच दडपण आले नाही असे डॉ. वैद्य यांच्या प्रश्‍नावर स्पष्ट करून त्यांनी सराफ, लक्षा यांच्या विषयीच्या काही गमतीशीर आठवणी, अनेक किस्से सांगून ‘हितगुज’ची लज्जत वाढविली. त्या म्हणाल्या लक्षा मला कधीच नायक वाटला नाही. त्याच्याकडून मात्र एक शिकले, कुठलीही भूमिका दुय्यम समजायची नाही. माझी चित्रपटाची कारकीर्द सुधीर भटांच्या ‘बह्मचारी’ या नाटकामुळे सुरू झाली. मात्र त्यात ‘स्विमिंग सूट’ घालून वावरायचे म्हणून बराच ताण आला होता. यासंदर्भात सांगताना वर्षा म्हणाल्या त्यावेळी कोकणातही त्याचे बरेच प्रयोग झाले. झापांची थिएटर्स असायची. दिवसाला तीन-तीन प्रयोग पण केले. प्रयोग होईपर्यंत सुधीर भटांनी मिनाक्षीबाईंचे काम असलेला तो चित्रपट मला दाखवला नव्हता. परंतु ‘ब्रह्मचारी’मध्ये मी बिनधास्त वावरले. यावेळी त्यांनी मिनाक्षीबाईंनी गायिलेले यमुनाजळी हे मूळ चालीतील गाणे व नंतर अशोक पत्कींनी दिलेल्या चालीतील गाणे गाऊन दाखविले.
‘गंमत जमंत’मधील भूमिका सचिनने दिली तेव्हा डोळ्यांवर विश्‍वासच बसेना असे त्यांनी नाटक, सिनेमा आणि सूत्रसंचालन या तिन्ही टप्प्यांचा आपल्या प्रवासाबद्दल त्या दिलखुलासपणे बोलल्या. ‘एम् टू झी टू म्युझिक गप्पा गाणी’, ‘क्या करूं मै अब’ या दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रमाने मी ‘अँकर’ होवू शकते हा आत्मविश्‍वास दिला असे वर्षा यांनी सांगितले. ‘म्युझिक मस्ती गप्पा गाणी’मुळे माझ्यातील संगीताला संजीवनी मिळाली. ‘अतिथी देवो भव’चा प्रत्यय आला. या कार्यक्रमाने माझा मी पणा गळून पडला, असे त्या म्हणाल्या. चित्रपट क्षेत्राने मला अभ्यासूवृत्ती, सहनशिलता शिकवली असे सांगून जॉकी श्रॉफ, ऋषी कपूर यांच्याबरोबर चित्रपटात काम करतानाचे मजेशीर किस्से सांगून खसखस पिकविली.
मराठी चित्रपटांमुळे ‘हिन्दी’त ब्रेक मिळाला असे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, त्यामुळेच मला हिन्दी चित्रपटसृष्टीत मान व किंमत मिळाली. तिथे मला मराठीतील एक नंबरची नायिका, मराठीतील श्रीदेवी, माधुरी दीक्षित म्हणून संबोधले जायचे. महाभारत मालिकेत मिळालेली उत्तरेची भूमिका, हिन्दी व मराठीत मिळून केलेला ‘दूध का कर्ज’ चित्रपट याबद्दलही त्यांनी सांगितले. आपले सासरे ख्यातनाम संगीतकार रवी यांची काही गाणी त्यांनी म्हणून दाखविली. महेश भटांच्या ‘साथी’ मध्ये काम केले त्यातील एक गीत त्यांनी पेश केले. त्या म्हणाल्या ‘डोन्ट ऍक्ट रिऍक्ट’ हा त्यांनी मोहसिन खान यांना दिलेला सल्ला माझ्या कारकीर्दीत अधोरेखित झाला. ‘स्वस्तिक’चे अध्यक्ष डॉ. प्रविण गावकर यांनी स्वागत केले.