बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

0
161

 

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (६७) यांचे मुंबईत निधन झाले. त्यांना बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेता इरफान खान यांचे निधन होऊन २४ तास उलटण्याआधीच बॉलिवूडमधील ही दुसरी दुःखद घटना आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उद्ध्वस्त झालोय’, असे ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान यानेही ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.

दरम्यान, ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर चंदनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलगा रणबीर कपूर, पत्नी नीतू आदी उपस्थित होते. ऋषी यांची मुलगी दिल्लीला असल्यामुळे ती अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नाही. बॉलिवूडमदील अनेक अभिनेते व अभिनेत्रींनी ऋषी कपूर यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजली

भारतीय चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार ऋषी कपूर याच्या जाण्यामुळे राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशमधील भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आदींनी शोक व्यक्त केला आहे.