बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यास श्रीपाद नाईक अपयशी : कॉंग्रेस

0
145

मागील वीस वर्षे खासदार म्हणून कार्यरत असलेले भाजपचे खासदार तथा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक यांना बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यास अपयश आले आहे. त्यांना विकास प्रकल्पाच्या मुद्यावरून मतदारांकडून घेराव घातला जात आहे. केवळ विकास कामे मार्गी लावून पोट भरत नाही, अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

भाजपचे उमेदवार श्रीपाद यांनी आपल्या कारकिर्दीतील विकास प्रकल्पांचा अहवाल बुधवारी प्रकाशित केला होता. त्यासंबंधी बोलताना कॉंग्रेसचे सरचिटणीस गोवेकर म्हणाले की, खासदार नाईक यांनी जाहीर केलेल्या विकास कामांच्या अहवालाबाबत संशय वाटत आहे. या अहवालात नमूद करण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांचा आढावा कॉंग्रेस पक्ष घेणार आहे. खासदार नाईक यांनी एक हजार प्रकल्प मार्गी लावल्याचा दावा केला आहे. त्यात ८० सामाजिक सभागृहे आणि ७० स्मशानभूमी प्रकल्पांचा समावेश आहे. शैक्षणिक संस्थांना साधन सुविधा पुरविणारे जास्त प्रकल्प आहेत, असेही पणजीकर यांनी सांगितले.

केंद्रीय आयुष्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या नाईक यांनी केवळ दोन जिल्हा इस्पितळांच्या कामाचा शुभारंभ केला आहे. प्रत्यक्षात हॉस्पिटल सुरू करू शकलेले नाही. एखादी जागा भाडेपट्टीवर घेऊन हॉस्पितळे सुरू करता आली असती. खासदार नाईक यांना अनेक मंत्रिपदे भूषविण्याची संधी मिळाली. परंतु, राज्याच्या हितार्थ प्रकल्प राबवू शकलेले नाहीत. त्यांना निवडणूक प्रचाराच्या वेळी कळंगुट येथे टुरिस्ट टॅक्सी मालकांनी घेराव घालून जाब विचारला. मये मतदारसंघातील सर्वण येथे स्मशानभूमीच्या प्रश्‍नावरून जाब विचारण्यात आला. खासदार नाईक यांनी दत्तक घेतलेला इब्रामपूर गाव विकासाच्या प्रतीक्षेत आहे, असेही पणजीकर यांनी सांगितले.

राज्यातील खाण बंदीचा प्रश्‍न केंद्रीय पातळीवर योग्य प्रकारे मांडण्यात खासदार नाईक अपयशी ठरले आहेत. खाण प्रश्‍नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे कामही त्यांना जमले नाही, अशी टीका कॉंग्रेसच्या माध्यम विभागाचे समन्वयक ट्रॉजन डिमेलो यांनी केली.