बोलक्या नजरेचा असामान्य ‘कॉमनमॅन’ : आर. के. लक्ष्मण

0
601

– महेश महादेव दिवेकर
देशाच्या राजकीय पुढार्‍यांनी देशाची जितकी काळजी घेतली नसेल, तितकी मला व्यंगचित्रांसाठी विषय मिळतील याची काळजी घेतली. माझ्यासारखा राजकीय व्यंगचित्रकार लोकप्रिय होतो, हे देशाच्या आणि राजकारणाच्या अधोगतीचे लक्षण आहे’- हे शब्द आहेत ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे. प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला प्रजेला हसविणारा हा गुणी चित्रकार हे जग सोडून गेला. ज्याने सतत ५० वर्षे भारतीय वाचकांना वृत्तपत्राद्वारे हसवत ठेवले, त्याच्या निधनाच्या दिवशी देशातील अर्ध्याहून अधिक वृत्तपत्रे बंद होती हा योगायोग म्हणावा लागेल. या व्यंगचित्रकाराला जणू त्यांनी मूक आदरांजली दिली, असेही म्हणता येईल. मात्र, आरकेसरांच्या जाण्याने व्यंगचित्रकलेची एक संस्थाच बंद झाली यात तीळमात्र शंका नाही. आधीही होते, यापुढेही होतील, मात्र आर. के. लक्ष्मण हे ‘या सम हाच’ असे व्यंगचित्रकार होते हे कबूल करावेच लागेल.

शेकडो शब्दांचा अग्रलेख जो परिणाम करू शकत नाही, तो एक व्यंगचित्र करू शकते असे म्हणतात. आरकेसरांची व्यंगचित्रे पाहिल्यावर याची खात्री पटते. सामान्य माणसांची सुख-दुःखे, त्यांना सतावणारे प्रश्‍न, राजकीय पुढार्‍यांचा ढोंगीपणा, सामाजाची बिघडलेली परिस्थिती यावर त्यांनी मार्मिक, मिश्किल भाष्य केले. ते ‘समाजसेवक व्यंगचित्रकार’ होते. आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या समस्या सत्ताधीशांना दाखवून दिल्या. सरकारी यंत्रणेतील त्रुटी, बेफिकीरपणाचे ज्वलंत चित्रण त्यांनी व्यंगचित्रांतून केले. डुलक्या घेणार्‍या सरकारला जाग आणली, त्याचे डोके ठिकाणावर आणले. मात्र हे करताना त्यांनी कोणीही दुखावणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली. मांजरीने आपल्या पिल्लाला अलगद उचलून दुसरीकडे न्यावे आणि हे करताना त्याला दात लागणार नाहीत याचीही काळजी घ्यावी, तशी आरकेसरांची व्यंगचित्रे होती. त्यांची चित्रे रुचीने मजा घेत पाहता येत होती. त्यात तीळभरही विखार नव्हता. काही राजकीय पुढार्‍यांना त्यांची बोचरी टीका झोंबली, मात्र दुसर्‍याच दिवशी तेच राजकारणी आपल्यावर काढलेली बोलकी व्यंगचित्रे पाहून खळखळून हसले. झाले गेले विसरले. बरेच राजकीय पुढारी त्यांनी आपले व्यंगचित्र काढावे यासाठी धडपडत असत असे म्हणतात. व्यंगचित्रकार हा निःपक्षपाती असायला हवा, त्याची स्वतःची मते काहीही असली तरी व्यंगचित्रात ती दिसता कामा नये असे आरकेसर म्हणत. हा कटाक्ष त्यांनी स्वतः अखेरपर्यंत पाळला.
समाजात अनेक व्यंगे आहेत. मात्र त्यांवर भाष्य करताना बरेचजण वाहवत जातात. आपले विचार, मते, तत्त्वे यांच्या चष्म्यातून ते त्या व्यंगाकडे पाहतात. मग त्याचे प्रतिबिंब त्यांच्या भाषणात, लेखनात, चित्रात, व्यंगचित्रात पडते. मात्र आरकेसर याला अपवाद होते. ते बोलून दाखवत ती तटस्थता त्यांच्या अंगात उपजत होती. त्यांची व्यंगचित्रे पाहिल्यास हे कोणालाही पटेल. ही लक्ष्मणरेषा त्यांनी कधीही ओलांडली नाही. व्यंगचित्रकलेचे पावित्र्य त्यांनी शेवटपर्यंत जपले आणि म्हणूनच ते आंतरराष्ट्रीय पातळीचे महान व्यंगचित्रकार बनू शकले. सुदैवाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राची साथ मिळाली आणि एका रात्रीत त्यांची व्यंगचित्रे देशाच्या कानाकोपर्‍यांत पोहोचली.
सद्यपरिस्थितीचे दर्शन
ज्या इंग्रजी वृत्तपत्रांत वा नियतकालिकांत आरकेसरांनी व्यंगचित्रे रेखाटली, ती उच्चवर्गीय वाचकांपुरती मर्यादित होती. त्यात काही मध्यमवर्गीय वाचक होते ही गोष्ट अलाहिदा. पण बहुतांश वाचक हा सामान्यवर्गाच्या सुखदुःखाकडे संबंध नसलेला होता. या वाचकांना गरिबांचे प्रश्‍न, समाजाची खालावलेली स्थिती, राजकीय पुढार्‍यांकडून होणारा भ्रष्टाचार, गरिबांची पिळवणूक वगैरे वगैरेंचे दर्शन घडवले ते आरकेसरांच्या व्यंगचित्रांनीच! सरकारी विकासकामांना त्यामुळे गतीही मिळाली. अर्धशतकाहून जास्त काळ त्यांनी सामान्यजनांच्या आकांक्षांना आवाज मिळवून दिला. त्यांच्या दुःखाला, वेदनेला विनोदाची जोड देत ते कॅनवासवर मांडले. त्यांच्या व्यंगचित्रांचे हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
व्यंगचित्रकला आमच्या भारतात तेवढी बहरली नाही. अजूनही ती कोमेजलेल्या अवस्थेतच आहे. आरकेसरांच्या तोडीचे सोडाच, पण मिश्किलता, मार्मिकतेच्या बाबतीत त्यांच्या जवळपास पोहोचणारे व्यंगचित्रकार चुकूनच सापडतात. व्यंगचित्रकला ही शिकवून येत नाही. मात्र साधारण चित्रकला, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, पूर्वसुरींच्या व्यंगचित्रांचा अभ्यास, धाडसी, निरपेक्ष वृत्ती, तटस्थ दृष्टिकोन असल्यास यशस्वी व्यंगचित्रकार होता येते. अर्थात वृत्तपत्र, नियतकालिकाचे पाठबळही हवेच! बहुतेक वृत्तपत्रांत दर्जेदार व्यंगचित्रकाराची व्यंगचित्रे प्रसिद्ध व्हायला लागली की सहसा दुसर्‍या व्यंगचित्रकाराला संधी मिळत नाही. मात्र आज वृत्तपत्रांची संख्या वाढलेली असतानाही ‘पॉकेट कार्टुन’ रेखाटणारे दर्जेदार व्यंगचित्रकार मिळत नाहीत. मिळालेच तर त्यांच्यात सातत्य नसते.
व्यंगचित्रकलेची शाळाच!
आरकेसर मितभाषी, काहीसे गंभीर व्यक्तिमत्त्वाचे होते. मात्र त्यांच्या कुंचल्यातून मिश्किलपणा ओसंडून वाहत असे. त्यांना व्यंगचित्रकलेची शाळाच म्हणावे लागेल. एकलव्याने ज्याप्रमाणे गुरू द्रोणाचायार्र्ंजवळ प्रत्यक्ष शिक्षण न घेता धनुर्विद्येत अर्जुनाच्या बरोबरीचे प्रावीण्य मिळविले होते, तसे अनेक भारतीय व्यंगचित्रकारांनी आरकेसरांच्या व्यंगचित्रांपासून प्रेरणा घेऊन आपली कला विकसित केली आहे. या घडीस देशातील एकही असा व्यंगचित्रकार नसेल, ज्याने कधी ना कधी आर. के. लक्ष्मणांचा आदर्श घेतला नसेल वा किंचित, नकळत अनुकरण केले नसेल. यावरून आरकेसरांच्या व्यंगचित्रांची महानता लक्षात येईल. नवोदित व्यंगचित्रकारांना आरकेसरांनी काय दिले असेल, तर निरीक्षण कसे करावे, चित्रामध्ये काय असावे, काय नसावे… तेही अगदी मोफत. गुरुदक्षिणा न घेता!
प्रवेश नाकारला
आरकेसर मूळ कन्नडभाषक. २४ ऑक्टोबर १९२१ रोजी त्यांचा जन्म म्हैसुरात झाला. त्यांना सहा भावंडे. ते सगळ्यांत लहान. ‘मालगुडी डेज’, ‘गाईड’सारख्या कादंबर्‍यांचे लेखक आर. के. नारायण हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. वडील मुख्याध्यापक. त्यामुळे शाळेच्या वाचनालयातील आणि ते स्वतः विकत आणत त्या देशी-विदेशी नियतकालिकांतील चित्रे, व्यंगचित्रे पाहून छोट्या लक्ष्मणाला आपणही तशीच चित्रे काढावीत अशी बालसुलभ इच्छा झाली. त्यांनी सुरुवातीला मिळेल त्या कागदाचा वापर करून चित्रे रेखाटायला सुरुवात केली. वडिलांचे खडूने चित्र काढल्याने त्यांना मारही खावा लागला होता. मात्र त्यांच्या आईला ते चित्र आवडले. बालमनाला तेवढाच दिलासा. शाळेत त्यांनी काढलेल्या पिंपळपानाच्या रेखाटनाने प्रभावित झालेल्या एका शिक्षकाने त्याना चित्रकलेसाठी प्रोत्साहन दिले. नंतर आपल्या भावाच्या लेख- कथांसाठी त्यांनी चित्रे काढली. ते लहान असतानाच वडील वारल्याने वडीलबंधू नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली आरकेसर घडले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन डीननी त्यांना सांगितले की, ‘तुमच्या चित्रांमध्ये आमच्या संस्थेत प्रवेश घ्यायच्या लायकीचे कौशल्य नाही. तेव्हा आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही. क्षमस्व.’ (याच जे. जे. स्कूलने नंतर त्यांना एका कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेत मुख्य पाहुणे म्हणून नेलेे.) निराश मनाने लक्ष्मण यांनी परत म्हैसूरला येऊन अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र या विषयांत कला शाखेची पदवी घेतली. मात्र त्यांच्यात दडलेला चित्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. दिल्लीत ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्रात त्यांनी अर्ज केला. पण ‘वय लहान आहे’ असे अफलातून कारण सांगून त्यांनी आरकेसरांची बोळवण केली. या काळात त्यांनी ‘स्वतंत्र’साठी राजकीय व्यंगचित्रे काढली. जेमिनी स्टुडिओत एका व्यंगचित्र सिनेमासाठी त्यांनी चित्रकार म्हणून काम केले. ‘स्वराज्य’, ‘ब्लिटस्’ आणि कन्नड विनोदी नियतकालिक ‘कोरावंजी’साठी त्यांनी व्यंगचित्रे काढली. याच सुमारास डॉ. एम. शिवराम यांच्या सल्ल्यावरून त्यांनी मुंबईत नोकरीसाठी प्रयत्न करायचे ठरविले. अपेक्षेप्रमाणे ‘फ्री प्रेस जर्नल’ या वृत्तपत्रात १९४७ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून नोकरीही मिळाली. तेथे नंतर शिवसेनाप्रमुख झालेले बाळासाहेब ठाकरे आणि सुधाकर भट हे व्यंगचित्रकार होते. तिघांचीही खूप दोस्ती झाली. बाळासाहेब आणि आरकेसर यांची गहिरी दोस्ती तर अखेरपर्यंत टिकून होती.
कॉमनमॅनचा जन्म
१९५१ मध्ये आरकेसरांनी व्यंगचित्रांवर मालक घालीत असलेल्या बंधनांमुळे ‘फ्री प्रेस’मधील नोकरी सोडली आणि ते ‘मुक्त’ झाले. बाळासाहेबही नोकरी सोडून गेले. कम्युनिस्टांवर टीका करायची नाही असा मालकांचा दंडक होता. १९५१ मध्ये आरकेसर ‘टाईम्स ऑफ इंडिया’त रुजू झाले ते अखेरपर्यंत! हा खर्‍या अर्थाने ‘फ्री प्रेस’ होता. येथे त्यांची व्यंगचित्रकला बहरली. १९५३ मध्ये प्रत्येक व्यंगचित्रात दिसणारा त्यांचा तो जगप्रसिद्ध कॉमनमॅन येथेच जन्मास आला. चौकटीचा कोट, गोल भिंगाचा चष्मा, धोतर आणि चेहर्‍यावर स्थितप्रज्ञतेचे भाव. पुतळा बनण्याचे भाग्य लाभलेले हे दुर्मीळ व्यंगचित्र पात्र असेल! पुणे आणि मुंबईत कॉमनमॅनचे पुतळे आहेत.
आरकेसरांच्या व्यंगचित्रांनी नंतरच्या काळात जे काही केले तो इतिहास आहे. अटकेपार झेंडे लावण्याचे कर्तृत्व त्यांच्या व्यंगचित्रांनी केले. ब्रिटिश व्यंगचित्रकार सर डेव्हीड लो हे त्यांचे आदर्श. मात्र त्यांनी लो यांच्या व्यंगचित्रांची नक्कल केली नाही. या कलेव्यतिरिक्त आरकेसरांची व्यंगचित्रे ‘मिस्टर ऍण्ड मिसेस ५५’ या सिनेमात झळकली आहेत. आर. के. नारायण यांच्या कादंबरीवर बेतलेल्या ‘मालगुडी डेज’ या दूरदर्शन मालिकेत त्यांची रेखाटने दिसली आहेत. खुद्द आरकेसरांवर ‘आर. के. लक्ष्मण की दुनिया’ आणि त्यांच्या कॉमनमॅनवर ‘वागळे की दुनिया’ ही टीव्ही मालिका आली होती. एशियन पेंटस्‌चा प्रसिद्ध गट्टू हा शुभंकर आरकेसरांचेच अपत्य. त्यांनी कादंबरी, प्रवासवर्णने, निबंध लिहिले आहेत. त्यांच्या आत्मचरित्राचा अशोक जैन यांनी केलेला ‘लक्ष्मणरेषा’ हा मराठी अनुवाद लोकप्रिय झाला होता. पुण्याच्या सिम्बायोसिस विद्यापीठात आरकेसरांच्या नावाने अध्यासनही आहे. त्यांच्या कॉमनमॅनचा येथे पुतळा आहे. आता महाराष्ट्र सरकारने आरकेसरांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. त्यांना मॅगसेसे, पद्मविभूषणासह अनेक पुरस्कार मिळाले.
आरकेसरांच्या जाण्याने व्यंगचित्रविश्‍वात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. लक्ष्मणरेषा विरून गेली आहे. आपल्या व्यंगचित्रांनी ओठावर हसू आणणारा, जीवनात जगण्याचे एक परिमाण देणारा हा अवलिया कलाकार आपल्यातून शरीररूपाने गेला असला तरी त्यांची व्यंगचित्रे येणार्‍या शेकडो वर्षांत रसिकांना भरभरून आनंद देणार आहेत, हे निःसंशय!
पुतळा नको, शाळा हवी
आरकेसरांना आदरांजली वाहताना महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर. के. लक्ष्मण यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. सध्या देशात उदंड पुतळे झाले आहेत. पुढेही होणार आहेत. स्वतः आरकेसरांना स्वतःचा पुतळा उभारणे आवडले नसते. त्याऐवजी व्यंगचित्र आणि अर्कचित्रे काढण्याची शाळा वा तत्सम अभ्यासक्रम सुरू केल्यास व्यंगचित्रकलेच्या क्षेत्राला काही नवोदित व्यंगचित्रकार मिळतील. ही कला शिकवून येत नाही हे खरे असले तरी उपजत निरीक्षणबुद्धी आणि चित्रकलेचे ज्ञान, आवड असलेल्या कलाकाराला त्यामुळे मार्गदर्शन मिळेल. महाराष्ट्रच का, गोव्याच्या सरकारलाही त्या दिशेने पाऊल टाकता येईल.
काक दृष्टीचे कावळे!
कावळे हा आरकेसरांचा जिव्हाळ्याचा विषय. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्यांना याविषयी विचारले होते. तेव्हा आरकेसरांनी सांगितले होते, कावळा हा माणसापेक्षा प्रामाणिक आणि कष्टाळू. एकजूट, मिळूनमिसळून वागणे, प्रत्येक गोष्ट शेअर करणे हे कावळ्याकडून शिकावे!
कावळ्यापाशी असलेली दृष्टी आरकेसरांजवळ होती. चाणाक्ष, बोलकी नजर. समाजाने वाळीत टाकलेला आणि फक्त श्राद्धादी सोहळ्यांना हव्या असलेल्या कावळ्यांवर त्यांचे निरपेक्ष प्रेम होते. त्यांनी रेखाटलेले कावळे पाहताना नजर हटत नाही. कावळ्यांचे चित्रप्रदर्शनही त्यांनी मुंबईत भरविले होते. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले ः ‘माझ्या खोलीच्या खिडकीबाहेर डोकावल्यावर दिसणार्‍या वाळक्या काट्या, पाने, पालीसारखे सरपटणारे जीव, सर्पणासाठी लाकडे गोळा करणारे नोकर आणि समोरच्या इमारतींच्या छपरावर चित्रविचित्र आकारात बसलेले कावळे हेच माझ्या चित्रांचे विषय बनले.
वा! छान बोललात!
आरकेसरांची किती व्यंगचित्रे आठवावीत? व्यंगचित्रांच्या महासागरातले मोती वेचायचे ते किती? त्यांचा कॉमनमॅन निरागस, स्थितप्रज्ञ, भांबावलेला असायचा. तो सहसा बोलत नसे. त्याची पत्नीच इतर बायकांसारखी जास्त बोलत असे. आरकेसरांचा पंडित नेहरू टोपीशिवाय आणि रोमँटिक नजर असलेला असायचा. त्यांचे रंगीत व्यंगचित्र काढायचेच झालेच तर त्यात हमखास ‘गुलाबी’ गुलाब दिसायचा. आपणाला टोपीशिवाय काढले म्हणून एकदा पं. नेहरू त्यांच्यावर रागावले होते. त्यावेळी ‘तुमची वैशिष्ट्ये टोपी घातल्यास झाकून जातात’ असे सांगून त्यांनी नेहरूंना निरुत्तर केले होते. इंदिरा गांधी रेखाटताना ते त्यांचे नाक हमखास लांब, गरुडाच्या चोचीसारखे दाखवायचे. राजीव गांधी यांच्यात पं. नेहरूंप्रमाणेच व्यंग नव्हते. अखेरीस त्यांचे नाक लांब दाखवून आरकेसरांनी तो प्रश्‍न सोडवला. राजीव भाषणात, अधिकार्‍यांशी बोलताना ‘हमे देखना है, मै देेखता हूँ, आय विल लूक इन टू द मॅटर’ असे वारंवार म्हणायचे. एका समारंभात त्यांनी आरकेसरांना विचारले, ‘तुम्ही मला खूपच लठ्ठ दाखवता.’ यावर सरांचे उत्तर आले, ‘आय वील लूक इन टू द मॅटर.’ उपस्थितांत एकच हशा पिकला.
बॉब कट केलेली मोठ्या नाकाची सोनिया, पंतप्रधान होण्याचे सदैव स्वप्न पाहणारे डोक्यावर मुकूट घातलेले लालकृष्ण अडवानी, दात नसलेले खट्याळ हावभावाचे, गुबगुबीत गालाचे अटलबिहारी वाजपेयी, चिरुट व रुद्राक्षाची माळ घातलेले तीक्ष्ण नजरेचे बाळासाहेब ठाकरे, तोंडावर मुख्याध्यापकाचा भाव असलेले मोरारजी देसाई, डोक्यापेक्षा मोठी फरकॅप घातलेले व्ही. पी. सिंह, बेरकी, अलिप्त भाव चेहर्‍यावर असलेले शरद पवार…. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये झळकत राहिले. काही काळ आरकेसरांनी अर्कचित्रेही काढली होती. अर्थात तीही गाजली.
त्यांच्या व्यंगचित्रांना कोठलाही विषय व्यर्ज्य नव्हता. पं. नेहरू लोकप्रियतेच्या शिखरावर असताना निवडणूक प्रचारावेळी ‘कॉंग्रेसला मत द्या’ असा फलक घेऊन जातात. तेव्हा मतदार त्यांच्या पुतळ्याकडे बोट दाखवत, ‘तुम्ही काय म्हणता ते आम्हाला ठाऊक नाही, आम्ही फक्त यांनाच मत देणार’ असे सांगतात. दुसर्‍या एका व्यंगचित्रात सलमान खानने फुटपाथवर झोपलेल्या माणसांना चिरडले होते त्यावर भाष्य आहे. एक लहान मुलगा रस्त्यावर मध्यभागी झोपला आहे. उठवायला आलेल्या हवालदाराला तो सांगतो, ‘साहेब, फुटपाथवर झोपण्यापेक्षा इथे रस्त्यावर मध्यभागी झोपणे जास्त सुरक्षित आहे.’
एका व्यंगचित्रात नगरपालिका कचराकुंड्या साफ करते. तेव्हा काही गरीब माणसे सांगतात, ‘कायदा असला म्हणून काय झालं. तुम्ही आम्हाला उपाशी नाही ठेवू शकत!’ या मर्मभेदी व्यंगचित्रावर विंदा करंदीकर यांनी कविताही केली होती. ‘स्विपींग द पोल’ या व्यंगचित्रात बहुमताने विजयी झालेल्या इंदिरा गांधी झाडूने सगळ्या पुढार्‍यांना कचराकुंडीत टाकून जाताना दिसतात. दुसर्‍या व्यंगचित्रात टेबलावर संपूर्ण ‘लिलीपूट’ मंत्रिमंडळ घेऊन बसलेल्या गलिव्हर इंदिराजी दिसतात. तेव्हा त्यांची प्रतिमा लार्जर देन लायफ झाली होती.
मंत्री घोटाळे करीत असतात. एकजण म्हणतो, ‘तुम्ही समजता तसा तो साखर घोटाळ्यात अडकला नव्हता, तो बँक घोटाळ्यात होता.’ परदेश दौर्‍यावर जाण्यास इच्छुक असलेला मंत्री चिंतातूर होऊन बसला आहे. एकजण दुसर्‍याला सांगतो, ‘ते घाबरले आहेत. प्रश्‍न, समस्या अशा पटपट सुटत राहिल्यास, विदेशी दौर्‍यावर जाण्याची संधी हुकणार याची त्यांना भीती वाटते.’ निवडणुकीतीलएक उमेदवार पत्रकार येताच चेहरा कपड्याने झाकतो, तेव्हा त्याला सहकारी सांगतो, अरे आधीचे विसर. आता तू निवडणुकीला उभा आहेस हे विसरू नकोस. एका व्यंगचित्रात इंदिरा गांधी हातात फलक घेऊन उभ्या आहेत. मी जनता सरकार पाडले! यावर बाबू जगजीवनराम, चरणसिंग, चंद्रशेखर, राजनारायण प्रभृती सांगतात, ‘खोटारडी. हे सरकार पडावे म्हणून आम्ही दोन वर्षे किती मेहनत घेतली हे सगळ्यांना ठाऊक आहे.’
शिक्षकांच्या संपामुळे शाळा बंद आहे. एक मुलगा धावत येऊन शाळेतल्या इतर मुलांना सांगतो, ‘चांगली बातमी आहे. बोलणी फिस्कटली. ते पगारवाढ देणार नाहीत. संप चालूच राहील.’ एका व्यंगचित्रात वृद्ध सरकारी अधिकार्‍याकडे पाहून मंत्री सांगतो, ‘त्याला मी १०-१२ वेळा मुदतवाढ दिली आहे. कारण निवृत्त झाल्यावर आपण आत्मचरित्र लिहिणार असे तो सांगतोय.’ भारत छोडो चळवळीच्या ५२ व्या वर्धापनदिनाचा फलक लागलाय. खाली जॉगिंग करणारा ज्येष्ठ नागरिक मित्राला सांगतो, ‘माझ्या मुलांनी कधीच भारत सोडलाय, एक अमेरिकेला असतो, दुसरा लंडनला…!’ निवडणूक प्रचाराला गावात आलेला माजी मंत्री घेरी येऊन पडतो, त्याला गावकरी सांगतात, ‘तुम्हाला पाणी हवंय का साहेब? ते येतंय. तीन म्हयन्यांपूर्वी आलेल्या मंत्र्याने पाणी देण्याचे आश्‍वासन दिले आहे’! ….किती व्यंगचित्रे सांगावीत. गुगल सर्चमध्ये नुसते ‘आरे के लक्ष्मण कार्टुन्स’ टायप केल्यावर व्यंगचित्रांची त्सुुनामीच अंगावर येते. मात्र तींत डुंबताना गुदरमरायला होत नाही, उलट जीवन हलके हलके होत जाते!