बेफिकिरीचे बळी

0
111

केरळमधील कोळ्ळम् जवळच्या परवूर येथील पुट्टिंगलदेवी मंदिरात मीन भरणी उत्सवाच्या सांगतेवेळच्या आतषबाजी स्पर्धेवेळी झालेल्या दुर्घटनेची भीषणता एव्हाना देशाला कळून चुकली आहे. शंभराहून अधिक भाविक मृत्युमुखी पडले आहेत आणि तीनशेहून अधिक जखमी झाले आहेत. आतषबाजीसाठी साठवलेल्या स्फोटकांच्या गोदामात ठिणगी उडाली आणि परिणामी मोठमोठे स्फोट होत आजूबाजूच्या बघ्यांच्या गर्दीला आगीने लपेटले असे एकंदर घटनाक्रमातून स्पष्ट झाले आहे. झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये आजूबाजूच्या इमारतींचे सिमेंट कॉंक्रिटचे तुकडेही इतस्ततः पडल्यानेही लोक जखमी झाले. उत्सवासाठी हौसेने जमलेल्या भाविकांवर काळाने असा घाला घालणे दुःखदायक आहे खरेच, परंतु या दुर्घटनेला मानवी बेफिकिरीच जबाबदार आहे असे स्पष्ट दिसते आहे. मुळात उत्सवांच्या वेळी अशा प्रकारची डोळे दिपवून सोडणारी प्रचंड आतषबाजी परंपरेच्या नावाखाली करण्याची अहमहमिकाच या भाविकांच्या जिवाशी खेळ मांडणारी ठरली आहे. केरळमध्ये जवळजवळ प्रत्येक उत्सवाच्या वेळी अशा प्रकारच्या आतषबाजीच्या स्पर्धा होतात. बक्षिसेही ठेवली जातात. दोन गट अहमहमिकेने आणि एक दुसर्‍यांवर कुरघोडी करीत आतषबाजी करतात. अलीकडच्या काळात तर त्यात प्रचंड प्रमाणात पैसा ओतला जात असल्याने तिचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रात्री दहा – साडे दहा पासून पहाटे चारपर्यंत ही आतषबाजीच्या नावाखालील उधळपट्टी चालते. पर्यटकाभिमुख राज्य असलेल्या केरळमध्ये उत्सवांवेळच्या या आतषबाजीच्या नेत्रदीपकतेचे ‘‘ब्रिलियंट फायरवर्क्स आर मास्टरपिसेस ऑफ केरला’ असे गोडवेही गायिले जातात. परंतु पुरेशी सुरक्षाविषयक खबरदारी न घेता आणि मुख्य म्हणजे जिल्हा प्रशासनाने आतषबाजीला परवानगी नाकारलेली असताना हा जो भाविकांच्या जिवाशी खेळ मांडला गेला, त्यातूून ही भीषण दुर्घटना घडली आहे. मुळात प्रशासनाने कागदोपत्री जरी परवानगी नाकारली असली, तरी उत्सवाच्या ‘परंपरे’त अडथळा आणण्याची प्रशासनाची इच्छा नसावी. अन्यथा, परवानगी नसताना अशी तासन्‌तास चालणारी आतषबाजी स्पर्धा घेण्यास देवस्थान प्रशासन धजावले नसते. केरळमध्ये त्रावणकोर देवस्थान बोर्डाच्या नियंत्रणाखाली सुमारे बाराशे मंदिरे आहेत. परंतु हे पुट्टिंगलदेवी मंदिर त्याखाली येत नाही. हे खासगी ट्रस्टद्वारे चालवले जाते. परंतु खासगी काय, सार्वजनिक काय आणि मंदिरे काय किंवा चर्च काय, केरळमध्ये उत्सवी आतषबाजीचा शौक सर्वत्र दिसतो. अशी आतषबाजीवेळची अग्निकांडे केरळमध्ये पूर्वीही घडली आहेत. ५२ सालच्या साबरीमला अग्निकांडापासून त्रिसूरच्या त्रिसूरपुरम उत्सवापर्यंत अनेकदा अशा दुर्घटना घडल्या आहेत. त्रिसूरला तर त्रिसूरपुरम उत्सवात तीन वेळा असे अग्निकांड घडले आहे. यावेळी बळींची संख्या प्रचंड असल्याने सर्वांना धक्का बसला आहे एवढेच.
पूर्वीच्या काळी मनोरंजनाची अन्य साधने नव्हती, तेव्हाचे ठीक आहे, परंतु आज मनोरंजनाची अन्य माध्यमे असताना लाखो रुपयांचा धूर करीत अशी व्यर्थ उधळपट्टी करणे कितपत योग्य आहे? परंतु परंपरेच्या नावाखाली ही स्पर्धात्मक आतषबाजी केली जाते. मानवी आरोग्यावरील तिचे दुष्परिणाम तर सर्वज्ञात आहेत. निदान पुरेशी खबरदारी तरी घेतली जावी. परंतु पुरेसे मोकळे मैदान नसताना, आणलेली स्फोटके तात्पुरत्या ठिकाणी ठेवून अत्यंत असुरक्षित परिस्थितीत या स्पर्धा घेतल्या जातात. त्याची परिणती मग अशा दुर्घटनेत घडली तर नवल नाही. अशा दुर्घटना घडल्यावर हळहळ व्यक्त होते, परंतु आवश्यक धडा मात्र घेतला जात नाही.