बेबंद पर्यटन

0
106

गोव्याच्या खाण व्यवसायाचा फुगा जसा दोन वर्षांपूर्वी फाट्‌कन फुटला, तसेच आता येथील पर्यटन व्यवसायाचेही होणार की काय असे वाटण्याजोगी गंभीर परिस्थिती सर्वत्र दिसत आहे. रस्तोरस्ती पर्यटकांच्या वाहनांची होणारी कोंडी, साधनसुविधांची ठळकपणे जाणवू लागलेली कमतरता, हॉटेलांपासून टॅक्सी सेवेपर्यंतचे अव्वाच्या सव्वा चढलेले, चढवलेले दर, पर्यटकांची होणारी खुलेआम लूट हे सारे पाहता गोव्याच्या पर्यटनक्षेत्राचा झालेला हा विकास म्हणायचा की आलेली सूज म्हणायची असा प्रश्न सर्वसामान्य गोमंतकीयांना पडला आहे. गेल्या वर्षअखेर गोव्याच्या कोणत्याही पर्यटनस्थळी कुटुंबासह जाणे म्हणजे विकतचा मनस्ताप ठरेल याची चिन्हे स्पष्ट दिसल्याने या सार्‍या धागडधिंग्यापासून गोमंतकीय जनतेने दूरच राहणे पसंत केल्याचे दिसून आले. पण जे देशी – विदेशी पर्यटक झुंडींनी येथे लोटत आहेत, त्यांच्या हालांना मात्र पारावार उरलेला नाही. त्यांच्या वाहनांनी खचाखच भरून वाहणारे रस्ते, ना कुठे पार्किंगसाठी जागा, ना अंतर्भागातील रस्ते दर्शवणारे फलक अशा परिस्थितीत दिशाहीनपणे हे पर्यटक भटकताना आणि दीनवाणेपणाने परवडेल अशी वास्तव्याची ठिकाणे शोधताना दिसत आहेत. उच्चभ्रू पर्यटकांचे एक ठीक आहे. त्यांचे आगाऊ आरक्षण असल्याने फारशी गैरसोय संभवत नाही, परंतु जे देशी पर्यटक स्वतःच्या वाहनांनी झुंडीने गोव्याकडे निघालेले आहेत, त्यांचा पाहुणचार यंदा कसा होईल हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. त्यांचे कावलेले – कातावलेले चेहरेच परिस्थितीचे वर्णन करून जात आहेत. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तात्पुरती उपाययोजना म्हणून नौदल कर्मचारी, खासगी सुरक्षा रक्षक वगैरेंची मदत सरकारने घेतलेली असली, तरी पर्यटक वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे आणि बेशिस्तीमुळे हे प्रयत्न अपुरेच पडू लागल्याचे दिसते. भरीस भर म्हणून दक्षिणेत बाळ्ळी – कुंकळ्ळीचा अरुंद रस्त्यांचा परिसर, जुवारी पुलावरील वेगमर्यादा, पणजीच्या दोन्ही पुलांवरील वाहतुकीचा ताण, म्हापसा – पणजी महामार्गावरील प्रचंड वाहतूक, किनारपट्टीच्या भागातील अरुंद रस्ते या सार्‍यातून मार्ग काढणे हे आव्हानात्मक आहे. गोव्याच्या पर्यटनाचे केवळ किनारपट्टी भागामध्ये झालेले केंद्रीकरण, तेथील साधनसुविधांची वर्षानुवर्षांची वानवा, स्थानिक राजकारण्यांच्या आशिर्वादाने रस्तोरस्ती झालेली अतिक्रमणे, अरुंद रस्ते, हॉटेल, शॅक्स आणि टॅक्सी व्यावसायिकांनी तापल्या तव्यावर पोळी भाजत चालवलेली लुटालूट या सार्‍यातून ही स्थिती आज ओढवलेली आहे. पर्यटन हे त्यामुळे गोमंतकीयांसाठी दुःस्वप्न ठरत चाललेले आहे. दरवर्षी गोव्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढतच चाललेली आहे. मात्र, त्या तुलनेत त्यांच्यासाठी जेवढ्या साधनसुविधा निर्माण व्हायला हव्यात त्या काही होऊ शकलेल्या नाहीत. हॉटेलांची संख्या विशेष वाढलेली नाही, रस्ते रूंद झालेले नाहीत, पार्किंगचा प्रश्न नीट हाताळता आलेला नाही. मागील केंद्र सरकारने आर्थिक सहाय्य दिलेल्या योजनांची पूर्तताही करता आली नाही असे ताशेरे महालेखापालांनी आपल्या अहवालात ओढलेले होते. या सार्‍या विदारक परिस्थितीत जिवाचा गोवा करायला माणसे लोटतच आहेत. या पर्यटकांमध्ये सभ्य, सुसंस्कृत कौटुंबिक पर्यटक किती आणि मद्य, कॅसिनो आणि उघडीनागडी विकृती यांच्या आकर्षणाने गोव्याकडे लोटणारे आंबटशौकीन किती याचा अभ्यास खरोखर व्हायला हवा, म्हणजे गोव्याच्या पर्यटनाचा खरा चेहरा जगापुढे येईल. किमान पाच लाख पर्यटक वाहने गोव्यात आल्याचा अंदाज वाहतूकमंत्र्यांनी व्यक्त केला होता. आता ही संख्या आणखी वाढलेली असेल. हॉटेलांची भाडी केव्हाच कडाडलेली आहेत. विमान आणि बस तिकिटांची मनमानीपणे दरवाढ सुरूच आहे. या सार्‍या परिस्थितीत प्रचंड खर्च करून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्यात येऊन गेलेल्या देशी – विदेशी पर्यटकांना या सुटीचे समाधान मिळाले असेल का? त्याऐवजी जर गैरसोयींची मालिकाच त्यांच्यापुढे वाढून ठेवली जाणार असेल, तर त्यातून निर्माण होणार्‍या वाईट प्रतिमेचा पर्यटन क्षेत्राला मोठा फटका भविष्यात बसल्यावाचून राहणार नाही. पर्यटनाच्या नावाखाली चाललेली बेबंदशाही रोखण्याची वेळ आली आहे याचे सूतोवाच या सार्‍या परिस्थितीने केलेले आहे. नाही तर खाणींप्रमाणेच पर्यटनाचा फुगा फुटणेही अटळ आहे!