बेतोड्याच्या सातेरी प्रासादिक संगीत संस्थेचे पथक प्रथम

0
143

>> कला अकादमी आयोजित बालभजन स्पर्धा

कला अकादमी आयोजित भजनसम्राट स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्पर्धेच्या बाल कलाकार विभाग अंतिम भजनी स्पर्धेत श्री सातेरी प्रासादिक संगीत संस्था, बेतोडा या बाल भजनी पथकाने २५००० रुपयांचे प्रथम पारितोषिक व मनोहरबुवा शिरगावकर स्मृती फिरता चषक पटकाविला. सलग तिसर्‍या वर्षी या पथकाने प्रथम पारितोषिक पटकावून ‘हॅटट्रीक’ साधली आहे.

सर्वोदय एज्युकेशन सोसायटी विद्यालय, कुडचडे या पथकाला २०,००० रुपयांचे द्वितीय तर श्री रामसेवा संघ बाल भजनी मंडळ, मयडे या पथकाला १५,००० रुपयांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. तर १०,००० रुपयांचे चौथे पारितोषिक बालभवन केंद्र, वेळगे या पथकाला देण्यात आले.

उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी पाच हजार रुपये) स्वरदीप बाल भजनी मंडळ, आमोणा व बालभवन, पणजी यांना देण्यात आली. उत्कृष्ट गायक म्हणून अनिश आनंद सालेलकर (सातेरी प्रासादिक संगीत संस्था, बेतोडा), द्वितीय गायक – साक्षी सुरेश जोशी (बाल भवन केंद्र, वेळगे), उत्कृष्ट पखवाजसाथी – दीपराज दिनकर घाडी (स्वरदीप बाल भजनी मंडळ, आमोणा), उत्कृष्ट हार्मोनियम साथी – अवधुत मराठे (बाल भवन केंद्र, वेळगे), उत्कृष्ट गवळण गायक – ऐश्‍वर्या विजयकांत सतरकर (सातेरी प्रासादिक संगीत संस्था, बेतोडा) यांना वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली.

सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर यांनी स्वागत केले. स्पर्धेचे परीक्षण प्रदीप पांडुरंग नाईक, विठ्ठल खांडोळकर व दीक्षा पुनाजी कोंडुरकर यांनी केले. कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पुढच्या वर्षीपासून प्रथम विजेत्या पथकास फिरता चषक न देता कायम स्वरूपी चषक देण्यात येईल असे मंत्री गावडे यांनी सांगितले.