बेळगावातील ‘संकल्पभूमी’ : खाणीवरचा स्वर्ग

0
106

– बबन भगत
काळ्या पाषाणी दगडांची एक भव्य मोठी खाण. दगड काढून झाल्यावर टाकून देण्यात आलेली. निरुपयोगी, कुणीही त्या खाणीकडे पाहून नाक मुरडावं अशी, ओंगळवाणी, वाळवंटासारखी.
पण त्या खाणीवर साक्षात स्वर्गच उभा रहावा अशी जणू ईश्‍वराची इच्छा होती. अन् देवाच्या इच्छेनुसार ते घडावं यासाठी एका अवलियाची त्या खाणीशी गाठ पडली. अन् त्या खाणीचं नशीब उजळलं. ज्या खाणीवर साधं एक रोपटं ही मूळ धरू शकत नव्हतं तेथे बघता बघता एक सुंदर विलोभनीय असे एक इको ऍग्रो फार्म रिसॉर्ट उभं राहिलं.ही कहाणी आहे बेळगाव येथील ‘संकल्पभूमी’ची. संकल्प भूमी म्हणजेच हे इको फार्म रिसोर्ट बेळगाव शहरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर आहे. संजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आकारात आलेलं हे फार्म रिसोर्ट म्हणजे साक्षात स्वर्गच. येथील सगळे काही नाविन्यपूर्ण. या फार्म रिसोर्टमधील कॉटेजपासून तेथील फर्निचर, तेथील पाण्याचे तलाव, तेथील धाबा, कॅफेटेरिया, तेथील छोटेखानी मद्यालय, तेथील मचाण, घाणा, स्विमींग पूल, लग्नसमारंभासाठी खुली जागा, छोट्या समारंभासाठी हॉल, योग सेंटर आणि दृष्ट लागण्यासारखी येथील सेंद्रीय शेती. येथील कॉटेजेस या पूर्णपणे लाकडी. एक-दोन अपवाद वगळता बहुतेक कॉटेजेस तसेच धाबा, समारंभासाठीचे हॉल व अन्य बांधकामासाठी लाकूड, गवत, झावळ्या, बांबू आदींचा वापर केलेला. कॉंक्रेटीकरण शक्य तो टाळलेलेच. जमिनीवरही केवळ अपवादानेच फरशांचा वापर केलेला. बेळगावमधील जुन्या पाडलेल्या घरांच्या लाकडी दारांपासून तयार केलेलं सुंदर फर्निचर संकल्पभूमीमध्ये पहायला मिळतं. त्यात डायनिंग टेबल्स, खुर्च्या व अन्य फर्निचरचा समावेश आहे. साधनसुविधा तयार करण्यासाठी येथे ज्या वस्तूंचा वापर करण्यात आलेला आहे त्या सर्व वस्तू पुनर्वापर केलेल्या आहेत. एकूण आठ एकर जमिनीवर ही संकल्पभूमी उभी राहिलेली असून तेथे राहायला येणार्‍या पर्यटकांसाठी कॉटेजेसवर सांगितलेल्या अन्य सर्व सुविधा तर उपलब्ध आहेतच. शिवाय त्या परिसरात आढळणारी वेगवेगळ्या जातींची झाडे तेथे आणून लावण्यात आल्याने संकल्पभूमीत वेगळीच बहार आलेली आहे. भाज्या व फळ झाडांचीही मोठ्या संख्येत तेथे लागवड करण्यात आलेली असून या शेतीसाठी खत अथवा किटकनाशकांचा अजिबात वापर करण्यात येत नाही. पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने ही शेती करण्यात येत आहे.
संकल्पभूमीत केलेली झाडांची लागवड व सेंद्रीय शेती यामुळे तेथील किटक, पशु-पक्षी यांच्यासाठी संकल्पभूमी म्हणजे नंदनवनच ठरलेले आहे. मोर, घुबडे, भारद्वाज, पोपट, सुतारपक्षी, बुलबुल, किंग फिशर अशा कित्येक पक्षांचे संकल्पभूमी हे जणू घरच बनले आहे. साप, बेडकं यांच्यासह कित्येक जलचर प्राणी, कित्येक प्रकारचे कीटक, कित्येक जातीची फुलपाखरे यांचे संकल्पभूमी हे जणू कायमस्वरुपी निवासस्थानच बनले आहे.
येथे एकूण आठ कॉटेजेस असून त्या वातानुकूलीतही आहेत. खरे म्हणजे येथील वातावरण एवढे थंड आहे की एसीची बिलकूल गरज भासत नाही. शहरातील गोंगाटापासून जरा दूर अशा या भूमीत आल्यानंतर एका वेगळ्याच विश्‍वात आल्याचा भास होतो.
पाच वर्षांपूर्वी ही संकल्पभूमी उभी राहिली. संजय कुलकर्णी व किरण ठाकूर हे या संकल्पभूमीचे जनक.
एकूण ३२३९१ चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभा आहे. त्यापैकी फक्त २५०० चौरस मीटर जमिनीवरच बांधकाम करण्यात आलेले आहे. १० हजार चौ.मी. जागेत सेंद्रीय शेती केली जात आहे. या प्रकल्पात २०० सागवानी झाडे, नारळाची २० झाडे, चिकूची ८० झाडे, बांबूची ५५० झाडे लावण्यात आलेली आहेत. तर ८ हजार चौ.मी. एवढी मोकळी गवताळ जागा आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी एकही झाड कापण्यात आलेले नाही. संकल्पभूमीची संकल्पना तयार केली ती दोघा माणसांनी. किरण ठाकूर व संजय कुलकर्णी या त्या दोन व्यक्ती होत. ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी मदत लागली ती ३० व्यक्तींची. या प्रकल्पामुळे २५ कुटुंबांना प्रत्यक्ष व ५ कुुटुंबांना अप्रत्यक्ष फायदा मिळाला. या प्रकल्पामुळे त्या ठिकाणी हरितक्षेत्र ८० टक्क्यांनी वाढले. १० हजार चौ.मी. क्षेत्रात येथे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येत असून ३ कूपनलिकाही त्यासाठी खोदण्यात आलेल्या आहेत. झिरो कार्बन फूट प्रिंट्‌सचे उद्दिष्टही येथे ठेवण्यात आलेले आहे.
आणखी हो, या खाणीत हा प्रकल्प उभारण्यापूर्वी तेथे भराव घालण्यासाठी शेकडो टन जी माती लागली त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले असतील असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. पण खरी गोष्ट अशी आहे की, बिल्डरांनी बेळगावमध्ये इमारची उभारण्यासाठी जुनी घरे पाडली होती. त्यांनीच उलट माती टाकण्यासाठी ही जागा मिळावी यासाठी ट्रकमागे पैसे फेडले. तुम्ही काही चांगले करायला गेलात तर देवही तुमच्या पाठीशी राहतो तो असा.
तर मग अशा या सुंदर, निसर्गरम्य, शांत, नाविन्यपूर्ण संकल्पभूमीला तुमचे कधी पाय लागू द्या. काही तरी नवे पाहिल्याचा, नवे अनुभवल्याचा आनंद तुम्हाला या ठिकाणी सुट्टी घालवल्यावर आल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की. मग जाणार ना तुम्ही संकल्पभूमीला? आणखी हो, कुटुंबासाठीचे हॉलीडे डेस्टिनेशन अशी त्याची ओळख आहे. त्यामुळे तेथे जायचे असेल तर तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार जायला विसरू नका.