बेल्जियमची दुबळ्या पनामावर एकतर्फी मात

0
97
Belgium players celebrate their second goal during the Russia 2018 World Cup Group G football match between Belgium and Panama at the Fisht Stadium in Sochi on June 18, 2018. / AFP PHOTO / Odd ANDERSEN / RESTRICTED TO EDITORIAL USE - NO MOBILE PUSH ALERTS/DOWNLOADS

रोमेलू लकाकूने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर ‘ग’ गटातील पहिल्या सामन्यात बेल्जियमने पदार्पणातील दुबळ्या पनामा संघावर ३-० एकतर्फी मात करीत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपली विजयी सलामी दिली. पनामा हा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील हा पहिलाच सामना होता.

सोची येथील फ्रीश्त स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात बेल्जियमने खेळावर पूर्णपणे वर्चस्व राखले होते. पहिल्या सत्रात पनामाने बेल्जियमची आक्रमके रोखण्यात यश मिळविले होते. त्यामुळे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिले होते.
दुसर्‍या सत्रात मात्र बेल्जियमच्या आक्रमणापुढे जागतिक ५५व्या स्थानावरील पनामाच्या बचावफळीचे काहीही चालू शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ३ गोल लादले गेले. बेल्जियमने ४७व्या मिनिटाला अखेर आपले खाते खोलण्यात यश मिळविले. ड्रायस मर्टेंन्सने हा आकर्षक गोल नोंदवित बेल्जियमला १-० अशा आघाडीवर नेले. त्यानंतर पनामाला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती. परंतु मायकल मुरिलोने घेतलेला फटका बेल्जियमचा गोलरक्षक थिबाउट कुर्टोईसने अचूकपणे थोपवित संघावरील संकट टाळले.

नंतर ६९ व्या मिनिटाला केविन डी ब्र्यूएनाच्या पासवर मँचेस्टर युनायटेटचा स्ट्रायकर रोमेलू लुकाकूने झेप घेत हेडरद्वारे गोल नोंदवित बेल्जियमला २-० अशा आघाडीवर नेले. तर ७५व्या मिनिटाला इडन हझार्डकडून मिळालेल्या अचूक पासवर लुकाकूने पनामाचा गोलकीपर पेनेडोला चकवित स्वतःचा दुसरा व बेल्जियमच्या विजयावर ३-० असा शिक्कामोर्तब करणारा तिसरा गोल नोंदविला.

रोमेलू लुकाकूने बेल्जियमसाठी गेल्या १० सामन्यांत तब्बल १५ गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. याचसोबत लुकाकूने आजवर बेल्जियमसाठी ७० सामन्यांत सर्वाधिक ३८ गोल केले आहेत. २० सामन्यांत अपराजित, २० पैकी १५ सामन्यांत बेल्जियमनं मिळवला विजय, तर बेल्जियमचे पाच सामने बरोबरीत सुटले आहेत.
आता शनिवारी २३ जून रोजी होणार्‍या दुसर्‍या सामन्यात बेल्जियम ट्युनिशिया संघाशी तर पनामा संघ बलाढ्य इंग्लंडशी दोन हात करणार आहेत.