बेपत्ता विमानातील सर्व १३ जवान शहीद

0
111

बेपत्ता झालेल्या वायूदलाच्या एएन-३२ विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात आढळले आहे. बचाव दलाने याची पुष्टी केली असून या विमानात असणारे सर्व १३ जवान शहीद झाले आहेत. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडलेल्या ठिकाणी काल सकाळी १५ सदस्यीय बचाव पथक दाखल झाले होते.

मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ या विमानाचे अवशेष सियांग जिल्ह्यात आढळून आले होते. अपघाताचे ठिकाण अतिशय उंचावर आणि घनदाट जंगलात आहे. त्यामुळे विमानाचे अवशेष असलेल्या ठिकाणी पोहचणे हे आव्हानात्मक काम होते. अपघातात मृत्यू झालेल्या १३ जवानांमध्ये ६ अधिकारी आणि ७ एअरमन यांचा समावेश होता. अपघातग्रस्त विमानांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी १५ सदस्यीय बचाव पथकाला हेलिड्रॉप करण्यात आले होते.

ब्लॅक बॉक्स, मृतदेह सापडले
भारतीय हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील सर्व १३ मृतदेह सापडले असून ब्लॅक बॉक्सही दुर्घटनास्थळी सापडला आहे. विंग कमांडर जी. एम. चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच. विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर. थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए. तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस मोहंती, फ्लाइट लेफ्टनंट एम. के. गर्ग, वॉरंट ऑफिसर के. के. मिश्रा. सार्जंट अनुप कुमार, कॉर्पोरल शेरिन, लीड एअरक्राफ्टमन एस. के. सिंह, लीड एअरक्राफ्टमन पंकज, बिगर सैनिकी कर्मचारी पुतली आणि राजेश कुमार हे या दुर्घटनेत शहीद झाले.