बेफिकिरी भोवेल!

0
176

राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसागणिक नियंत्रणापलीकडे चालली आहे. गेले काही दिवस रोज सातत्याने आढळणारे शंभरहून अधिक रुग्ण, दिवसाला होणारे दोन – तीन मृत्यू, नवनव्या गावांमध्ये होत असलेला कोरोनाचा फैलाव आणि एवढे सगळे होऊनही सार्वजनिक जीवनामध्ये सर्रास दिसत असलेली बेशिस्त आणि बेफिकिरी ही अस्वस्थ करणारी बाब आहे. ही बेफिकिरी केवळ जनतेकडूनच दिसते आहे असे नव्हे, तर नेत्यांकडून आणि आरोग्य खाते, पोलीस, कदंब महामंडळ आणि इतर सरकारी आणि खासगी आस्थापनांमधूनही वेळोवेळी दिसून आली आहे आणि त्यामुळेच राज्यामध्ये आज जे कोरोनाचे थैमान चालले आहे ते पसरत गेले आहे.
गोव्याच्या कोरोनाविरुद्ध लढ्यातील अग्रणी डॉ. एडविन गोम्स हे सुटीवर असताना स्वतःच कोरोनाबाधित झाले आहेत ही चिंतेची बाब आहे. गोव्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हापासून जवळजवळ तीन महिने ते अहोरात्र त्याच्याशी लढले. सतत दिवस रात्र कोरोना रुग्णांवर उपचार करीत असताना स्वतः बाधित होणे हे टाळणे जवळजवळ असंभव असते. त्यामुळे त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये जवळजवळ तीन वेळा आपण बाधित झालो, परंतु आपण व आपल्या सहकार्‍यांनी औषधे घेऊन काम सुरू ठेवले असे त्यांनी स्वतःच एका वृत्तवाहिनीवर डॉ. सुबोध केरकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. त्यांची आणि त्यांच्या वैद्यकीय सहकार्‍यांची ही कार्यनिष्ठा अतुलनीय आणि निःसंशयपणे प्रशंसनीय आहे, परंतु डॉक्टर या नात्याने त्यांनी कोरोनासारख्या महाविघातक विषाणूबाबत जी खबरदारी घेणे अपेक्षित होते, ती न घेतल्याने स्वतःच्या आणि रुग्णांच्या जिवाशी खेळल्याचा ठपका त्यांच्यावर येऊ शकतो. कोरोनाला क्षुल्लक गणण्याची जी चूक राज्य सरकारने केली, तिला डॉ. एडविन यांची आध्यात्मिक थाटाची भाबडी भूमिकाच कारणीभूत असावी असे दिसते. कोरोनाला क्षुल्लक गणण्याची ही घोडचूक राज्याच्या जनतेला आज फार महाग पडली आहे.
कोरोनामुळे भयग्रस्त झालेल्या लाखो गोमंतकीयांसाठी आशेचा दिवा होऊन वावरलेला हा लढवय्या लवकरात लवकर बरा व्हावा आणि पुन्हा कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सक्रियपणे उतरावा हीच आज तमाम गोमंतकीयांची ईश्वरापाशी प्रार्थना राहील, परंतु त्याच बरोबर कोविड लढ्यामधील आघाडीच्या योद्ध्यांनी किमान यापुढे अधिक जबाबदारीने आणि खबरदारीने वागावे अशी अपेक्षाही जनता आज व्यक्त करते आहे.
डॉ. एडविन सुटीवर गेल्यानंतरच्या काळात राज्यात एकाएकी कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढण्यामागचे कारण कळत नाही. सरकार त्या सर्व रुग्णांच्या ‘को-मॉर्बिडिटी’कडे म्हणजे त्यांना असलेल्या इतर आजारांकडे बोटे दाखवत असले, तरी आता अचानकपणेच मृत्यूंचे प्रमाण कसे वाढले ही विचार करण्याजोगी बाब आहे. त्याला गुजरातमध्ये झाले तसे त्या विषाणूमधील उत्परिवर्तन (म्युटेशन) कारणीभूत ठरते आहे का, आपल्या वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये काही त्रुटी राहत आहेत का, या शंकांचे निरसन झाले पाहिजे. रुग्णांच्या वयोगटाचा विचार करता त्यांच्यामध्ये इतर आजार असणे हे स्वाभाविकच आहे. परंतु त्याचा अर्थ कोरोना झाला की त्या रुग्णाचा मृत्यूच ओढवावा असा होत नाही. ते कोरोनाबाधित आहेत हे ओळखण्यासाठी चाचणी होण्यात विलंब झाला का, सुरवातीच्या टप्प्यामध्ये ते कोरोनाबाधित आहेत हे ओळखण्यात चूक झाली का, की योग्य उपचारांच्या अभावामुळे ते असे एकापाठोपाठ मृत्यूच्या दारात पोहोचत आहेत या शंकांचे निरसन झाले पाहिजे. राज्यातील सर्व इस्पितळांमधील अतिदक्षता विभागातील वीस टक्के जागा अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश सरकारला काढावा लागला आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे हे निदर्शक आहे. आरोग्य खात्याचे रोजचे परिपत्रक रुग्णांच्या वाढत्या आकड्यांनी अक्षरशः आता भरून वाहते आहे. लवकरच त्याला पान अपुरे पडेल अशी स्थिती आहे. एकूण रुग्णसंख्या अडीच हजारांच्या पार गेलेली आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या २.८३ टक्के लोक कोरोनाबाधित झालेले आहेत, ६.०७ टक्के लोकांच्या चाचण्या कराव्या लागल्या आहेत आणि बाधित झालेल्यांपैकी ०.६१ टक्के लोक मृत्युमुखी पडले आहेत. हे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे ही यातली सर्वांत चिंतेची बाब आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत परिस्थिती अधिकच बिघडली आहे आणि म्हणूनच हा वाढता फैलाव रोखण्यासाठी यापुढे तरी जनता, सरकार, वैद्यकीय क्षेत्रात वावरणार्‍यांनी अधिक खबरदारी घेण्याची नितांत गरज यातून अधोरेखित होते आहे!