बेकायदा खाण व्यवसायातून लुटलेल्या संपत्तीची वसुली करा

0
160

>> आयटकच्या कामगार सभेत ठराव

राज्य सरकारने गोवा खाण विकास महामंडळ स्थापन करून आणि पर्यावरणाचे संवर्धन करून खाण व्यवसाय त्वरित पुन्हा सुरू करावा. तसेच बेकायदा खाण व्यवसायातून लुटण्यात आलेल्या संपत्तीची वसुली करावी, असे ठराव अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) गोवा राज्य समितीने चर्च सर्कल उद्यानाजवळ आयोजित कामगार दिन सभेत काल एकमताने संमत करण्यात आले.

भविष्य निर्वाह निधी कायद्यात बदल करू नये, रस्ता वाहतूक सुरक्षा विधेयक मागे घ्यावे, उद्योजकांच्या हितार्थ कामगार कायद्यात करण्यात येत असलेल्या बदलाची प्रक्रिया बंद करावी, खाण कामगारांना पूर्व पगार द्यावा, खाण कामगार कपातीला आळा घालावा, कंत्राट कामगार पद्धत बंद करावी, सरकारी खात्यातील कंत्राटी कामगार पद्धत बंद करावी, संघटित व असंघटित कामगारांना राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा निधीखाली सुरक्षा पुरवावी, रोजगार निर्मितीवर भर द्यावा, कर्मचार्‍यांच्या किमान वेतनामध्ये वाढ करावी, कामगाराला महिना कमीत कमी २१ हजार रुपये पगार मिळवून देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, शेतकरी, दलित, आदिवासी, मागासवर्गीय यांच्या हिताचे रक्षण करावे, हॉटेल, आदरातिथ्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांना १० टक्के सेवा शुल्क देण्यासाठी कायद्यात तरतूद करावी, महागाई रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशा मागण्या कामगारांच्या सभेत करण्यात आल्या.

या कामगार सभेला आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका, अध्यक्ष प्रसन्न उटगी, आयटकचे उपसरचिटणीस राजू मंगेशकर, सुहास नाईक व कामगार संघटनांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात फादर ब्राझ फालेरो, आवडा व्हिएगश, गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर गावकर, फ्रान्सिस आराऊजो, दामोदर एम. नाईक, रोहिदास शिरोडकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रसन्ना उटगी यांनी स्वागत केले. ऍड. सुहास नाईक यांनी विविध ठरावांचे वाचन केले.