बुमराहचे ‘पंकच’; भारताचे दमदार पुनरागमन

0
136

>> दुसर्‍या डावात १ बाद ४९

>> आफ्रिकेला १९४वर रोखले

दु्रतगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने कारकिर्दीत प्रथम मिळविलेले पाच बळी आणि त्याला भुवनेश्वर कुमारने दिलेल्या उपयुक्त साथीच्या जोरावर भारताने तिसर्‍या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९४ धावांवर संपुष्टात आणत दमदार पुनरागमन केले. प्रत्युत्तरात खेळताना भारताने आपल्या दुसर्‍या डावात काल दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ गड्याच्या मोबदल्यात ४९ अशी धावसंख्या उभारत ४२ धावांची आघाडी मिळविली आहे.

पहिल्या दिवसाच्या १ बाद ६ धावांवरून पुढे खेळताना काल दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ६५.५ षट्‌कांत १९४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात केवळ ७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम आमलाने अर्धशतक झळकावत सर्वाधिक ६१ धावा केल्या. नाइट वॉचमन म्हणून आलेल्या कागिसो रबाडाने ३० धावा तर तळाला वेर्नोन फिलेंडरने ३५ धावांचे योगदान दिले. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतार्फे जसप्रीत बुमराहने आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात ५ बळींचे घबाड मिळवित आपली निवड सार्थ ठरवली. भुवनेश्वर कुमारने ३ बळी मिळविले.
प्रत्युत्तरात खेळताना भारताने आपल्या दुसर्‍या डावात १७ षट्‌कांच्या खेळात १ गडी गमावत ४९ धावा बनविल्या आहेत. पार्थिव पटेल (१६) वेर्नोन फिलँडरच्या गोलंदाजीवर ऐडन मारक्रमकडे झेल देऊन परतल्यानंतर मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी आणखी फलंदाज बाद होऊ न देता दुसर्‍या दिवसअखेर भारताला ४२ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुरली विजय (१३) आणि लोकेश राहुल (१६) नाबाद खेळत होते.

धावफलक, भारत, पहिला डाव ः १८७. दक्षिण आफ्रिका, पहिला डाव ः (१ बाद ६ धावांवरून पुढे) – डीन एल्गार झे. पार्थिव पटेल गो. भुवनेश्वर कुमार ४, कागिसो रबाडा झे. अजिंक्य रहाणे गो. ईशांत शर्मा ३०, हाशिम आमला झे. हार्दिप पंड्या गो. जसप्रीत बुमराह ६१, अब्राहम डीविलियर्स त्रिफळाचित भुवनेश्वर कुमार ५, फाफ डुप्लेसिस त्रिफळाचित जसप्रीत बुमराह ८, क्वींटन दी कॉक झे. पार्थिव पटेल गो. जसप्रीत बुमराह ८, वेर्नोन फिलँडर झे. जसप्रीत बुमराह गो. मोहम्मद शामी ३५, आंदिले फेलुकवायो पायचित गो. जसप्रीत बुमराह ९, मोर्ने मॉर्केल नाबाद ९, लुंगी एनगिडी झे. पार्थिव पटेल गो. जसप्रीत बुमराह ०. अवांतर ः २३, एकूण ६५.५ षट्‌कांत सर्वबाद १९४. , गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार १९/९/४४/३, जसप्रीत बुमराह १८.५/२/५४/५, ईशांत शर्मा १४/२/३३/१, मोहम्मद शामी १२/०/४६/१, हार्दिक पंड्या २/०/३/०., भारत, दुसरा डाव ः मुरली विजय खेळत आहे १३, पार्थिव पटेल झे. ऐडन मारक्रम गो. वेर्नोन फिलँडर १६, लोकेश राहुल खेळत आहे १६. अवांतर ः ४. एकूण १७ षट्‌कांत १ बाद ४९ धावा. , गोलंदाजी ः वेर्नोन फिलँडर ५/२/११/१, कागिसो रबाडा ६/१/१९/१, मोर्ने मॉर्केल ४/१/९/१, एनगिडी २/०/६/०.