बोंडलात वाघाची डरकाळी घुमणार!

0
90

राज्यातील एकमेव बोंडला येथील प्राणी संग्रहालयात कर्नाटकातील प्राणी संग्रहालयातून वाघ- वाघिणीची जोडी, हत्ती आणण्याच्या प्रक्रियेला तत्त्वतः मान्यता मिळालेली आहे. वरील प्राणी आणण्याबाबतचे कागदोपत्री सोपस्कार सुरू आहेत, अशी माहिती वन्य जीव उपवनसंरक्षक विकास देसाई यांनी काल दिली.
बोंडला प्राणी संग्रहालयातील वाघ – वाघीण यांचा अलीकडेच मृत्यू झाला होता. २००९ मध्ये विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी प्राणी संग्रहालयातून संध्या व राणा ही वाघीण – वाघाची जोडी बोंडला येथे आणण्यात आली होती. राणा वाघाचा डिसेंबर २०१६ आणि संध्या वाघिणीचा जानेवारी २०१७ मध्ये मृत्यू झाला होता.

त्यापासून बोंडला प्राणी संग्रहालयात वाघ – वाघिणी जोडी नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे वाघ – वाघिणीची जोडी आणण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन प्राणी आणण्यास मान्यता मिळाली आहे. कर्नाटकातील बंगळूर, म्हैसूर येथील दोन प्राणी संग्रहालयात वाघ – वाघिणीची जोडी उपलब्ध आहे. बोंडला प्राणी संग्रहालयातील गवे रेडे, हरण, काळवीट यांच्या बदल्यात वाघ- वाघीण आणण्यात येणार आहे. याबाबतची प्राथमिक बोलणी यशस्वी झाली आहे. आता कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.

हत्ती, पाणघोडीसाठी प्रयत्न
बोंडला प्राणी संग्रहालयात हत्ती आणि पाणघोडी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हत्तीला जोडीदार आणण्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पाणघोडीचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. प्राणी कायद्यानुसार प्राण्यांना जोडीदाराविना ठेवले जाऊ शकत नाही. बोंडला प्राणी संग्रहालयातील जनावरांच्या बदल्यात नवीन प्राणी आणले जाणार आहेत. राज्यातील संरक्षित जंगलांमध्ये पाच वाघ, बिबटे आणि गव्या रेड्यांची संख्या भरपूर आहे, असेही देसाई यांनी सांगितले.

राष्ट्रीय वन्य जीव मंडळ, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राण्यांना ठेवण्यासाठी मोठ्या जागेची व्यवस्था केली जात आहे. बोंडला प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना ठेवण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राणी संग्रहालयाचा १०० हेक्टर जागेत विकास करण्याबाबत आराखडा तयार केला जात आहे. प्राधिकरणाच्या सूचनेप्रमाणे या आराखड्यामध्ये आवश्यक बदल केले जात आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.