‘बॉय’ सुटला कसा?

0
176

दक्षिण गोव्यात काही वर्षे सातत्याने घडत आलेल्या धार्मिक प्रतीकांच्या मोडतोडीमागील एकमेव चेहरा म्हणून पोलिसांनी ज्याला पुढे केले होते, त्या फ्रान्सिस झेवियर परेरा ऊर्फ ‘बॉय’ या मोरायले, कुडचडे येथील मध्यमवयीन गृहस्थाला त्यासंदर्भातील एखाददुसरे वगळता बहुतेक सर्व प्रकरणांतून निर्दोष सोडण्यात आले आहे. केवळ त्याने पोलिसांना कोठडीत असताना दिलेल्या जबाबावर आधारलेल्या या आरोपांचा शेवट हा असाच होणार हे भाकीत त्याला सनसनाटी अटक झाली तेव्हाच आम्ही केले होते. ‘‘केवळ तो सांगतो म्हणून या सार्‍या तोडफोडीमागे केवळ तोच होता असा सरधोपट निष्कर्ष काढता येत नाही. त्याने कबुली दिली असली, तरी केवळ त्यावर विसंबून राहणे बावळटपणाचे ठरू शकते, कारण पोलिसांपुढे दिलेली कबुली असे गुन्हेगार न्यायालयात सर्रास फिरवतात. त्यामुळे हे आरोप न्यायालयात कितपत टिकतील शंकाच आहे.’’ असे आम्ही तेव्हा म्हटले होते. त्यातला शब्द न् शब्द खरा ठरला आहे. जनतेलाही तो या सगळ्या आरोपांतून सुटणार अपेक्षित होते, कारण बहुतेक गुन्हेगार सुटकेसाठी आधी पोलिसांपुढे कबूल केलेले गुन्हे न्यायालयात नाकारण्याचे हेच तंत्र वापरत असतात. मुळातच फ्रान्सिस परेराची अटक व त्याचा कबुलीजबाब याविषयीच जनतेमध्ये साशंकता होती आणि ती निर्माण होण्यास अनेक सबळ कारणेही होती. मुळात पन्नाशीतला हा गृहस्थ एकट्याने गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन तेथील धार्मिक प्रतिकांची तोडफोड करीत होता यावरच विश्वास ठेवणे आजही कठीण आहे. कोणालाही कोणताही संशय येऊ न देता वेगवेगळ्या अपरिचित ठिकाणी जाऊन सराईतपणे मोडतोड करून पसार होण्याचे हे जबरदस्त कसब त्याला साध्य होते असे मानावे तर त्याला गोव्याचा ‘रजनीकांत’च म्हणायला हवे. ख्रिस्ती दफनभूमींच्या उंचच उंच भिंती चढून जाणे काय, वयाच्या पन्नाशीत त्यावरून टणाटण उड्या मारणे काय, नुसत्या हातोडीने कोणताही आवाज न होता वा वाटेवरच्या कोणत्याही सीसीटीव्हीत छबी न झळकता ‘अदृश्य’ रूपात ठिकठिकाणची धार्मिक प्रतीके फोडणे काय, या सगळ्याविषयीच्या जनतेच्या मनातला संशय दूर करणे शेवटपर्यंत पोलिसांना जमले नाही. त्यामुळे न्यायालयानेही या तकलादू दाव्यांवर विश्वास न ठेवता पोलिसांना ठायी ठायी फटकारले आहे. गुन्हे करण्यात एवढी शिताफी दाखवणारा हा इसम मोडतोड प्रकरणे शिगेला पोहोचताच आणि सरकारवर जनतेचा दबाव वाढताच एका रात्रीत पोलिसांना सापडला आणि त्याने ताबडतोब गुन्ह्याची कबुलीही दिली. अटक झाल्यावर ज्या सराईतपणे तो अगदी हसत हसत पोलिसांना सामोरा गेला ते पाहिल्यावर हे सगळे नाटक तर नसावे ना अशी शंका जनतेच्या मनात डोकावली होती. तो खरोखरच गुन्हेगार आहे असे मानले तर त्यासाठी सबळ पुरावे हवे होते. पोलिसांना शेवटपर्यंत ते सादर करणे जमलेले दिसत नाही. तो जेथे जेथे मोडतोड करायला गेला, त्या वाटेवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत त्या वेळी त्याचे वा त्याच्या मारुती व्हॅनचे चित्रण व्हायला हवे होते, परंतु तसे कोणतेही पुरावे सादर झालेले नाहीत. एवढ्या ठिकाणी मोडतोड करणार्‍या या महाभागाला एकाही ठिकाणी कोणी संशयितपणे वावरताना पाहिलेले नाही. मग पोलिसांच्या दाव्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? फ्रान्सिसला अटक झाल्यावर देखील धार्मिक प्रतीकांची मोडतोड झाली होती. मात्र, त्याच्या अटकेचा गवगवा झाल्यानंतर हे प्रकार पूर्ण थांबले. या विषयाला आलेल्या गांभीर्यामुळेही ते थांबलेले असू शकतात. त्यातून फ्रान्सिसला अटक झाल्यानेच ते थांबले असा निष्कर्ष काढता येत नाही. चर्चने नेमलेल्या सत्यशोधन समितीने देखील फ्रान्सिसने एकट्याने एवढी मोडतोड केल्याच्या दाव्याविषयी अचंबा व्यक्त केला होता. आता आपण पोलिसांना दिलेला कबुलीजबाबच फ्रान्सिसने फेटाळला आहे असे नव्हे, तर आपल्याला पोलिसांनी धाक दाखवून आपल्याकडून गुन्हा केल्याचे वदवून घेतले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण आता तपास यंत्रणेवरच उलटले आहे. यापूर्वी धार्मिक प्रतीकांच्या मोडतोड प्रकरणातील आरोपी म्हणून कविश गोसावी नामक तरुणाला पुढे करण्यात आले होते. कालांतराने खरा गुन्हेगार फ्रान्सिस निघाला. आता फ्रान्सिसने गुन्हे नाकारल्यानंतर आणखी कोणता ‘गुन्हेगार’ उभा होईल सांगता येत नाही. फ्रान्सिस प्रकरणात तपास यंत्रणा पुरावे गोळा करण्यात कमी पडल्या हे तर दिसतेच आहे. गोव्यातील पारंपरिक धार्मिक सलोख्याला सुरुंग लावून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा एवढ्या गंभीर विषयामध्ये तपासकाम एवढे ढिसाळपणे झाले असेल तर ते गांभीर्याने घेतले गेले पाहिजे. या प्रकरणाचा फेरतपास अधिक समर्थपणे झाला तरच अशा प्रकारांना जरब बसू शकेल.